गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 साधारण २००७ -०९ चा काळ असावा. . मोठ्या मुलाची दहावी झाल्यामुळे थोडा वेळ मिळत होता सुट्टीच्या दिवशी. FB account उघडलेले, त्यामुळे जुन्या ओळखी शोधून काढणे, संपर्कात राहणे इत्यादी पासून online काहीतरी शिकणे अशा गोष्टी सवार झाल्या होत्या. त्यातूनच मायबोली या मराठी स्थळाशी गाठ पडली. आणि मग नादच लागला, जवळ जवळ दोन तीन वर्षे पूर्ण बुडून गेले होते. रात्री जेवणे झाल्यावर तास भर तरी नवीन computer वर, नवीन खेळण्याशशी खेळतात तसे सर्व चालू होते. तेथेच गझल प्रकार शिकायला मिळाला. त्यात काही सूर मारता नाही आला पण ओळख नक्की झाली आणि पुढे आपसूकच छोट्या थोड्या फार गझल लिहिल्या गेल्या, माझ्यापुरता. 

या सर्व व्यापात असताना blogging मध्ये बक्षीस मिळवणाऱ्या देव काकांचा परिचय, online च, झाला. त्यांचे तांत्रिक knowledge चांगले असल्याने एकदा मला क्षण हे कवितेत लिहिता येत नव्हते, ते fb वर विचारले. लगेच काका तत्पर मदतीला. नंतर एकदा जलतरंग मध्ये छापायला माझ्याकडून त्यांनी एक पावसावर कविता करून घेतली. ते परखड पणे समोरच्याला चूक असली तर दाखवत, त्यामुळे प्रत्येकाचा विकास होत गेला हे निःसंशय ! माझ्याही बाबतीत ते असेच करू लागले. सर्व ऑनलाईन. 
एकदा त्यांना माझी एक कविता आवडली श्वास, आई वरील, वास्तव वादी. ते संवेदनशील असल्याने त्यांनी तिला लगेच चाल लावून, माझे नाव सांगून, आपल्या blog वर लिहिली. छोटीशी घटना, पण मला खूप काही देऊन गेली. माझ्या मुक्त छंद कवितेचे गेय रूपांतर होऊ शकते हा खूप दिलासा मिळाला व त्या दृष्टीने हुरूप ही आला. 
त्यांनी आपल्या fb account ला स्वत:चा फोटो लावला असल्याने मला त्यांना ओळखता येऊ लागले होते. असेच आम्ही ओझरते एका painting प्रदर्शन वेळी, दादर माटुंगा संगीत कार्यक्रम वेळी अचानकपणे ओझरते भेटलेलो ! 
गंमत म्हणजे एवढीच ओळख असून ही मी त्यांना माझ्या काही कविता पाठवू लागले, ज्यांना चाल लावता येईल असे वाटले. त्यांनी ही निकराने न्याय दिला. माझ्या रचना मुक्त छंदात असून कोणतेही वृत्त आदी न सांभाळता केल्या असल्याने त्यांना चाल लावणे कठीण काम होते, पण त्यांनी ते आवडीने केले, स्वतः चा छंद म्हणून. अशा कितीतरी नवोदित कवी, कवयत्री ना त्यांनी पुढे आणले आहे, छंद म्हणून ! अशी व्यक्ती विरळा. त्यांच्याकडे शिकण्याची उर्मी आहे, त्यातून हे घडते आहे.
कितीतरी दिवस मनात होते त्यांना भेटायचे. तसे एकदा घरी आल्यावर मस्त गप्पा झाल्या. कोणत्या ही विषयावर बोलायची तयारी आणि अतिशय सकारात्मक, सर्व शिस्तशीर ! 
खूप आनंद झाला ह्या भेटीचा. त्यांचा हा छंद असाच चालू राहू दे ही सदिच्छा. 🙏

 पुण्यात एवढे काय आहे की जो जातो तो पुण्य नगरीच्या प्रेमात पडतो.

मला वाटते सुंदर मिलाप आहे जुन्या आणि नवीन विचारांचा. मिश्रण आहे एकत्र झालेले दोन पिढ्यांचे. जागा मुबलक, माती ओढाळ, माणसे अजूनच लाघवी. अरे तुरे करतील तसे अगत्याने  गत संस्कृती चा पाढाही वाचतील. शिकवण्याची ह्यांना खूप खुमखुमी. तेथे गेल्याने अगाध ज्ञानाचा सागर समोर पसरतो. काय काय शिकावे ह्यांच्याकडून? 
स्पष्टवक्ते पणा जो मुंबईकरांना कधी जमला नाही 
स्वाभिमान, जो बाळगण्याची भीती नेहमीच राहिली मुंबई  च्या चाकरमनीला.
चिकाटी, जी मुंबईकराला चिकटलीच आहे आपोआप,  पण नको त्याची ! 
वारसा प्रेम , जे मुंबईकर सांगू शकत नाहीत कारण येथे त्यांना त्यांचीच  ओळख नसते.
संस्कृती दर्शन,  जे पूर्वापार पेशवे काळापासून जिवंत आहे आणि जे मुंबईकरांना दाखवता येणे महा कठीण काम, कुणाकुणा ची आणि कोणती संस्कृती दाखवायची ! 

पुण्यातील अजूनपर्यंत चे आकर्षण म्हणजे मोठाली घरे आणि प्राचीन राजवाडे. ते तर इतिहासापासून पाहिले होतेच पण एकेका कुटुंबाचे ही मस्त जुने वाडे पाहिले की मुंबईकराना स्वप्नात असल्यासारखे वाटते.  जागोजागी छोटी छोटी मंदिरे, देवांना न जुमानता त्यांना ठेवलेली  नावे आणि देवपूजा झाल्यावर पोटपूजेची व्यवस्था म्हणून कोपऱ्या  कोपऱ्यावर टपरी चहा आणि खाद्यगृहे. म्हणजे घरी दारी खाणार तुपाशीच पण उपाशी ही नाही राहणार ! 
धन्य ते पुणेकर आणि त्यांची अजब  जीवनशैली. 
तेथील संगीताचा वारसा, बुद्धिवादी आणि जीवनाशी कोणतीही तडजोड न स्वीकारणारे लोक, खळखळ वाहणारी  नदी, भव्य रस्ते आणि त्यातून आपल्याला हवे तसे बाजी मारून पुढे सरसावणारे पुणेकर ! संध्याकाळी बाजी मारून दिवसाशी दोन हात करून पुन्हा सातच्या आत घरी परतणारे पुणेकर. 
हे सर्व मनुष्य निर्मित आणि निसर्ग संपदा, विचारूच नका. डोंगर कड्यानी भरलेला, trekkers गड्यांचा हक्काचा प्रदेश. थंडीत गुलाबी थंडी आणि उन्हाळ्यात बिन घामाचा पण शरीर कडक करणारा उकाडा. अशी दोन टोके, पुणेकरांसारखीच !  

