रविवार, २८ जून, २०२०

तुला तुझे, गगन मिळू दे




तुला तुझे, गगन मिळू दे
स्वप्नाना तुझ्या एक दिशा मिळू दे

भव्य जसे दिव्य ही जीवन झळाळू दे
लाविला दिवा दारी उजळत राहू दे

काळोखी वाट त्वरा सरून जाऊ दे
किरण त्या तेजाचे तुझपरी पोचू दे

लक्ष लक्ष सु-आशीर्वाद तुला लाभू दे
चिमुकले रोपटे कसे बहरून जाऊ दे

तुझे तुला गगन मिळू दे..

जगण्याचे संचित


मरायचेच  आहे तर सुखाने जगू या 
लढायचे आहे तर स्वतःशीच बोलूया 

दमायचेच  आहे शरीराने का मानाने 
सोडायचे व्यसन कोणते, वेळीच ठरवू या 

व्रते धरुनी सारी वर्षे लोटली 
निश्चयाचा मेरुमणी जोमाने धरूया   

मांडायची आहे पंगत आठवणींची 
हळूच कोमल भावनांना भिडू या 

पसारा आवरायचा  आहे खरा 
संग्रह विविध नात्यांचा जपूया    

ऋण राहिले परतायचे जगी 
जगण्याचे संचित सुशोभित करूया !

वाट कोणाची हे मन पाहे ..

स्तब्ध शांत सुन्न हे 
वाट कशाची मन पाहे 

पान ही हलेना, फुलही डोलेना 
एकही विचार मनात येईना

उर्मी नसे, उचंबळही  नाही
कसे, केव्हा, झाले मन हे असे 

अलगद झुल्यावर बसले जरी 
झुला स्थिर ठेवला असे

नका त्याला जराही 
नका त्याला जराही, देऊ झोका 
स्तब्ध शांत सुन्न हे
वाट कशाची मन पाहे

झुला घेईल हिंदोळे, वाऱ्या सहे
मन नाजूक, हुंकारेल..
नका आत्ता, त्याला जराही 
नका आत्ता, त्याला जराही देऊ झोका 

स्तब्ध, शांत, सुन्न हे
वाट कोणाची हे मन पाहे ..