शनिवार, २५ डिसेंबर, २०१०

विचारू नका मला वर्ष कसे गेले

विचारू नका मला वर्ष कसे गेले 

इकडे आड तिकडे विहीर 
घेतली नाही तरी मी एक उडी 
धडपडत धडपडत चालत आले 
विचारू नका मला ..

अपघात झाले, रोगराई झाली
घोटाळ्याने सर्व पूर्तता केली 
कशीबशी कशीबशी बंबई सावरली 
विचारू नका  मला ..

एक साठवण एक पाठवण
लक्षात राहतील असे असंख्य क्षण 
लगबग लगबग बाजू त्याना सारले 
विचारू नका मला 

हितगुज गाजले, कुजबुज वाढली  
संमेलनाने मस्त सांगता झाली 
तरीपण अजून  कुरघोडी नाही सरली 
विचारू नका  मला ..

एकामागून एक वर्षे जाती 
थोडेफार काही येई हाती 
हळूहळू एकेक पान गळून जाई
विचारू नका  मला ..

थोडे गोड, जास्त कडू 
तिखट सुद्धा अपवाद नाही 
मळमळून  वर कधी आंबट  येई
विचारू नका मला 

छान स्वप्ने, भव्य भेटी 
भरपूर येऊ दे नव वर्षी 
मग पहा कसे सारे उल्हासित होईल 

विचारा मला तुम्ही 
          स्वागत कसे केले 
म्हणेन मग मी जोरदार केले !!



गुरुवार, २३ डिसेंबर, २०१०

पायराखीण

बोल बोल बोलले 
अडखळले, अपशब्दले ही 
           पण मौन नाही धरले 

वाणी माझी बिन हाडाची 
जाडी भरडी मांसल
तीळ ही भिजतो तिथे पण साखर
       असे तिच्या रंध्रा रंध्रात प्रखर 

चाल चाल चालले 
पडले, रडले ही 
       पण नाही कधी थांबले

बोलता चालता एवढी चालून आले
विसरले सर्वाना आणि ते ही मला 
         एक मात्र ती नाही विसरली
जिला पायाखाली तुडवली, ती माती
मी   जाईन   तेथे आली 
          पायराखीण   म्हणून..

विसावायला नाही दिले तिने मला 
उठ म्हणाली तयार हो, पुढच्या प्रवासाला
         घाबरू नकोस, मी आहे तुझ्या मदतीला..
दोन पाय माझे दमलेले
शांतपणे भक्कम रोवायला
         उभी ठाकली  ती, मला नांदवायला ..

बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

झुला

स्तब्ध शांत सुन्न हे 
वाट कशाची मन पाहे 

पान ही हलेना, फुलही डोलेना 
एकही विचार मनात येईना

उर्मी नसे, उचंबळही  नाही
कसे, केव्हा, झाले मन हे असे 

अलगद झुल्यावर बसले जरी 
झुला स्थिर ठेवला असे

नका त्याला जराही 
नका त्याला जराही, देऊ झोका 
स्तब्ध शांत सुन्न हे
वाट कशाची मन पाहे

झुला घेईल हिंदोळे, वाऱ्या सहे
मन नाजूक, हुंकारेल..
नका आत्ता, त्याला जराही 
नका आत्ता, त्याला जराही देऊ झोका 

स्तब्ध, शांत, सुन्न हे
वाट कोणाची हे मन पाहे ..

रविवार, २८ नोव्हेंबर, २०१०

नाही जमले

कुणाच्या मागे जाणे मला नाही जमले
मागे माझ्या कोणकोण आले, मला न कळले
देता नाही आली आश्वासने
ठेवता नाही आली धरूनी आसने
पडता नाही आले पाया
धरता नाही आला साया
विकणे नाही जमले स्वतःला
घेणे नाही जमले ऋणाला
कारणे नाही शोधिली रडायला
रडवले पण नाही कुणाला
ठेविली मान स्वतःची ताठ
दाविली सर्वाना सन्मानाची वाट
वाटले सर्वांमध्ये संचित माझे
टाळले होणे मी धरतीला ओझे ..

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०१०

सुदिनही नक्की येती..