नाहीतर मुंबई ! 

घेतेय सर्वांना सामावून, मिरवत राहिलीय झेंडा आपल्या उदार अंत:करणाचा. आपल्या वितभर  खळगीची भ्रांत करता करता जमेल तेवढे समाज कार्य करीत. पूर येऊ देत, स्फोट होऊ देत, धमक्या काय आणि अपघात किती, तिला काही फरक पडत नाही ! 
समुद्राचा गाज ऐकत  अखंड वाहणारी जीवन सरिता ! 
येथे आलेल्या प्रत्येकाला आपलेसे करणारी पण तेवढेच प्रत्येकाच्या मनात त्याच्या गावा कडील ओढ कायम ठेवणारी. खरी तर दयनीय अवस्था आहे तिची,  पण वाली कोण ? जो तो आपली तुमडी भरण्यात गर्क आणि येथील राजकारण ! विचारूच नका. मोर्चे, बंद, सभा, घोषणा काय काय ऐकावे तिने. तरीही बिचारी सर्व सण साजरे करते, इमाने इतबारे, साग्र संगीत !  हिच्या जीवावर पूरा देश नाचतो तरीही हिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. का तर ही कुणा एकाची माती नाही ! 
मुंबईने लवकरच पुण्यनगरी पासून काही धडे घ्यावेत असे मात्र वाटते ! 
         अलका काटदरे/ ९.८.२३

 उद्या आपला येतच नसतो तरी

सर्व आपण उद्यावर ढकलतो
कोणत्या विश्वासावर ! 
त्याने तर सर्व अधिकार आज ला दिले
आज ते वापरत नाही त्याला कोण काय करणार
आज म्हणतो आत्ता
आत्ता म्हणतो दहा मोजा घाई नको
करायचे काय ! 
आत्ता, आज का उद्या
अजून परवा आहेच की..
त्याची कोणालाच पर्वा नाही ! 
तो बिचारा वाट पहात राहतो
काहीतरी घडेल ह्याची !! 
25.10.23

 विद्येचा दाता तू , अनाथांचा नाथा

मुले तुझी सारी अन् तूच अन्नदाता
करिशी कृपा आम्हावरी तूच भगवंता
ठेविशी सुखात तूच, आहे अशी वदंता
लक्ष ठेव जरा , विसरू नकोस आम्हा
सेवा करती भक्त गण तूच आमचा त्राता
पिढ्यान् पिढ्या ऐकवतो आम्ही तुझ्या कथा
होऊ देत तुझ्या कृपेने सुकर त्यांच्या वाटा 🙏

 देवा तुझे माझ्याकडे लक्ष नाही

आणि  मी मात्र तुझ्या वर विसंबूनी

मला वाटले तू असशील सर्वज्ञ
का वेड पांघरशी  समजून सर्व

तुझी सेवा केली, ठेविली अपेक्षा
चुकले मी, नाही ठेऊ केव्हा आशा

संत नाही रे मी, माणूस आहे
अती नसले तरी लोभ माया आहे

देवा तू आता कानाडोळा कर
बघेन माझे मी, तुझे काम तू कर ! 

१०.९.२३



 ही भूक नसती माणसाला

तर किती बरे झाले असते
भुके परी वणवण त्याची
राब राब राबणे टळले असते
बळी तो कान पिळी खरे जरी
भूक बळी वाढत गेले नसते
शिकण्याची भूक वेगळीच असते
आजन्म समाधानी आयुष्य मिळते
भूक भूक करून काही मिळत नसते
कष्ट करून ती भागवायची असते
भूक खूप काही शिकवून जाते
पण असते तेव्हा जाळवत राहते
भुकेला मर्यादेत ठेवणे जरुरी असते
केव्हाही ती रेषा ओलांडू शकते

अन्नाची भूक सर्वानाच
भक्तीचा भुकेला एकच
प्रेमाचे भुके आपण सर्वच
अन्नाने भूक भागते पोटाची
भक्तीने आत्म्याची
प्रेमाने मनाची 
भुके साठी दाही दिशा 
त्रिवार सत्य असते

खरेच, ही भूक नसती 
तर किती बरे झाले असते !

   अलका काटदरे/ २३.२.२०२१












 फुकट काहीच मिळत नाही

आणि घेऊ ही नये
शिकलो होतो आपण लहानपणी

सत्य कटू असते पण
नेहमी सत्य च बोलावे
पाठ झाले होते लहानपणी

कुणा त्रास देऊ नये
हिंसा तर नाहीच नाही
आचरले होते लहानपणी

प्रेमाने वागावे सर्वांशी
दया क्षमा शांती ने
माणुसकी होती लहानपणी 

शाळेत घरीदारी सर्वत्र
मोठ्यांच्या तोंडी, पुस्तकात 
हेच तर मंत्र होते लहानपणी

मोठे झाल्यावर असे काय झाले
सर्व चित्र पालटले
आपले लहानपण संपले तरी
समोर लहानगे आहेतच ना

कोणती पुस्तके वाचली ह्यांनी
कोणते मंत्र उच्चारले
कोणत्या मोठ्या शाळेत गेले
सर्वजण हे मोठे होऊन मोठेपणी ! 

अलका काटदरे/ ९.८.२३





 मीच मला माफ केले 

कितीतरी वर्षांनी
हवीत कशाला बंधने
स्वतः वर लादलेली
दुसऱ्याने घातलेली
परिस्थितीजन्य
कायम मागे ओढणारी
हव्यात कशाला स्पर्धा
हेवेदावे , अहमहमिका 
नेहमीच कशाला आपण पुढे
पाहूया की थोडे मागे राहून
थोडे मनन, चिंतन करून 
स्पर्धा स्वतःशीच करून

चुका होत राहतात 
कळत नकळत 
जगी माफी नामा नाही
देवाघरी नाही
मग द्यावी की स्वतः लाच माफी 
सुधारावे दर दिवसाकाठी ! 

अलका काटदरे/ ९.८.२३

 शिक्षा केवढी ही 

भली मोठी
एका चुकीची
मला न कळलेल्या
कदाचित न केलेल्या ही 
केव्हा संपेल ज्ञात नाही
भोगून झाल्यावर तरी
मोकळी होईन ना मी ! 
देवाने योजले असे
Cleansing माझे
मस्त होण्या उर्वरीत जगणे 
आहे देवा विश्र्वास माझा
तुझ्यावर, तू करिशी कृपा ! 

