रविवार, २८ नोव्हेंबर, २०१०

नाही जमले

कुणाच्या मागे जाणे मला नाही जमले
मागे माझ्या कोणकोण आले, मला न कळले
देता नाही आली आश्वासने
ठेवता नाही आली धरूनी आसने
पडता नाही आले पाया
धरता नाही आला साया
विकणे नाही जमले स्वतःला
घेणे नाही जमले ऋणाला
कारणे नाही शोधिली रडायला
रडवले पण नाही कुणाला
ठेविली मान स्वतःची ताठ
दाविली सर्वाना सन्मानाची वाट
वाटले सर्वांमध्ये संचित माझे
टाळले होणे मी धरतीला ओझे ..

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०१०

सुदिनही नक्की येती..

(अशी पाखरे येती च्या धरतीवर..)
अशी संकटे येती आणिक धडे देऊनी जाती
दोन जगांची जुगलबंदी, चार दिसांची धास्ती
नाही जात, नाही धर्म, नाही त्यांना प्रांत
वेळी अवेळी अचानक टपकती ,नाही कसली भिती
एकजूट असे त्यांची, पाठोपाठ ऊभी ठाकती
होरपळून जाती कितीजण त्यातून, नाही गणती त्याची
रुपे विविध, सोंगे फार, निस्तराया कष्ट फार
कसा आळा घालू त्यांना, कुणालाही माहीत नाही
येतील तशी जातील सगळी, आशा करू अशी आपण
सोडा चिंता, बना खंबीर, सुदिनही नक्की येती
सुदिनही नक्की येती...

    तुझे न माझे

    मी सारखे तुझे न माझे करते
    हे माझे मलाच कळले
    तुझ्या ताटात मीठ वर्ज्य करतांना
    चहामध्ये साखर आखडती घेतांना
    हॉटेलमध्ये मेनू सांगतांना, अन
    धोधो पावसातही भज्यांना कात्री लावतांना
    तुझ्यासाठी भरऊन्हांत शर्ट खरीदतांना अन
    तुझ्यासाठी बढती किंवा छंद नाकारतांना
    कधीकधी लुडबुडण्याचा तुला परवाना देतांना
    आणि माझ्या पारतंत्र्यात तुझे व्यक्तिस्वातंत्र्य जपतांना
    प्रत्येक क्षणाला जाणीव होत आहे
    मी सारखे तुझे न माझे करते आहे
    कळले न वळले मागे, तर दिसले..
    वरचष्मा माझाच आहे, प्रेमरूपी त्यागाची ढाल लढवत
    .. तुझ्यातल्या माझ्यासाठी..

      प्रेम दोन शब्दाचे

      प्रेम दोन शब्दाचे -- प्रेम युगायुगांचे
      प्रेम अनुभवायाचे -- आईच्या वात्सल्याचे
      प्रेम अनमोल -- प्रेम सखोल
      प्रेम खगोल -- आकाशाचे पृथ्वीवर
      प्रेम असे आंधळे -- प्रेम कोवळे
      प्रेम नकळे -- आम्हां अजागळे
      प्रेम एक भाषा -- प्रेम एक नशा
      प्रेम ऊमटवे ठसा -- माणुसकीच्या नकाशा
      प्रेम एक मंत्र -- प्रेम असे जादू
      प्रेम अनाठायी -- नका तुम्ही लादू
      प्रेम दाटून आलेले -- प्रेम ओथंबलेले
      प्रेम अपमानित -- साठून राहिले जर आत
      प्रेम जड शब्द -- प्रेम एक सल
      प्रेम एकमात्र -- जागवितो रात्र रात्र
      प्रेम द्यायचे -- प्रेम घ्यायचे
      प्रेम करायचे प्राणिमात्रावरही
      प्रेम कर्तव्य -- प्रेम बंधन
      प्रेम लुटायाचे स्वदेशावरही
      प्रेम एक काव्य -- प्रेम असे विश्वास
      प्रेमकाव्य ऐकायचे -- विश्वासून जगायचे
      प्रेमकाव्य तुझे-माझे
      प्रेमकाव्य तुझे-माझे .
      (Feb.2009).

        माप

        माप ओलांडले अन ठसा ऊमटवत गेले
        बोलत वागत सर्वांना आपलेसे केले
        आवडनिवड पाहता अनुभवी झाले
        आगतस्वागताबरोबर सुख अमाप ते आले
        रातदिन राबतांना त्यांचीच झाले
        मला काय माहित हे संचित सारे
        बघता बघता सारे निवृत्तीला लागले
        हळूचकन नवे नाते जन्माला आले
        माहेर माझे खूप दूरच राहिले
        नकळत माझ्या, मी सासर झाले
        .. मी सासर झाले.