(अशी पाखरे येती च्या धरतीवर..)
अशी संकटे येती आणिक धडे देऊनी जाती
दोन जगांची जुगलबंदी, चार दिसांची धास्ती
नाही जात, नाही धर्म, नाही त्यांना प्रांत
वेळी अवेळी अचानक टपकती ,नाही कसली भिती
एकजूट असे त्यांची, पाठोपाठ ऊभी ठाकती
होरपळून जाती कितीजण त्यातून, नाही गणती त्याची
रुपे विविध, सोंगे फार, निस्तराया कष्ट फार
कसा आळा घालू त्यांना, कुणालाही माहीत नाही
येतील तशी जातील सगळी, आशा करू अशी आपण
सोडा चिंता, बना खंबीर, सुदिनही नक्की येती
सुदिनही नक्की येती...

    तुझे न माझे

    मी सारखे तुझे न माझे करते
    हे माझे मलाच कळले
    तुझ्या ताटात मीठ वर्ज्य करतांना
    चहामध्ये साखर आखडती घेतांना
    हॉटेलमध्ये मेनू सांगतांना, अन
    धोधो पावसातही भज्यांना कात्री लावतांना
    तुझ्यासाठी भरऊन्हांत शर्ट खरीदतांना अन
    तुझ्यासाठी बढती किंवा छंद नाकारतांना
    कधीकधी लुडबुडण्याचा तुला परवाना देतांना
    आणि माझ्या पारतंत्र्यात तुझे व्यक्तिस्वातंत्र्य जपतांना
    प्रत्येक क्षणाला जाणीव होत आहे
    मी सारखे तुझे न माझे करते आहे
    कळले न वळले मागे, तर दिसले..
    वरचष्मा माझाच आहे, प्रेमरूपी त्यागाची ढाल लढवत
    .. तुझ्यातल्या माझ्यासाठी..

      प्रेम दोन शब्दाचे

      प्रेम दोन शब्दाचे -- प्रेम युगायुगांचे
      प्रेम अनुभवायाचे -- आईच्या वात्सल्याचे
      प्रेम अनमोल -- प्रेम सखोल
      प्रेम खगोल -- आकाशाचे पृथ्वीवर
      प्रेम असे आंधळे -- प्रेम कोवळे
      प्रेम नकळे -- आम्हां अजागळे
      प्रेम एक भाषा -- प्रेम एक नशा
      प्रेम ऊमटवे ठसा -- माणुसकीच्या नकाशा
      प्रेम एक मंत्र -- प्रेम असे जादू
      प्रेम अनाठायी -- नका तुम्ही लादू
      प्रेम दाटून आलेले -- प्रेम ओथंबलेले
      प्रेम अपमानित -- साठून राहिले जर आत
      प्रेम जड शब्द -- प्रेम एक सल
      प्रेम एकमात्र -- जागवितो रात्र रात्र
      प्रेम द्यायचे -- प्रेम घ्यायचे
      प्रेम करायचे प्राणिमात्रावरही
      प्रेम कर्तव्य -- प्रेम बंधन
      प्रेम लुटायाचे स्वदेशावरही
      प्रेम एक काव्य -- प्रेम असे विश्वास
      प्रेमकाव्य ऐकायचे -- विश्वासून जगायचे
      प्रेमकाव्य तुझे-माझे
      प्रेमकाव्य तुझे-माझे .
      (Feb.2009).

        माप

        माप ओलांडले अन ठसा ऊमटवत गेले
        बोलत वागत सर्वांना आपलेसे केले
        आवडनिवड पाहता अनुभवी झाले
        आगतस्वागताबरोबर सुख अमाप ते आले
        रातदिन राबतांना त्यांचीच झाले
        मला काय माहित हे संचित सारे
        बघता बघता सारे निवृत्तीला लागले
        हळूचकन नवे नाते जन्माला आले
        माहेर माझे खूप दूरच राहिले
        नकळत माझ्या, मी सासर झाले
        .. मी सासर झाले.

          रविवार, २४ ऑक्टोबर, २०१०

          होऊ कशी ऊतराई


          मी माझ्याच जगात
          माझ्याच नादात
          भानावर मी येऊ कशी
          डोळे ऊघडून का
          दिल खोलून..?
          मी माझ्याच धुंदीत
          माझ्याच तंद्रीत
          धूंद माझी ऊतरवू कशी
          पाणी त्यागाचे शिंपडून
          का हबका वास्तवाचा मारून?
          मी माझ्याच डोलात
          माझ्याच तोर्‍यात
          सांभाळू मी मला कशी
          जोडीला कोणी घेऊन
          का एकांती चिंतन करून?
          मी तुझ्याच ऋणात
          तुझ्याच पदरात
          ऊतराई मी होऊ कशी....?