  अलका काटदरे/ ३१.७.२३

 लोकांची पडलेली असते मला

चिंता कशाला कोण ते माझे

ओळख नाही, देख ही नाही
वाहू कशाला आपुलकीचे ओझे

आता भेटू असे ही नाही
राहू कशाला संवाद करुनी रोजे

वाटे कितीदा मला जरी हे असे
संवेदना जागृत अन् मन करिती ताजे 

वेळ काढती वाचायला मला
भावना हिंदोळे ओळखून माझे

क्षणिक का असेना मला पारखती
मांडते विचार वेळोवेळी जे जे

भाव विश्व माझे समृद्ध करिती
ऋणी आहे त्यांची ते नसू  देत माझे

चिरफाड न करता समजून घेणारे
हलके करणारे  सुख दुःखाचे ओझे 

लोकांची चिंता राहू दे अशीच मना
साहित्य त्यांचे बहरू दे गाऱ्हाणे माझे ! 

       -अलका काटदरे/ २५.७.२३









 किती किती लाड केले तुझे

मीच नाही, सर्वांनी ही
लाल काय,पांढरी आणि 
निळी ही फुले
दुर्वा, बेल, तुळस
काही बाकी ठेवले नाही
ते ही रोजच्या रोज 

आज काय संकष्टी, नाहीतर
वेगवेगळे वार आहेतच
श्रावण, मार्गशीर्ष, माघ
रूपे तुझी वेगवेगळी
सर्वांना मानून श्रध्देने
उपास तपास पूजा
होम हवन, नवस
आणि काय काय ! 

काही पोचतच नाही का हे
श्रद्धा, भाव, भक्ती तुझ्यापर्यंत 
नुसताच प्रेक्षक होऊन बसला आहेस
शस्त्रे काही वापरतो आहेस का नाही
पाप्याना धडा शिकवायला
कष्टाळू भक्तांना न्याय द्यायला
सर्वत्र सुख शांती नांदायला
निरामय निरोगी आयुष्य जगायला 

गंजू देऊ नको तुझी आयुधे
अजूनही मानतो आम्ही तुला
सुखकर्ता दुःख हर्ता
प्रत्यक्षात उतरू देत तुझी रूपे 
विश्वास आमचा दृढ व्हायला 
    अलका काटदरे /३०.१२. २१








 गेले कोठे हे तेहतीस कोटी देव 

का नव्हतेच केव्हा अस्तित्वात ? 

खाली विश्वात काय चालू आहे
पाहत बसले आहेत निवांत 

उपाय नाही, प्रतिबंध नाही
फुक्या विश्वासाला काय अर्थ

सेवा करिती रोज अब्ज पामर
सांगती देवांना ठेव सर्वांना सुखात

एकाचे सुख दुसऱ्याचे होई दुःख
लक्ष नसे का काय मागणी प्रार्थनेत

सर्वांच्या पुऱ्या केल्या जर विकृत ही इच्छा
काय उपयोग त्राता म्हणूनी देव मखरात 

चराचर जर तुमचे देवांनो आम्ही मानतो
का नाही ध्यान देऊनी तुम्ही त्याला सांभाळत ?? 
          -अलका काटदरे/२७.७.२३





 आदी वेगळा

अंत वेगळा
प्रत्येकाचा पिंड 
वेगळा 

चण वेगळी
रूप वेगळे 
प्रत्येकाचा धाट 
वेगळा

विचार वेगळा
कृती वेगळी
प्रत्येकाचा स्वभाव
वेगळा

बोलणे वेगळं
चालणे वेगळे 
प्रत्येकाची रीत 
वेगळी 

कारणे वेगळी
उपचार वेगळे
प्रत्येकाचे आयुष्य
वेगळे

सुख वेगळे
दुःख वेगळे
प्रत्येकाची वेळ
वेगळी 

आगळे वेगळे 
सर्वांचे सोहळे
प्रत्येकाचे अर्थ
वेगळे 
अलका काटदरे/ २३.७.२३






 कोणीच माझे नाही

मला कसे उमगले नाही

कोणती तारीख असेल ती 
मला ही कसे माहीत नाही 

आज आहे उद्या नसेन
कुणाला का समजत नाही

माणूस पारखा माणसाला
अहंकार कसा संपत नाही

तारुण्य सरले अचानक
तरीही मना कसा पोच नाही 

मनाची होई तडफड 
मन का तरी मरत नाही 

निखळला एक बिंदू
कुणाला काहीच भ्रांत नाही 
    अलका काटदरे/ २४.७.२३




 दुसऱ्यासाठी   जगायचे तर  त्यांना गरज नाही

स्वत;साठी जगायचे, पण  तसा स्वभाव नाही
काय करावे, काही कळत नाही.
        कुणासाठी थांबावे तर वेळेवर पोचणे नाही
        एकटे एकटे निघावे तर सोबतीचे सुख नाही 
झेप घ्यावी म्हटले तर दोर माझ्या हाती नाही
तळ गाठावा म्हटले तर दलदलीचा भरवसा नाही 
          पुढे जावे वाटले तर पाठीमागे कोणी नाही
          पाठी वळून पाहावे तर हाती काही लागत नाही 
मैत्री करता एकाशी दुसरीकडे मैत्र नाही 
नाही नाही म्हणता एकी कोठेच दिसत नाही 
          थोडेफार बोलले तरी तोंड काही लपत नाही 
           मौनापरी श्वासाला मोकळी वाट मिळत  नाही 
केल्याने होत आहे रे, समजत का नाही?
चांगले /वाईट  मनाला माहित का नाही?
काही   म्हणा, काय करावे काही कळत नाही 
          अलका काटदरे/ २१.२.१४

 पाऊस आला की

काय काय घेऊन येतो बरोबर ! 
थंड वारा पुढे पाठवतो
मागून येतात भजी, चहा
हे झाले भौतिक

लोणचे, मऊ भात
गोधडीची ऊब
आणि साजूक तूप
सोबत गप्पा मौलिक

तळलेले गरे
गरमागरम वडे
अंगणात शुभ्र
प्राजक्ताचे सडे

पाऊस आला की मने चिंब
ओथंबून येती आठवणी
जरी धरती  बदले रंग !

नित्य नियमाने येणारा
आसमंत मोहरुन टाकणारा
कधी माफक कधी सैराट
तरीही वाट पाहे चराचरी चातक !
      अलका काटदरे/२७.५.२१

 वादळ येते तेव्हा

सारे सारे धुऊन नेते

लहान मोठे
बरे वाईट
खिडूक मिडूक

वाऱ्याला बोलावते मदतीला
घोंग घोंग आवाज करीत
हळूहळू शांत होते

वादळापूर्वीची शांतता वेगळी
आणि नंतरची अजून वेगळी
भयाण, निरव, आशावादी
माणसा गणिक निराळी

काय आहे न काय नाही
पाहायला लावणारी 
अस्तित्वाचा शोध घेणारी ! 
May22,23

 जन्माला येतच असते 

कोणी ना कोणी
केव्हा ना केव्हा कोठे ना कोठे
घरात, हॉस्पिटल मध्ये, 
ट्रेन मध्ये , विमानात तर
कोणी रस्त्याच्या कडेला ही

जन्म केव्हा सहज तर 
केव्हा प्रयत्नांती
कुणाला हवा तर कुणाला नको 

मरण ही तसे येते हमखास
अचानक, क्वचित सांगून 
केव्हा घरच्या घरी
हॉस्पिटल मध्ये, रस्त्यात,
अपघातात, आगीत, गुन्ह्यात 
किंवा रणांगणावर, हल्ली तर
इच्छा मरण ही ! 

