शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

मैत्र

मैत्री - एक लहानसा शब्द, पण खूप मोलाचा.
आयुष्यात सारे काही आहे आणि तुमची कुणाशी मैत्रीच नाही
मग तुम्ही अगदीच भणंग. वाचायला खूप जड जातय ना?
खरेच मैत्रीचे मोलच तेवढे आहे. 

माझ्यापासून पाहायचे झाल्यास मला खूप मैत्रिणी आहेत,
प्रकारही खूप त्यांचे. शाळेतील, कार्यालयीन, प्रवासातील,
कॊलेजमधील, नातेवाईक. हॊ, नातेवाईक मधुन पण
एक मैत्री होऊ शकते- नि:पक्ष, नि:स्वर्थी! 

या सर्वांमधून खोलवर पाहता, मला सर्वात जवळची
वाटते ती माझी पुस्तकांशी मैत्री. स्तंभित व्हाल आपण
हे वाचून. शाळेत कायम मैत्रिणींच्या गराड्यात राहूनही
कसे माहीत नाही, पण ह्या पुस्तकानी मात्र मन प्रचंड
आकर्षित करून घेतले. आमच्या घराजवळच एक सुंदर
वाचनालय होते. पुस्तके नाना तर्हेची भरगच्च. वेळ 
भरपूर. असे सर्व असता, सहवासाने प्रेम न वाढले तरच
नवल! घरूनही पूर्ण पाठींबा! मग काय! अगदी दिलखुलास
गप्पा मारुन घेतल्या, शाळेच्या दिवसात. कधी 
विसंशी, कधी सुमतीजींशी तर कधी राजाकाकांशी. लहान
वयात त्यांच्याकडून मी खूप काही शिकले. काही विचार
पक्के झाले, काही संकल्पना तयार झाल्या. स्वप्ने तर
विचारू नका, किती रंगवली- सर्व ह्या पुस्तकांच्या मदतीने!
आणि मग हा छंदच लागला, वाचायचा. पुस्तकांच्या शोधात
नंतर निघतच राहिले, वेगवेगळ्या ठीकाणी! वेगवेगळ्या
भाषेत!

हळूहळु मैत्री विस्तारत गेली. विषयही बदलत गेले. कधी
प्रेमाचे, कधी अध्यात्मिक तर कधी मौलिक- सर्वच बाबतीत!
वेगवेगळ्या पुस्तकातून शब्दांचे बारकावे लक्षात आले.
त्यातून परिक्षण ही करता आले- चांगल्या वाईटाचे.


वेळेचे बंधन नाही, अवाजवी खर्च नाही. आपल्या आवडी
जपून आपल्यावर कॊणतेही बंधन न घालणारा हा छंद.
नव्या पुस्तकाची चाहूल लागताच माझी होणारी तारांबळ,
आता केव्हा हे वाचायचे आणि ती हुरहूर!  हा सर्व आनंद
घेत असता हे ही लक्षात  आले की ह्या पुस्तकानी मला
खूप दूरवर फ़िरून आणलय, आदरणीय व्यक्तींच्या
जीवनात डोकावयला दिलय, त्यांचे विचार अनुसरायला दिलेत,
केव्हा तर माझ्या लहानसहान प्रश्णाना सुमुपदेश ही केलाय,
माझे जीवन सम्रुद्ध केलय.  ही मैत्री मी वेळोवेळी
वाटतही गेलेय. एक निरिक्षण  असे आहे की एकलकोंडी व्यक्ती
पुस्तकात जास्त रमते.  मी माणसांच्या रगाड्यात असूनही
पुस्तकात रमते- ते  माझे जग आहे. आणि मला हेही माहीत
आहे की आजूबाजूला कॊण नसेल तेव्हा ही पुस्तकेच आमची
मैत्री जपणार आहेत! पुस्तकांशी आणि त्यातील विविधरंगी शब्दांशी
असलेली ही मैत्री हा माझा छंद केवळ छंद न राहता, एक रम्य पसारा
बनून राहिला आहे आणि ह्या माझ्या जीवनातील अविभाज्य 
पसा॓याची  मी तितक्याच निगुतीने जपणूक  करणार आहे, ह्यात
शंकाच नाही!

माझी आणि आपलीही पुस्तकांशी, पर्यायाने शब्दांशी - -आजच्या 
ई युगात-- असलेली मैत्री अशीच दिवसेंदिवस व्रुद्धींगत होवो हीच सदिच्छा! 

नको वेदने तू





नको वेदने तू जवळ नको येऊ
आसमन्ती राहा, आठवण ठेऊ!

तुझे दु:ख मोठे करिशी हलके
आम्हा  पामरा नाही, येई सोसू

आली होतीस एकदा, घेऊन सगळे गेलीस
कुणाच्या दारी जाऊन असे नको छळू

करुणा माया सर्व,  जिवंत आम्ही ठेऊ
दुरुनच पहा सर्व मिळून चालू

वचन देतो तुला भावना जपू 
परदु:खी जीवे,  तुझे मोल जाणू

म्हणून  सांगते वेदने, दारीच राहा
डोकावून पहा आम्हा,  सुखी संसारा

नको ती निर्मिती, नको ते सोसणे
आहे ते पुरे आहे, नको ते बोलावणे

माफ़ी मागते तुझी, उजळून गेले जरी
व्र्ण अजून ताजे असती, नको पुन्हा येऊ

नको वेदने, तू....

-अलका काटदरे.


"पानावरच्या दवबिंदूपरी…"

पानावरच्या दवबिन्दूपरी
असते खरेच का आयुढ्यदरी
खोल खोल भावनांनी भरलेली
उंच उंच स्वप्नानी पांघरलेली

सुगंधी वार्य़ाबरोबर ताठ उभारलेली
उन्हा पावसात आसरा देणारी
लांब रुंद आठवणीने थिबकलेली
हवीहवीशी वाटणारी, गूढ नगरी
पानावरच्या दवबिंदुपरी भासते क्षणभर
श्रध्देच्या पायावर मात्र विसावते अंगभर
अलगद, तरल, निर्मळ, मोहक
.... पानावरच्या दवबिंदुपरी
पाय सटकला जरा मात्र, मोहापायी
हीच दरी वागे दवबिंदुपरी
............पानावरच्या दवबिंदुपरी..

- अलका काटदरे