          वेळेवर ये


          एवढे काय झालेले
          की नुसताच कडाडलास
          आणि निघून गेलास?
          क्षणभर थरकाप झाला
          हा अशा अवेळी?
          असा अचानक?
          ह्या अवतारात?
          क्षणभर दिलासाही वाटला
          थोडासा थांबला असतास तर
          दिसली असती अशी सारी
          संभ्रमित मने
          हर्षभरीत श्वास
          आणि काळजीही..
          त्या चिमुकल्यांची
          काय करशील तू त्यांचे
          एवढीशी ती, बिथरणार तर नाहीत ना?
          थोडासा झुकला असतास तर
          नक्कीच आले असते तुझ्या डोळ्यात दोन अश्रू..
          बस्स, तेवढेही बास होते
          आत्तापर्यंतच्या उन्हाळ्याचा निचरा करायला..
          तू आम्हाला हवा आहेस रे
          पण अशी धमकी नको, चाहूल हवी
          आम्ही वाट पाहू..
          धावत ये, सावकाश ये
          वेळ कुणावर सांगून येत नाही

          ठरून गेल्या काही गोष्टी


          पळून जाई वेळ भाबडा
          चुकून लिहिल्या काही गोष्टी
          अंधारातच चाचपडे मन
          दुरून पाहिल्या काही गोष्टी
          अवचित कधी भेटलो आपण
          पुरून उरल्या काही गोष्टी
          अज्ञाताचा शोध किती दिन
          घडुन राहिल्या काही गोष्टी
          पकडून ठेवता अनंत क्षण
          नकळत सरल्या काही गोष्टी
          कोंब फुटता रुक्ष फांदी
          ठरून गेल्या काही गोष्टी .

          हेच मस्त!

          कुणी कुणाची मदत घ्यावी
          इथे सगळेच सर्व-ग्रस्त

          कुणी कुणाला हाकारावे
          इथे सगळेच कर्म व्यस्त 

          कुणी कुणाला साथ द्यावी
          इथे सगळेच असे अव्यक्त

          कुणी कुणाशी हसा खीदलावे
          इथे सगळेच आधीच त्रस्त

          कुणाचे देणे घेणेही नाही
          अलका म्हणे हेच मस्त! 

          पता ही नही चला

          बहते बहते जमीपर आ पहुंचे 
          पता ही नही चला ऐसे मुझे डुबाया आपने

          पिछे  चलते चलते आज तक आ पहुंचे 
          पता ही नही चला ऐसे मुंह खुलाया आपने 

          रात ढलते ढलते सुरज की किरण आ पहुंचे 
          पता ही नही चला ऐसे सपने दिखाये आपने 

          रोते रोते अचानक हंस जो हम पडे 
          पता ही नही चला आंसू मेरे खतम  कराये आपने ..

          मना माझ्या मित्रा

          मना माझ्या  मित्रा  असा रे कसा तू 
          ऐन वेळी मला सोडी रे का तू 

          मना तू विचारी अविचार नको रे
          आल्या प्रसंगी खंबीर रहा रे 

          मना लाडक्या हित जाणून घे रे 
          गोष्टी चार जुन्या, पण, समजून घे रे

          मना जीवाला शांती असू दे 
          उधाण लाटांना परतून दे रे 

          मना प्रेषिता धर्म सोडू नको रे 
          कष्टाचे फळ  जाणून घे रे 

          मना  मिथ्या  गोष्टी सोडून दे रे 
          संपन्न जगाची  कास  तू  धरी रे 

          रविवार, ११ जुलै, २०१०

          सोडले होते तुला कधीच

          सोडले होते तुला मी कधीच

          येणार नाहीस ना तू पुन्हा कधीच

          माहीत होते ढंग तुझे कधीच
          उडून गेले सर्व कसे कधीच
          येते आठवही कधी ना कधीच
          कुणाकुणाला सांगू हसलो नाही कधीच
          जातील हेही दिवस माझे निघूनी कधीच
          म्हणू नको मात्र जमणार नाही कधीच

          वेळ येऊ नये कुणावर ही पुन्हा कधीच
          सोडले एकदा ते दूर जाऊ दे कधीच

          भरून आले नभ अंधारले कधीच
          धरा होईल हर्षभरीत पहा परत कधीच !