बातमी होते मृत्यू ची
कसा झाला त्याची
ठरवली जाते त्यावरून
व्यक्तीची जीवनशैली

जन्माची मृत्यूशी चाललेली
अविरत अशी लढाई
जिंकू किंवा मरू  ? 
                         नाही !!
मरणानंतर ही जगायचे
अविरत निस्वार्थी कार्य रूपे
कुणाला न  हरवता, न रडवता,
हसता हसता 
जन्माचे  सार्थक करून,
जन्माची सांगता करून ! 
    अलका काटदरे/१०.१.२२







 त्याला भेटण्याची नसे कुणा आस

खबरदारी घेतात,  तो येऊ नये म्हणून पास

भेटायचंच आहे तर सुस्थितीत भेटावे ही इच्छा

त्यासाठी भले लोक मार्ग स्वीकारतात सच्चा

म्हणून मला वाटते, प्रत्येकाने-

एकदातरी त्याचे ओझरते दर्शन घ्यावे

एकदा तरी त्याला स्पर्श करून यावे

त्याच्या दरवाज्यात झाकल्यामुळे

तेथे जाणे किती सोपे आहे हे कळते

आपण त्याच्यापासून दूर नाही तसे

तो ही आपल्या सामोरे आहे, हे ही लक्षात येते

आयुष्याचा अर्थ तेव्हाच गवसतो

मनातील मनोरे व्यर्थ ठरतात

कार्य रथाचा पट समोर उभा ठाकतो

गात्रे पटापट कामाला लागतात

दिल्या घेतल्याचा हिशेब चालू होतो

आपण कुणाचे देणे नाही ना,

खात्री करू लागतो..

म्हणून म्हणते हे ओझरते दर्शन

खरेच चांगले असते -

कारण -

त्याच्याशी झालेल्या झटापटी नंतर

मनाची पूर्वतयारी होते

अनुभव गाठीशी राहतो

त्याने surprise visit दिली तर

आपण न डगमगता त्याला सामोरे जातो

आणि मनाची समजूत घालतो -

श्रेय हे सर्व विधात्याचेच  आहे

त्याने मात्र हे सर्व घेणे आहे

माझे माझे म्हणणे सर्व फोल आहे

त्याच्यात विलीन झाल्यावर

उरणार फक्त नाव आहे

नावाला उपाधी कोणती द्यायची

हे उर्वरित जनता ठरवणार आहे !!

- अलका काटदरे / मकस 20.4.20

(प्रसव date February 2007)

 एकट्याचे नाही हे माझे

माझे असे काहीच नाही

चांगले  जे झाले ते 
तुम्हा विना शक्य नाही 

आई वडील, जोडीदार अन 
मित्र मैत्रिणी तथा मुले

नातलग, शेजारी सामील त्यात
सर्वांची मी उपकृत 🙏

चुका झाल्या असतील नकळत 
मला तेव्हा उमजले नाही

माफी मागते देवाकडे
पुनश्च असे होणे नाही

दिलदार सारे तुम्ही सुद्धा
क्षमा मला टाका करून 🙏
      अलका काटदरे/२६.४.२३




 वेध लागले तुझे रे

मला वेध लागले
वेडी मी केव्हाच नव्हते
होणार ही नाही
तुझी रीत का मला 
माहित नाही ? 

पण हे मळभ
हे आकाश, हा वारा
मध्येच शिडकावा 
हा आसमंत
सारे सांगतो
तू आसपास ! 

नको रे
एवढ्यात खरेच नको
आठवण बास आहे
उन्हाळा खास आहे
असू दे स्वस्थ धरा
शांत तिच्या विश्वात

तू तुझ्या वेळेला
येऊन बरस कसा
तूही आनंदी व्रतस्थ
आम्ही ही सारे मस्त
धरा नहायला सज्ज
सलाम करिती अब्ज ! 

   अलका काटदरे/२७.४.२३

 कशी मी सावरू

मनाला आवरू

मन बसते रूतूनी
कधी उडते नभी
कधी भटके लोभी
किती चंचल नाभी ! 

असे मुळात सज्जन
माणसाचे लोभी
निसर्गाशी मैत्री
शब्दांचे भक्त पामर ! 

परमेश्वरी श्रद्धा
कुणाची नाही निंदा
सकली असे कौतुक
मन तरी हे अस्थिर ! 

कसे. मी आवरू
मना तुला सावरू !! 

26.4.23

 टक्क जागे दोन डोळे

समोर पाहती तमातून
बाहेर एक झाड आहे
लालबुंद सूर्य उत्सूक आहे
दर्शन देण्या झाडातूनी

पूर्ण माझा भूतकाळ
अंतरंगी  मात्र उभा आहे 
सोनेरी चंदेरी नाही
पण प्रेमाने ओथंबलेला
कौतुकाने भारलेला

घर, माता पिता
भावंडे कितेक प्रेमळ 
पोषक सारे वातावरण
शाळा गुरुजन गुणी
मित्र वर्ग सालस

पुढे जाऊनी शिक्षण
रोजचेच नवे धडे
प्रसन्न मनी रुजवले 
अनुभव गाठीशी
संसाराला मदत पडे

अजून काय हवे जीवा 
देऊन झाले पुढच्या युवा
समाधान असे मनी
खेद खंत असे अल्प जरी
असतोच तसा पामर जीवा 

वाट पाही येत्या दिवा
काय घेऊन येशी जगा
होऊ देत स्वप्ने खरी 
ऐक्य शांती पसरू दे
समृद्धी राहो दिवस नवा 

टक्क जागे दोन डोळे
समोर पाहती तमातूनी
वाट ही पाहती निद्रेची
प्रसन्न चित्ते विसावूनी ! 

