मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

हे जीवन सुरमय होऊ दे !


              
तो  चंद्र आज नभी  नाही
ही  रात्र पार पडू दे 

प्रेमदोर  हाती तिच्या
ती माय थोडी निजू दे

धनधान्ये  येती उदरी तिच्या 
ती धरा सुपीक होऊ दे 

पक्षी विहंगी विहरती
ते नभ निरभ्र होऊ दे 

रांगा लागती दारी तुझ्या 
गजर त्रिलोकी अंबे उदे

सुप्त ज्ञान  विकसती तेथे
ते मंदिर उजळून  जाऊ  दे 

प्रेम विश्वास आधार देई 
ती मैत्री वृद्धी लागू दे 

सुरात सूर मिसळून जाई
हे जीवन सुरमय होऊ दे !

********************
-  अलका काटदरे 

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

नाती-गोती


   ** नाती-गोती **
              ****
नाती विविध रंगांची 
एकेरी, दुहेरी, तिहेरी पदारांची

नाती जपायची 
सासरची आणि माहेरची 

नाती रक्ताची 
कधी केवळ समजुतीची 

नाती मोकळी मोकळी 
बंधनात नाही बांधायची 

नाती तऱ्हेतऱ्हेची
नाही नियमात बसायची 

नाती रंक आणि रावाची
सर्वांनी सुखाने नांदायची 

नाती विश्वासाची 
श्वासात श्वास मिसळायची

नाती देवघेवीची 
नाही उठाठेव करण्याची 

नाती अनोळखी 
शोधूनही नाही सापडायची 

नाती दोघांनी पाळायची 
पाण्यात नाही पाहण्याची 

नाती जुळलेली 
नाही कधी तुटायची 

नाती जोडलेली 
नाही कोणी तोडायची 

नाती मनामनाची 
नाही कधी  विसरायची 

नाती जन्मोजन्मीची 
आजन्म पुजायची 

नाती अशी ही 
आबालवृद्धांनी पाळायची !

नाती तुलना सोन्याची 
नव्याला सर नाही जुन्याची 

नाती अतूट, अवीट मैत्रीची 
प्रतिबिंब पाहती आपलीच  ना ती !

नाती अथांग, गोती सापडण्याची 
थांग लागताच होती माणिकमोती !!

********************
-   अलका काटदरे 



शनिवार, २२ ऑक्टोबर, २०११

सोनेरी क्षण

          
जुन्या काही  आठवणीत माझ्या
तुम्हा सर्वांची पाने आहेत 

सोनेरी  क्षण वाळवलेले 
आज मितिस  जपून  आहेत 

येतात नित्य दसरा - दिवाळी 
आनन्दाश्रू पहा  लपून आहेत 

सर्व मिळून  सुख हास्य  पसरु
आसमन्ति फ़ुले नटून आहेत 

राग-रुसवे विसरून सारे 
नाती नव्याने  बहरून  आहेत 

जुन्या काही  आठवणीत माझ्या....
          नव्या आशा  डोकावून आहेत !!

सोमवार, २० जून, २०११

जादुई काड्या -



आठवणींचे पागोळे, स्वप्नांच्या होड्या
झुलत झुलत काढती एकमेकांच्या खोड्या

काजव्यांची चमचम बेडूकरावांच्या उड्या
उनपावसात रिमझिम उघडती बंद कड्या

ओलेती वसुंधरा जलद नेसवी साड्या
बागडती मुले फुले घेउनी हिरव्या लड्या

वसंताचा रामराम वर्षाला पडती खळ्या
कोण कुठे कोण कुठे पाहती उमलत्या कळ्या

विरून गेली लाही लाही फिरती जादुई काड्या
दृष्टी कशी बदले सारी वाहती शांतीच्या नद्या
********

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

शिदोरी

Add on  तिकिटावर  प्रवास सुरु झाला 
वाटेवर फराळ घरून मिळालेल्या शिदोरीचा केला 
अर्थात काहीबाही मिळवतच राहिलो दर स्टेशनवर 
कष्टांची झोळी पसरून extensions  ही मागितली 
पत्येक टप्प्यावर..

जेवढे जमले तेवढे आणि झेपेल तेवढे जायचे ठरवले
अर्थात ते शेवटचे स्टेशन खुणावतच राहिले
जे जे चांगले ते ते विकत घेतले
नको असलेले मात्र गरजूंना देऊन झाले 

कधी निसर्ग तर कधी बाह्यरंग पाहताना
अंतर्मनात डोकावायला कधी नाही विसरलो
गाडी कधी स्लो track वर तर कधी fast असताना
ठरल्या वेळेतच मुक्काम गाठायचा ठरवले.

शिदोरी होतीच, ठिय्या करून बस्तान बसवले
इथपर्यंत आलो  हे सुख मिळाले, आनंद झाला
आणि मग त्या सुखी सदऱ्याला तेथेच ठेऊन निघालो
- परतीच्या प्रवासाला ..
-               अनुभवांची शिदोरी घेऊन....

मला परत दे तू लहानपणची पिसे !


(प्र.गझलकार जगजीत सिंग ह्यांच्या "वो कागदकी कस्ती, बारिशका पानी"
ह्या हिंदी गझलेवर आधारित- त्यांची जाहीर क्षमा/ गृहीत परवानगी मागून)-
ते आवळदोडे ते सागरगोटे..
विटीदांडू अन क्रिकेटचे सोटे
करवंदे,चिंचा अन म्हातारीची बोटे,
जांभूळ, कैर्‍या नाक्यावर भेटे
मला परत दे तू लहानपणची पिसे !
ते पावसाचे ओहोळ अन बसलेले रट्टे
सुट्टीच्या दिवशी भरलेले कट्टे
होमवर्क कधीही झालेले नव्हते
शिक्षकगणही तसे आरामात होते
मला परत दे तू लहानपणची पिसे !
लपंडावाचे खेळ आबाधुबीचे बुक्के
साटेलोटे सगळ्या मित्रांचे होते
नाटकांचे उतार पाठ झालेले नव्हते
कडाक्याच्या उन्हाळ्यात हॉल भरलेले होते
मला परत दे तू लहानपणची पिसे !
मनाचे श्लो़क रामरायांची स्तोत्रे
तिनसांजेला आईची कट्टीही सुटे
स्वप्ने उद्याची पाहात पहाटे
भावंडासवे दिवस भरलेले होते
मला परत दे तू लहानपणची पिसे..!
ते आवळदोडे ते सागरगोटे.. 
-alka