          (21.6.2009)

          नसतोस घरी तू जेव्हा

          (मान्यवर कवींची माफी मागून..)



          नसतोस घरी तू जेव्हा
          कसं शांत शांत वाटते

          भूणभूण कसली नाही
          मी एकांतवासी असते..
          नसतोस घरी तू जेव्हा
          माझ्या आरश्यात मला मी बघते

          किती प्रेम तुला दिले अन
          किती गुन्हे तव केले न्याहाळते..

          नसतोस घरी तू जेव्हा
          मैत्रिंणींशी गप्पा मी मारते

          एकीच्या बोलण्यात मात्र
          विरहाची भावना दिसते..

          नसतोस घरी तू जेव्हा
          सेलफोनची किणकिण वाढते
          माझ्या लक्षात येईपर्यंत
          फोनबील दुप्पट झालेले असते..

          नसतोस घरी तू जेव्हा
          कविता निवांत मी लिहिते
          वाचतांना त्या मात्र
          सर्वांची घरघर वाढते..
          (9.8.2009)

          दिवस तुझे हे...

          दिवस तुझे हे झगडण्याचे

          तोलून मापून वागण्याचे

          रोज रोज दमात चालण्याचे
          चांगलं वाईट समजण्याचे

          दिवस तुझे स्वप्न साकारण्याचे
          हळूहळू मूठ उघडण्याचे
          रोज रोज चित्र चितारण्याचे
          नवनवीन रंग त्यात भरण्याचे

          दिवस तुझे हे सांभाळण्याचे
          डोळ्यात तेल घालून झोपण्याचे
          रोज रोज ऊत्तुंग भरारण्याचे
          मोकळ्या श्वासाने जगण्याचे
          दिवस तुझे पायर्‍या चढण्याचे
          पाया भक्कम करण्याचे

          तारुण्याच्या उंबरठ्यावर उभारण्याचे
          दिवस तुझे हे महत्वाचे...
          (9.8.2009)

          छोटासा

          धो धो धबधबा नसला तरी चालेल

          छोटासा झरा मात्र जरूर हवा

          माणूसकीचा
          स्वास्थ्याचा
          समाधानाचा



          लखलखता झगमगाट नसला तरी चालेल
          छोटासा दिवा मात्र जरूर हवा

          शांतपणे तेवणारा
          दिशा दाखवणारा
          अंधाराला झाकणारा



          दैदिप्यमान नजराणा नसला तरी चालेल
          छोटासा प्रसाद मात्र जरूर हवा

          प्रामाणिकपणाचा
          विवेकाचा
          कष्टाचा.


          (2.9.2009)

          अजून काय पाहिजे तुला

          कानात डूल, डोक्यावर फूल


          एका हाती भाव दुसर्‍या हाती भक्ती
          हातावर घड्याळ, पायात वहाण

          गळ्यात मंगल सूत्र, अंगभर धूत वस्त्र
          ओठावर हसू, जीभेवर साखर

          कपाळाला कुंकूम, नाकावर चमकून

          जमले तर सोबती विविध रुपात

          अनंत क्षण जपण्यासारखे बंद कप्प्यात.


          अजून काय पाहिजे तुला..?

          (मे ०९)

          गुरुवार, ६ मे, २०१०

          Smoke is clear now

          Smoke is clear now

          and the sky is blue

          No more long queue
          or fear of passing thru

          Joys are though quite few
          can see bright rays reaching you

          Days are for us very new
          not to worry, will receive our due.

          रविवार, ११ एप्रिल, २०१०

          QUESTIONS

          Some questions - to ask
          Some - just to ponder

          Some questions giving birth
          to some more questions


          Answers to some questions
          solving all sorts of questions

          Some questions - unanswered
          and some --waiting for answers


          My only one Answer-
          giving birth to many more questions !
                     -Alvika

          रविवार, २८ मार्च, २०१०

          श्रीमंती

          सर्वांनाच मिळतात चोवीस तास
          आणि असतात मात्र दोनच हात
          झोपण्यात जातात आठ तास
          स्वयंपाकही खास करण्याची आस
          मुलेबाळे, पाहुण्यांची उठबस
          यजमान म्हणती पुरे, आता बस
          मला अशी कामे सतराशे साठ
          कशी करू पूरी तासात आठ
          आणि मग-
          मी वेळ चोरते ..