 अलका काटदरे/३१.३.२३














 डोळ्यात झोप नाही

मन ही चोख नाही

दिवस संथ जाती 
काहीच काम नाही

थांबू कशी कुठे मी
माझ्याच हाती नाही 

विरली केव्हा न कशी
स्वप्नात बळ नाही

हुरूप देती सर्व
पूरी मी पडत नाही

उद्या असेल वेगळा
आशा  संपत नाही ! 
       अलका काटदरे/ २५.३.२३

 चार ऐकतील दहा बोलतील

नवनवीन ज्ञानात भर पडली तरी 
कुणावर ही केव्हा विसंबून चालणार नाही 

एकेक पाऊल दक्षतेचे
उचलेले होते आनंदाने जरी 
एका पावलावर नाचून आता चालणार नाही 

सगळेच दिवस सारखे नसतात
ऐकले होते, अनुभवले होते तरी
रंग दिवसांचे लक्षात ठेऊन चालणार नाही

रात्रीचा दिवस केला काय नाही काय
दिवा स्वप्ने ही रंगविली होती कितीतरी 
दोघातील फरक विसरून तरी चालणार नाही 

तारुण्य आहे जोपर्यंत आजारपण नाही
आल्या दिवसाचे स्वागत करायचे म्हटले तरी
ऊर्जेला मनीच्या गृहीत धरून चालणार नाही

पोटासाठी वणवण, पोटासाठी सारे काही
पोटात सारे सामावून घ्यायचे म्हटले तरी
त्यालाही परीघ आहे हे विसरून चालणार नाही 

मरणात खरोखर जग जगते
बोलून गेले एकदा भारी भा.रा. तरी
जगण्याला कमी लेखून कधी चालणार नाही 

March 13,23

 तुला मी इतकी प्रिय होते तर

अलगद मला न्यायचे होते

हुलकावण्या दाखवल्यास किती
तरीही मी मस्त मजेत होते

आताही तुला नाही नमणार 
लिहून तू ठेवायला हवे होते

व्यर्थ प्रयत्न करण्या आधी 
मला अजमवया हवे होते

पंख मी लावून आहे कधीची  
अलगद मला उडायचे होते ! 

26.2.23

 डोळ्यांत मरण घेऊन फिरते मी

अशी कितीतरी पाहिली होती

पाहू नका मला कोणी
जरी नजर भेट झाली नव्हती

राहू नका अवलंबून कोणा
सुभाषिते सदा गिरवली होती

काम करा, पुढे निघा 
पाऊले कधी रेंगाळली नव्हती

दिवस रात्र एकच विचार
वेदनेला कोणाची साथ होती

पत्ते बदलले किती जरी मी
मनी स्निग्ध स्थिरता होती 

नेहमीच माझा पहिला नंबर
सातत्याची सवय जडली होती 

होती आणि नव्हती विसर जीवना
तुझ्याकडून अपेक्षा मात्र चूक होती !


26.2.23

 प्रेम तुझे माझे राही

विश्वाच्या ही अंती
एकेक क्षण जगू 
एकमेका संगती

रात्र थोडी सोंगे फार
असे असले तरी
एकेक श्वास घेऊ
रोज नव्या काती

प्रेम असे दया माया
प्रेम असे ममता
निस्सीम प्रेमा पोटी
विविध भाव बसती

प्रेम दोन शब्दांचे 
जन्मी सार्थ करू 
चालू बिकट वाट जरी 
घेऊनी हात हाती

खेळ खेळू मनोभावे
दुःख सारे विसरुनी
साथ सोबत अर्थ सांगू
लावूनी प्रेम वाती

प्रेम तुझे माझे बरसे
धरतीच्या अंगणी
आसमंत हर्षित होई
दिशा दिशा उजळती

प्रेम तुझे माझे राही 
विश्वाच्या संगती ! 
एकेक क्षण जगू
निर्मून नवी नाती ! 
     अलका काटदरे/१३.२




 सर्वांना सोडून  जायचे म्हटले म्हणजे

मन कसे भरून आणि भरभरून येते

साऱ्या जुन्या कडू गोड आठवणी
नेतात त्या थेट बालपणी 

माझी शाळा, माझी पुस्तकं, माझी मैत्रीण
माझे गुरू, माझ्या सख्या

पुढे जाऊन माझे कॉलेज, माझी नोकरी,
माझे छंद, माझा संसार, माझा व्याप
सारे कसे माझे माझे होऊन जाते ! 

पण खरेच हे सर्व 'माझे' असते का ! 
किती गोड गैरसमजूत असते ती

मी ह्या सर्वामधील एक छोटासा भाग
स्वतः निर्माण केलेला, माझ्यापुरता  ! 

ह्या वर्तुळातून मला वजा केले तर
ते वर्तुळ तेवढेच राहणार आहे सर्वांचे
आणि मी जाणार अजून एका वर्तुळात !!

निसर्गाची किमया किती अगाध आहे
आपण वजा होतो तेव्हा कवाडे बंद होतात
साऱ्या जाणीवांची , सुख दुःखांची
हे ही एक सुखच नाही का, जातानाचे !! 
Feb.13,23

 आली आली दिवाळी 

राहतो आपण म्हणत
सगळीकडे लगबग
कधी दोन दिवस तर कधी चार
नाहीतर सहा दिवस
पण निघून जाते चटकन
मन खट्टू होते खरे
देऊन जाते ती अमाप,  बरे
नात्यांचा गात गोडवे
विसरून सारे रुसवे फुगवे
मायेचे माहेरपण
भावाची पाठराखण
मित्रांच्या गाठीभेटी
शाळेला ही सुट्टी
प्रवास मस्त निवांत
वर्षभराची उसंत
जावा नणंदा यावेळी मात्र
करती कुटुंब एकत्र
पदार्थांची रेलचेल
सुगरणी सर्व आलबेल
कुठे पहाट, कुठे संध्या
कुठे दीपोत्सव 
तर कुठे महोत्सव
कोणी साधती मुहूर्त
कोणी काढीती अर्थ
वाचनीय दिवाळी अंक 
भरीस भर पुस्तक संच
रांगोळ्यांचे नमुने
प्रसन्न करती मने
आली आली दिवाळी 
आठवण देई वेळोवेळी
राही ती बिलगून मनी
आणि जाई निघून जनी !! 
       अलका काटदरे /२७.१०.२२

 उसंत मिळाली की घालते टाके चार

थोडे उभे थोडे आडवे
कधी उलटे कधी सुलटे
जीवन पट मग सजून जातो छान
आपलीच कृती आपलीच मांडणी
नमुने कितीतरी होतात तयार 
उसवला एखादा तर घेते नंतर वर
लक्ष मात्र लागते प्रत्येक ओळी वर
टाके कधी रिपीट, कधी परत
येतो कामाशी मग अनुभव फिरत
जीवन पट विविध रंगांचा
मिसळून गेलेल्या टाक्याचा
मेहनतीने केलेल्या मांडणीचा
19.10.22

 कुठे चाललो आहोत आपण 

घेऊन ही ओझी
वर्षानुवर्षे तीच ती

ओझी होती का,  झाली ?
जीर्ण का अजीर्ण
केली का करवली
हवीत का नकोत
साध्य का साधन
सर्व काही न जाणत

आहेत ती अमूल्य
पण केला तिचा बाऊ
थोडी थोडी न सोडता
घट्ट धरून ठेवली
आता होताहेत डोईजड
आणि नकोशी

