गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

विनवणी

एक कोपरा माझा 
हळवा, नाजूकसा, आसूसलेला
मनात बंद अलगदसा..

हळूच पाहता दिसतो मला
आहे तसाच, होता तसाच
हळवा, नाजूकसा, आसूसलेला

भीती मला त्याची, बाहेर येईल तो !

विनवणी त्याची मला,
दार कधीतरी, किलकिले तर कर!
वचन देतो मी तुला
नाही नक्की बाहेर येणार
पण अस्तित्व माझे केव्हातरी
..केव्हातरी.. उघडून तर बघ!

मी आहे येथे तसाच, तुझाच
हळवा, नाजूकसा, आसुसलेला !

थोडे तरी भान ..

तू असलास की बघ, दुसरं काहीच साधत नाही
फ़क्त तुला पाहत राहायचे, ऐकत राहायचे
आणि तुझ्या वर्षावात न्हावून जायचे!

सगळ्या रखरखी दुनियेला विसरायला 
लावणे तुला कसे जमते ?
तुझा विरहही मग विसरला जातो, 
तू थोड्या दिवसांनी निघून जाणार
ह्याचेही भान ठेवले जात नाही,
किंबहूना राहत नाही!

मला भान न राहणे समजू शकते मी
कारण विरह मला झालेला असतो..
पण तुझे भान हरपून बरसणे ?

एवढे सारे कोंडून ठेवायचेच कशाला?

अधूनमधून फ़िरकत राहिलास तर काय
हरकत आहे?

तुलाही बरे, मलाही ....