रविवार, २८ मार्च, २०१०

श्रीमंती

सर्वांनाच मिळतात चोवीस तास
आणि असतात मात्र दोनच हात
झोपण्यात जातात आठ तास
स्वयंपाकही खास करण्याची आस
मुलेबाळे, पाहुण्यांची उठबस
यजमान म्हणती पुरे, आता बस
मला अशी कामे सतराशे साठ
कशी करू पूरी तासात आठ
आणि मग-
मी वेळ चोरते ..

आठामधून हळूच एक काढते
स्वयंपाकघरात गाणी ऐकते
रोजची धुलाईही तेव्हाच करते
दोन शेगड्या, दोन हात, दोन पाय
सर्वांचा एकत्रित उपयोग करते
चाराऐवजी वेळ असा मी दोन तास घेते

मी वेळ अशी चोरते ..

अन्हिकाला फक्त दहा मिनिटे
पूजा अर्चा पाच मिनिटात करते
यजमानांबरोबर चहा घोटते
सणासुदीला पाहुण्यांना बोलावते
भाजी निवडीत TV बघते
प्रवासातही वाचन करते
पालकत्व सांभाळतांना कविताही करते
आणि इथे मी दोन चोरते

मी वेळ अशी चोरते ..
फिरण्यात एका चार पक्षी मारते
येताजाता बाजारहाट करते
नातीगोती दुहेरी सांभाळते
पाहुण्यांबरोबर करमणूक होते
मुलांबरोबर लहान होते

कुटुंबालाही साथ देते
ऑफिस मध्ये बौद्धिक होते
आयुष्याची मैत्री होऊन जाते
मी वेळ अशी चोरते..


घर-संसार, नोकरी सांभाळता
स्वत:ला त्रिशंकू न करता
सासर-माहेर मित्रमंडळी जपता
स्वत:ला पतंग न बनू देता
मी जमिनीवरच राहते
मी वेळेचा जमाखर्च ठेवते
माझी आमदानी सर्वांएवढीच
पण माझी शिल्लक जास्त राहते
मी श्रीमंत अशी होते

मी श्रीमंत अशी होते..
  -Alvika
एक प्रवास-

अचानक सुरू झालेला
धुंदीत धावणारा
मस्तीत मोहरणारा
सगळे, सग्गळे मागे सारणारा ...


असाही एक प्रवास-
हळुवार स्वप्नानी भरलेला
अलगद झुल्यावर बसलेला
मयुरपंखानी डोलणारा
फुलांसह बहरणारा .....

आणि हाही एक प्रवास-
खुणावणारा,
आलिंगनासाठी उभारलेला,
आपली वाट पाहत असलेला.......

एक प्रवास..........

          -Alvika

राजस रुपेरी तारुण्य माझे

सरसर चढूनी आले

सळसळते तारुण्य माझे
फुलासह बागडले मी
वार्‍यासह खेळले मी


दोन टाप खाली माझे
दोन टाप ऊभारूनी


वादळांशी झुंजले मी
प्रेमात मोहरले मी
जिवनाची नौका वल्हवत आले
कुठे सुसाट कुठे मंद झाले


कधी बगीचा शांत सुखाचा
कधी मैदाना युध्दरुप आले


भरभर सरत चालले
उफाळलेले तारुण्य माझे
रक्त ते साकाळले
पेन माझे सरसावले


झरझर थेंब ठिपकू लागले
निद्रिस्त मनाला उठावे लागले


आणि-


दमदार पावले टाकत चालले
राजस रुपेरी तारुण्य माझे
फुलासम प्रसन्न झाले
वार्‍यासम स्वच्छंद झाले


हळूवार फुंकर मारीत चालले
राजस रुपेरी तारुण्य माझे !
         -Alvika

आगमन

तो नक्की येईल..
त्याच्या आगमनाची वार्ता सर्वानाच आहे..
कुणी त्याच्या आकर्षक वर्णनात गुंततात
तर कुणी त्याला धडा शिकवू म्हणतात
कुणी वाट पाहात राहतात..
कुणी तो येईल, तसा जाईल म्हणतात
मी मात्र विश्वासून आहे, तो नक्की येईल..
माझ्या त्याची ऐट न्यारी
दीपवील तो सर्वाना तिन्ही प्रहरी
सुखाचे गाणे गाईल, दु:खावर मात करून
विश्वासाचे नाते निर्मिल, सुसंस्कृतीचे जाळे विणून
तो येण्याअगोदर सगळं कसं तय्यार पाहिजे
आज मात्र त्यासाठी मला झगडायला पाहिजे
न रडता, न चिडता, न थकता..

त्याच्यासाठी पायघड्या घालता घालता
रात्र कधीच सरून जाईल
तो नक्की येईल..

माझा उद्या नक्की येईल-
लवकरच येईल....
-Alvika

रविवार, १४ मार्च, २०१०

सागराचा थांग

एकमेकासंगे उभे दोघे
खांद्याचा स्पर्श, मनाचा न अंदाज लागे

त्याची नजर सामोरया अथांग सागराकडे
तिची- त्याच्या करड्या नजरेकडे

त्याला जाणवले सागराचा  थांग लागणे कठीण
तिला कळून चुकले, नजरेला त्याच्या नजर देणे मुश्कील

तो परतला सागराची खदखद मनात घेऊन
ती- मनातल्या भावना सागराला अर्पण करून!
-Alvika