काय करायचे त्यांचे
द्यायला नकोत का
पुढच्या पिढीला
जरूर तेथे शिवून
ठिगळ लावून
नक्षी काम करून ? 
8.8.22

 तुझा विचार मनात येताच 

मन अगदी हरखून जाते
जेव्हा केव्हा निराश होते
मन कधी खट्टू होते
आशेची पकड ढीली होती
प्रयत्न तोकडे पडतात
एकटेपणा अंगावर येतो
समोर रस्ता दिसेनासा होतो
तेव्हा फक्त तू दिसतोस
आणि  वाटते
झेपावे तुझ्याकडे
सारे सारे विसरून शिरावे 
तुझ्या पाशात चिर निद्रेसाठी !
आपले नाते आहेच असे विश्वासाचे
मी म्हणजे खळाळणारे जीवन
आणि तू साक्षात ! 
समोर दोन्ही बाहू पसरून राहिलेला ! 
तुझे खरेच अनंत आभार
मनाला तुझा खूप खूप आधार 
   @अलका काटदरे/ 30.7.22




 बदाम खाल्ले असते तर

झाले नसते का मी माठ

मनुका खाल्ल्या असत्या तर
झाले असते का मी सुंदर

सौंदर्य दडले होते  सुविचारात
बुद्धी मोजली गेली होती मार्कात

होते कोठे एवढे अगाध ज्ञान
आज्ञा पाळून अभ्यास हे एकच ध्यान

माणूस जोडणे व्यवहार ज्ञान
हेच होते सुखी आयुष्याचे दान

माठातल्या पाण्याला गोडी होती
लांब शेपट्याची थोरवी होती

व्यवहार दिसत होताच सर्वत्र
कलह औषधाला ही नव्हता मात्र

बदाम आता खाते रोज चार
मनुकाही विचार न करता सारासार

बुद्धी होती ती आणि आताची
सौंदर्य होते ते आणि आताचे

करता येईल का दोहोंचे माप ! 
@ अलका काटदरे/२२.३.२२










 चहाचे कप-

किती वेगवेगळ्या प्रकारचे
पण सर्व हातात धरता येतील असेच ! 

स्टील,चांदी, काच, प्लास्टिक
फुटणारे, न फुटणारे ,
कान मात्र हवा त्याला
सर्वांचे सगळे ऐकून घ्यायला !

चहा त्यातील किती प्रकारचा
साखरेचा, गुळाचा, मधाचा
आले घालून तर कधी तुळस
पुदिना ही चालतो केव्हा केव्हा

चहा करतो मदत नेहमी
आजारात, गप्पात
वेळ घालवायला आणि वेळेला ही !

चहा झाला आहे आधुनिक
लिंबू चहा, बिन साखरेचा, बिन दुधाचा
ढवळून काढतो सारे केव्हा केव्हा 

चहा असतो सर्वत्र
ताज मध्ये आणि टपरी वर ही
अमृततुल्य आणि उकळून अर्क झालेला ही
जशा गप्पा तसे  ठिकाण आणि तसा स्वाद

चहा पाहतो सगळी वादळे
शमवतो त्यांना दोन चार घोटात
बशी हल्ली नकोच असते 
वादळे पसरायला ! 

चहा म्हणे पित्तकारक
सकाळचा थोडासा घेतला तरी
अती गोष्ट केव्हाही वाईट
मोठी वादळे कोठे हवीत, त्याला तरी !!


27.2.22

 अमर कोणाला व्हायचे आहे

नक्कीच नाही कोणाला
वर नाही तो असे एक शाप

हिंडून फिरून हसून
मनमुराद जगायचे
वेळ आली की मग
हळूच निघून जायचे

वेळ ज्याची त्याची
प्रत्येकाला उमगे
गात्रे जेव्हा साथ नाकारती
असहाय, परावलंबन 
शब्द जेव्हा मनी येती

धट्टे कट्टे सदा राहायचे
नीट नेटके आचरण ठेवायचे
विचार असतात जरी पक्के
सैल सोडून वागायचे हटके

जमवून घ्यायचे म्हणजे काय
स्वतःशी, दुसऱ्याशी, सार्यांशी
मुरड घालायची थोडी
परंपरेला, रुजलेल्या समजुतींना
सामावून घ्यायचे नव्याला
नव्याने आलेल्या बाल्याला

मरणातून जगायचे
कृतीतून दाखवायचे
जीवन हे मरण नव्हे
मरण हे संकट नव्हे
पेरून ठेवायचे धन
आचारांचे, विचारांचे
मागे ठेवायचे नाव
आपल्या कृती,कार्याचे ! 

12.2.22

 सध्या जगणे एवढे

एकच काम राहिले आहे.
त्यासाठी काढे,मेवा, 
फळे आणि पालेभाज्या
व्यायाम, ध्यान, diet आणि 
तऱ्हे तऱ्हेच्या थेरपी
ते कमी पडल्यास औषधे
वेगवेगळी आयुर्वेद, होमिओपॅथी
आणि अखेरीस allopathy.
एवढे सर्व करून जगून
करायचे काय
समोर काहीतरी ध्येय पाहिजे ना
आणि हे प्रयत्न कशाला तर
शेवट पर्यंत स्वावलंबी राहायला

अर्धवट राहिलेली स्वप्ने
साठून राहिलेली कामे
पुऱ्या न होणाऱ्या गाठी भेटी
आणि गप्पा गोष्टी
शेवटी काय
आनंद मिळवणे हेच ध्येय

मग मिळवू की रोजच्या वागण्यात
बोलू छान छान,  वाचू छान छान
गाऊ छान छान, नाचू छान छान

अंत ठरलेला आहे
त्याची वार्ता च कशाला काढायची 
आणि तो एवढ्यात बोलवायचा कशाला
लांब ठेवायचा त्याला 

आत्ताच चेहरा पाडून राहिले तर
त्याला आपली दुर्बलता समजते
आणि त्याला हेच हवे असते !
आनंद असेल तेथे तो फिरकत नाही
हे लक्षात ठेवायचे ! 

दिवस हसून साजरा करायचा 
जमेल तेवढे स्वावलंबन करून
शेवट पर्यंत ! 
3.2.22






old age is Gold Age

 So rightly said ! Age is just a number. Never young or old, it all depends on your lifestyle. In one's thirties, one may do nothing and in eighties someone may perform live concert or go for treks or practise profession. 


Thus once one becomes senior citizen in civic sense, he or she possesses maturity, variety of experiences, ups and downs in  journey so far and on the peak of life ladder. It's descending stage in terms of life span, agreed ! But one can share knowledge, experience with juniors, fellow friends, inspire others by maintaining disciplined routine. 