          आठामधून हळूच एक काढते
          स्वयंपाकघरात गाणी ऐकते
          रोजची धुलाईही तेव्हाच करते
          दोन शेगड्या, दोन हात, दोन पाय
          सर्वांचा एकत्रित उपयोग करते
          चाराऐवजी वेळ असा मी दोन तास घेते

          मी वेळ अशी चोरते ..

          अन्हिकाला फक्त दहा मिनिटे
          पूजा अर्चा पाच मिनिटात करते
          यजमानांबरोबर चहा घोटते
          सणासुदीला पाहुण्यांना बोलावते
          भाजी निवडीत TV बघते
          प्रवासातही वाचन करते
          पालकत्व सांभाळतांना कविताही करते
          आणि इथे मी दोन चोरते

          मी वेळ अशी चोरते ..
          फिरण्यात एका चार पक्षी मारते
          येताजाता बाजारहाट करते
          नातीगोती दुहेरी सांभाळते
          पाहुण्यांबरोबर करमणूक होते
          मुलांबरोबर लहान होते

          कुटुंबालाही साथ देते
          ऑफिस मध्ये बौद्धिक होते
          आयुष्याची मैत्री होऊन जाते
          मी वेळ अशी चोरते..


          घर-संसार, नोकरी सांभाळता
          स्वत:ला त्रिशंकू न करता
          सासर-माहेर मित्रमंडळी जपता
          स्वत:ला पतंग न बनू देता
          मी जमिनीवरच राहते
          मी वेळेचा जमाखर्च ठेवते
          माझी आमदानी सर्वांएवढीच
          पण माझी शिल्लक जास्त राहते
          मी श्रीमंत अशी होते

          मी श्रीमंत अशी होते..
            -Alvika
          एक प्रवास-

          अचानक सुरू झालेला
          धुंदीत धावणारा
          मस्तीत मोहरणारा
          सगळे, सग्गळे मागे सारणारा ...


          असाही एक प्रवास-
          हळुवार स्वप्नानी भरलेला
          अलगद झुल्यावर बसलेला
          मयुरपंखानी डोलणारा
          फुलांसह बहरणारा .....

          आणि हाही एक प्रवास-
          खुणावणारा,
          आलिंगनासाठी उभारलेला,
          आपली वाट पाहत असलेला.......

          एक प्रवास..........

                    -Alvika

          राजस रुपेरी तारुण्य माझे

          सरसर चढूनी आले

          सळसळते तारुण्य माझे
          फुलासह बागडले मी
          वार्‍यासह खेळले मी


          दोन टाप खाली माझे
          दोन टाप ऊभारूनी


          वादळांशी झुंजले मी
          प्रेमात मोहरले मी
          जिवनाची नौका वल्हवत आले
          कुठे सुसाट कुठे मंद झाले


          कधी बगीचा शांत सुखाचा
          कधी मैदाना युध्दरुप आले


          भरभर सरत चालले
          उफाळलेले तारुण्य माझे
          रक्त ते साकाळले
          पेन माझे सरसावले


          झरझर थेंब ठिपकू लागले
          निद्रिस्त मनाला उठावे लागले


          आणि-


          दमदार पावले टाकत चालले
          राजस रुपेरी तारुण्य माझे
          फुलासम प्रसन्न झाले
          वार्‍यासम स्वच्छंद झाले


          हळूवार फुंकर मारीत चालले
          राजस रुपेरी तारुण्य माझे !
                   -Alvika

          आगमन

          तो नक्की येईल..
          त्याच्या आगमनाची वार्ता सर्वानाच आहे..
          कुणी त्याच्या आकर्षक वर्णनात गुंततात
          तर कुणी त्याला धडा शिकवू म्हणतात
          कुणी वाट पाहात राहतात..
          कुणी तो येईल, तसा जाईल म्हणतात
          मी मात्र विश्वासून आहे, तो नक्की येईल..
          माझ्या त्याची ऐट न्यारी
          दीपवील तो सर्वाना तिन्ही प्रहरी
          सुखाचे गाणे गाईल, दु:खावर मात करून
          विश्वासाचे नाते निर्मिल, सुसंस्कृतीचे जाळे विणून
          तो येण्याअगोदर सगळं कसं तय्यार पाहिजे
          आज मात्र त्यासाठी मला झगडायला पाहिजे
          न रडता, न चिडता, न थकता..

