शनिवार, २५ डिसेंबर, २०१०

विचारू नका मला वर्ष कसे गेले

विचारू नका मला वर्ष कसे गेले 

इकडे आड तिकडे विहीर 
घेतली नाही तरी मी एक उडी 
धडपडत धडपडत चालत आले 
विचारू नका मला ..

अपघात झाले, रोगराई झाली
घोटाळ्याने सर्व पूर्तता केली 
कशीबशी कशीबशी बंबई सावरली 
विचारू नका  मला ..

एक साठवण एक पाठवण
लक्षात राहतील असे असंख्य क्षण 
लगबग लगबग बाजू त्याना सारले 
विचारू नका मला 

हितगुज गाजले, कुजबुज वाढली  
संमेलनाने मस्त सांगता झाली 
तरीपण अजून  कुरघोडी नाही सरली 
विचारू नका  मला ..

एकामागून एक वर्षे जाती 
थोडेफार काही येई हाती 
हळूहळू एकेक पान गळून जाई
विचारू नका  मला ..

थोडे गोड, जास्त कडू 
तिखट सुद्धा अपवाद नाही 
मळमळून  वर कधी आंबट  येई
विचारू नका मला 

छान स्वप्ने, भव्य भेटी 
भरपूर येऊ दे नव वर्षी 
मग पहा कसे सारे उल्हासित होईल 

विचारा मला तुम्ही 
          स्वागत कसे केले 
म्हणेन मग मी जोरदार केले !!



गुरुवार, २३ डिसेंबर, २०१०

पायराखीण

बोल बोल बोलले 
अडखळले, अपशब्दले ही 
           पण मौन नाही धरले 

वाणी माझी बिन हाडाची 
जाडी भरडी मांसल
तीळ ही भिजतो तिथे पण साखर
       असे तिच्या रंध्रा रंध्रात प्रखर 

चाल चाल चालले 
पडले, रडले ही 
       पण नाही कधी थांबले

बोलता चालता एवढी चालून आले
विसरले सर्वाना आणि ते ही मला 
         एक मात्र ती नाही विसरली
जिला पायाखाली तुडवली, ती माती
मी   जाईन   तेथे आली 
          पायराखीण   म्हणून..

विसावायला नाही दिले तिने मला 
उठ म्हणाली तयार हो, पुढच्या प्रवासाला
         घाबरू नकोस, मी आहे तुझ्या मदतीला..
दोन पाय माझे दमलेले
शांतपणे भक्कम रोवायला
         उभी ठाकली  ती, मला नांदवायला ..

बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

झुला

स्तब्ध शांत सुन्न हे 
वाट कशाची मन पाहे 

पान ही हलेना, फुलही डोलेना 
एकही विचार मनात येईना

उर्मी नसे, उचंबळही  नाही
कसे, केव्हा, झाले मन हे असे 

अलगद झुल्यावर बसले जरी 
झुला स्थिर ठेवला असे

नका त्याला जराही 
नका त्याला जराही, देऊ झोका 
स्तब्ध शांत सुन्न हे
वाट कशाची मन पाहे

झुला घेईल हिंदोळे, वाऱ्या सहे
मन नाजूक, हुंकारेल..
नका आत्ता, त्याला जराही 
नका आत्ता, त्याला जराही देऊ झोका 

स्तब्ध, शांत, सुन्न हे
वाट कोणाची हे मन पाहे ..