Now is the time one looks at life with full perspective, open eyes, ears and calm mind. 
Do the things which were pushed in one corner of mind for paucity of time. Now one can devote fully to family, if need be or can travel around  world, with nature. Can see friends, cultivate or develop hobbies and pass each day with satisfaction. If for any reason home bound  or sick , one can take support, amply available these days and get back on track, can read and virtually take happiness of roaming in  world of one's choice. Mobile revolution has brought the world closer, where one can remain active always. 

Gold always shines and never loses value. Same way a senior citizen possesses inbuilt gold, which one can keep on polishing by full enthusiasm and by remaining active with variety of choices !!

10.5.22

 मला येत काही नाही 

असे नाही म्हणायचे
कधी ना कधी तरी 
काहीतरी नक्की जमणार 

पैसा नव्हता पुरत तेव्हा
वेळही नव्हता मिळत 
आता वेळ भरपूर आहे 
आणि पैसा पुरे आहे
आता कर मनातले 
तुझ्या जगून जागून

मन जागे झाले की 
ध्येय समोर दिसणार
स्वप्न होणार जागे अन 
मार्गाला लागणार
एक जपलेले  स्वप्न 
अंती साकार साकार

काल निघून गेला तरी
आज आपल्या हाती
असे उद्याचा प्रकाश
रात्रीच्या काळोखी
चक्र नेहमीचे जरी हे
स्वप्ने असती नवीन 

मला जमले काही नाही
असे नाही म्हणायचे
मिळालेल्या वेळेत 
भरपूर सारे करायचे ! 

15.1.22

 किंमत कळते आहे एकेक श्वासाची

मंदाऊ लागली जशी हालचाल भात्याची

किंमत कळते आहे प्रत्येक व्यक्तीची
जेव्हा सोडून जाते व्यक्ती एकाकी 

किंमत आली आहे सर्वानाच आताशी
जुन्या पुराण्या औषधांना ही खाशी

किंमत होते आहे बाजारी या सर्वांची
व्यक्ती, वल्ली आणि  मूल्यांची

आरोग्याएव्हढा किंमती दागिना नाही
किंमत केली श्र्वासाची  तर 
दुसरे  महान पाप नाही ! 
    
11.1.22

 मन तरल तरल

भावना नाहीत विरळ
एकदा आल्या मनी
कि राहिल्या विखरून

मन चंचल चंचल
एक विचार नाही स्थिर
एकदा का आला मनी
कि राहिला झुल्यावर

मन माझे बावरे
पण खात नाही उचल
एकदा झाला निश्चय
कि असे मन थाऱ्यावर ! 

मन वळून थोडे पाहे 
काही अधिक तर उणे
एकदा घातला आवर 
कि येई मन रुळावर! 

3.1.22

 आढावे घेऊन झाले

आलेख काही चितारून
मागे वळून झाले
पुढे जरासे डोकावून
पसारे आवरून झाले
अजून ही थोडे करून
उत्तरे शोधून झाली
प्रश्न नवे निर्माण करून

पहिलाच दिवस वर्षाचा
घ्या सर्व काही करून
मनाची थोडी  उलथापालथ
पहा विश्रांती थोडी घेऊन

काल होता, आज आहे
उद्या नक्की येणार आहे
आणि तो आपलाच आहे

लागा कामाला उद्यापासून 
भविष्यावर नजर रोखून ! 
उद्यावर ठाम विश्वास ठेऊन ! 
1.1.22

 कोरोना कोरोना म्हणत

घेतली काळजी वर्षभर
स्वतःची आणि कुटुंबाची
शरीराची आणि मनाची

कोरोना कोरोना करत
फिरले इथे आणि तेथे
सर्व कागदपत्र बाळगत
राखीव जागा हुंदडत

कोरोना कोरोना सांगत
घेतल्या भेटी गाठी सर्वांच्या
वेगवेगळे मास्क घातलेल्या
वर्षानुवर्षे भिजत पडलेल्या

उपास दिशी दुप्पट खाशी
मनमुराद हिंडले तशी
थोडी माझ्या ही भोवती
काल आज आणि उद्याची
सांगड घालत कशी

जे केले नव्हते ते
जे बनवले नव्हते ते
जे विचारात घेतले नव्हते ते
जे उद्यावर ढकलले होते ते
सर्व काही केले बनवले
सीमित परिघात होते जे

कोरोना कोरोना बोलत
झाले सारे करून
सर्व क्षेत्री वावरून
वाट पाहत आहे आता
त्याच्या निर्मूलनाची
परीघ माझा वाढविण्याची
आज ला मुक्त करण्याची !!
     अलका काटदरे /27.12.21



 बारा महिने येतात एकामागून एक 

ठेवून जातात गुच्छ आठवणींचा अनेक

बारा महिन्यांचे विविध रंग
नसतात कधी  एकमेका संग

एकेक महिना 
येतो विविध कोडी सोडवत
सुप्त गोष्टी उलगडत
वेळ झाली की जातो धावत
एकेका रूढी ला अर्थ लावत

एकेक  महिना 
असतो तसा रमत गमत
करतो भरपूर गंमत जंमत
सुख दुःखाचा शिडकावा देत 
जातो अनुभव पक्का करत 

एकेक महिना
देतो धडे,  प्रत्येकाला
लहान आणि मोठ्याला
बारीक सारीक गोष्टींना
महत्त्व प्रत्येक क्षणाला 

शेवटचा येतो होऊन रंगेल
घेऊन रंगत भेटीगाठींची
लावून जातो चूक चूक
राहून गेलेल्या गोष्टींची

दाखवतो चाहूल स्वप्नांची
पुढील वर्षाच्या आगमनाची
पिसारे फुलवून ध्येयाचे
मना देतो उभारी  आशेची ! 
     @ alkakatdare 26.12.21







 जो घाबरे मृत्यूला

यम घेऊनी जाई त्याला
जो सावरे स्वतःला
कर्म बांधुनी ठेवी त्याला

येता जाता रडत राही जो
पिडा सोडी नाही त्याला
संकटावर मात करी जो
मस्त आयुष्य वाटे त्याला

संवाद साधे मनी जो
भेद ना दिसे केव्हा त्याला 
वास्तवाला स्विकारी जो
रोज सुंदर वाटे त्याला

 आपल्याला  स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली आणि हे वर्ष आपण अमृत महोत्सवी म्हणून साजरे करत आहोत. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्या वर त्यातील बदल जाणवून घेण्यातच तसेच आपल्या विविध घटना तयार  करण्यात  पाच दहा वर्षे गेली. नंतर ते स्वातंत्र्य आपण अनुभवू लागलो. काही वर्षांनी  स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी काळाआड गेली आणि आपण उरलो. ज्या पिढीला फक्त इतिहास रूपाने स्वातंत्र्य संग्राम माहित झाला. 