          त्याच्यासाठी पायघड्या घालता घालता
          रात्र कधीच सरून जाईल
          तो नक्की येईल..

          माझा उद्या नक्की येईल-
          लवकरच येईल....
          -Alvika

          रविवार, १४ मार्च, २०१०

          सागराचा थांग

          एकमेकासंगे उभे दोघे
          खांद्याचा स्पर्श, मनाचा न अंदाज लागे

          त्याची नजर सामोरया अथांग सागराकडे
          तिची- त्याच्या करड्या नजरेकडे

          त्याला जाणवले सागराचा  थांग लागणे कठीण
          तिला कळून चुकले, नजरेला त्याच्या नजर देणे मुश्कील

          तो परतला सागराची खदखद मनात घेऊन
          ती- मनातल्या भावना सागराला अर्पण करून!
          -Alvika

          बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

          Tension Tension ....

          Tension Tension
          येतय का Tension

          येतंय तर येउद्या,
          दारा मध्ये अडवा
          भले मोठे स्मित द्या
          पाणी पाजून हाकला
          Tension Tension

          मोकळे करा दोन पाय
          मनही जरा मुक्त
          खेळ खेळा मैत्रीचे
          होईल खल्लास दुसरे काय
          Tension Tension

          कालचा विचार नको
          समोर काय ते पहा
          रात्रीचा दिवस नको
          जात नाही का पहा
          Tension Tension

          ध्यास मनी असे जरी
          अट्टाहास नकोच नको
          बैठक भक्कम हवी जरी
          जीवन अजून आहे.. हो
          Tension Tension

          जायचे आहे पुढे
          आहे कबूल सर्वाना
          प्रसन्न वाटे वरी
          जरूर गाठाल स्टेशन
          Tension Tension ....
                   -Alvika

          रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

          शेला त्याचा

          उपाय विचारले तिने
          त्यानेच दिलेल्या दुखांच्या डागण्यावर
          दु;ख कसली ती
          होते छोटे छोटेसे प्रसंग

          दाखले कधितारीच्या वेंधले वागण्याचे
          केव्हातरीचे समज झालेले गैर-समज
          नाहीतर केलेला एखादा विसराळूपणा
          आणि धरलेला नकळत अबोला


          तो नुसतं पाहत राहिला
          आवंढे गिळून न समजून
          होता तो एक निव्वळ माणूस
          साधा, सरळ, पापभिरू, निर्व्याज


          हेलकावे तिच्या मनाचे
          एका संयत क्षणी थांबले
          जेव्हा तिने त्याला माणूस म्हणून पाहिले
          दोघातील 'मी' ना एकत्र करून स्वीकारले

          आता तिच्या डागण्या स्मृती म्हणून राहिल्या
          प्रेमाच्या पदरात तिने विश्वासाने विणून पांघरल्या
          तिच्यातला बदल त्याने सहजच स्वीकारला
          शेला त्याचा अजूनच स्मित पसरून राहिला !
          -Alvika

          जीवनकाव्य

          खड्यात पडलो मी कसा कोणी केव्हा
          तेथेच राहणे वा बाहेर येणे निव्वळ माझ्या हाती

          कोण म्हणे उशीर झाला वेळ निघून गेला
          हा मी आत्ताच उठलो, उभा दिवस माझ्या हाती

           वादळात सापडलो, भरकटलो ही जरासा
          फिरुनी थाऱ्यावर येणे उरले फक्त माझ्या हाती

          दिवस सरला, घामही विरला
          लगडूनी आले क्षण सारे तान्ह्या राती

          किती किती कटकटी असाव्यात माझ्या माथी
          तत्पर जरी मी सर्वांच्या थोपटवाया पाठी

          कसचं काय, काही नाय, वेळ टाळली अधाशी
          पदरी पडले पवित्र झाले हा भावच माझ्या साथी

          भान हरपले, तल्लीन झाले लागली समाधी
          कोणकोण दर्शन देऊन गेले या जीवनकाव्या साठी


          -Alvika