प्रेमाची किंमत मोजावी लागते म्हणे-
वेगवेगळ्या रुपात-
कधी विरह, कधी आसू,
काही आठवणी, साथीला वेदना, दु:ख
आप्तांचा विरोध, तगमग तगमग
मार्गक्रमण भारी, निद्रा न येई लगबग
कधी मूक सहवास, कधी मुक्त संवाद,
स्वप्नांचे मनोरे, रुढींचे समास..
एवढे महागडे प्रेम... गंमत म्हणजे
ज्यांच्याकडे काही नाही, त्यांच्याकडेच असते !
कारण त्यांच्या या अमुल्य ठेव्याची तुलना
त्यांना दुसया कशाशीही करणे अशक्य असते
कुठेतरी आत जपणूक असते एका अहंकाराची
आपले प्रेम योग्य ठायी सोपवले गेल्याची !
मग जगरहाटीनुसार ते रास्त असो वा नसो...
मनात उर्मी असते जिंकण्याची
शेवटपर्यंत त्यासाठी लढा देण्याची !
अहंकार हा मनातून नाहीसा झाला तर
निराशा नाही येत पदरी प्रेमभंगाची
कारण सतत तेवत राहणे
हीच तर असते महती खऱ्या प्रेमाची !