आपणा सर्वांना सुंदर भारत अपेक्षित आहे. सुजलाम, सफलाम,  विविध भाषांनी नटलेला, अती सुंदर निसर्गाने नटलेला, भारत पूर्वी पासूनच आहे आणि त्यात बदल होणार नाही. 
त्याचे संवर्धन करणे जरुरी आहे आपल्याकडे मनुष्य बळ रुपी प्रचंड ऊर्जा आहे, तिचे योग्य दिशेने उपयोग करून घेतला पाहिजे.  सर्व भाषा, प्रांत एकमेकात मिसळून जाणे अपेक्षित  किंवा शक्य नसले तरी त्या सर्वांनी गुण्या गोविंदाने भारताच्या विकासाकडे पूर्ण झोकून देणे आवश्यक आहे. आपला भारत 75 वर्षी ही विकसनशील आहे, तर तो आता विकसित म्हणून घोषित व्हायला पाहिजे, त्यासाठी आपली सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे. महत्वाचे म्हणजे विविध राजकीय पक्ष हे फक्त हेवे दावे पेक्षा एकत्र येऊन उज्वल भारत कसा अजुन संपन्न होईल असे चित्र तयार झाले पाहिजे. 75 वर्षीय भारत हा सुख समृद्धी बरोबर अतिशय शांतप्रिय झाला पाहिजे. नव नवीन घोषणा होतात त्या प्रत्यक्ष अमलात आणल्या गेल्या पाहिजेत. अजूनही भ्रष्टाचार, अबलांचे शोषण, राजकीय, सामाजिक फूट, गरिबीचे बळी, पर्यावरण rhas होताना दिसत आहे. हे थांबले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक जण आत्म निर्भर राहून प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीचा माणूस म्हणून  आदर ठेवून वागला पाहिजे. आपल्या संस्कृतीचे खऱ्या अर्थाने जतन केले तर हे सहज शक्य आहे.

आजचा वर्तमान हाच पुढें जाऊन इतिहास होणार आहे. त्यामुळे आपण जर भेदभाव न बाळगता सर्वांनी एकजुटीने एकच लक्ष्य ठेवून प्रगती करण्याचे ठरवून वागलो तरच भारताचे हे चित्र साकारले जाईल आणि पुढची पिढी सुद्धा तशीच शिस्तीने वागेल. 
थोडक्यात 75 वर्षांचा भारत अनुभव संपन्न, जगाला शांततेचा आणि सर्वांगीण प्रगतीचा, सर्वार्थाने स्वच्छ  होऊन प्रत्येक भारतीय शांती दूत झाला पाहिजे. 
2.10.21

 थांब थांब पावसा थांब

          आता तरी थांब
मनमानी झाली तुझी
झाली दाणादाण
आता तरी थांब

इकडे तिकडे बघ जरा
भरू नकोस कान
आता तरी थांब

जून सरला ऑगस्ट आला
हवा झाली छान 
आता तरी थांब

खेळ झाला खरा तुझा
उठले सारे रान
आता तरी थांब

थांब थांब पावसा थांब
आता थोडा थांब !
17.7.21

 ठरवले होते  कविता नाही लिहायची

सुखाची किंवा दुःखाची ही
कल्पनेला कशा वाट द्या
कुठेही जाऊन आदळली तर
आणि तो मोठा दगड असेल तर !

दगड धुतला जाईल हे खरे आहे
पण पुन्हा धूळ साचेलच ना
भावना काय कल्पना काय
दोघी एकमेकात अडकलेल्या
दगडाशी त्यांचा काय संबंध
आणि दगडाने का लक्ष घाला

राहू दे कल्पनेला शांत उरात
भावना समजून घेऊन क्षणात
दिवस जातील असेच सुखात
फुलून राहील मन उगाच ! 


21.6.21

 वाटले नव्हते आपलेच करतील असे बंड

हात,  पाय आणि  मन सुद्धा  धुंद !
       किती पुरवले होते त्यांचे लाड
      साथीसाठी नाही भरली त्यांची धाड
हळूहळू लक्षात येत आहे
जराही मनी डोकावले नव्हते
      नाही हलवले होते हात पाय रोज
      नाही केला मनाला केव्हा मसाज
अजूनही गेली नाहीय वेळ
पाहून घेते त्यांचे सर्व खेळ 
      मोडून काढते बंड बांधुनी चंग
      व्यायाम मोजका हलवून सर्वांग
बैठका, नमस्कार आणि कवायती 
खुराक रतीब रोजच्या रोज
      श्वासावर लक्ष तर हवेच हवे
      दीर्घ, हलका सर्वच जमेल तसे
आत काय जाते, फेकेन नको ते
दम भरेन मोजकाच अन् प्रेमाते
      बंड त्यांचे तशी आता  माझी मांड
      नाही म्हणून पडू देणार त्यात खंड !
            अलका काटदरे / २१.६.२१
    ा

 जवळ पासचे लोक दिसेनासे झाले तसे

होऊ लागली जाणीव  स्व च्या असण्याची 
भरपूर सारे मिळालेले उपभोग घेतलेले
नव्हती आजपर्यंत उणीव जराही कशाची
दिले का आपण कुणा गरजू ला काही
दोन दिवस त्याचे सुखात जायला, ह्याची
मागत नसते कुणी दानत असावी लागते
कुठेतरी परतफेड थोडीतरी, घेतल्याची
देणे हा स्थायी भाव का नये अंगिकारू
लज्जत वाढवाया आपुल्याच जगण्याची ? 

 रंगांचे वेड केव्हा लागले माहित नाही

गर्द हिरवा, पांढरा शुभ्र, मोरपिशी,
अबोली, नारिंगी  आणि  आकाशी

लहानपणी वर भव्य आकाश
बाबांचा सदरा आणि गणवेश
शाळा आणि घर हीच वेस
अभ्यासाचा ध्यास ही बाजू जमेस

थोड्या मोठ्या दुनियेत आल्यावर
रंगच रंग, काळे पांढरे ही सोबत
नाजूक, मनमोहक रंगीत फुले
त्यावर  भिरभिरणारी फुलपाखरे

सर्वच मोहमयी, रंगीन.
स्थिर निसर्गात अस्थिर मने
मनामध्ये सजले इंद्र धनुष्य 
स्थिर झाले अस्थिर आयुष्य
वाटेवर उधळीत रंग 
सज्ञान झाले रंगाचे वेड !

6.5.21

 काय बरोबर काय चुकले

विचार करायला वेळ आहे का
चुकलेले समजले तर
सुधारायला वेळ आहे का 
सुधारलेले मान्य केले तर
आत्मसात व्हायला वेळ आहे का 
वेळात वेळ.काढला तर
दुसऱ्याचे ऐकायला वेळ आहे का
ऐकायला आहात  तयार तर
बोलणारे आहेत का
बोलणारे राहणार बोलत
स्वतः लाच समजायला नको का ! 

5.4.21

 कित्ती छान कशाला कोणी बोललेच नाही

झुपकेदार शेपटा तिचा कोणी पाहीलाच नाही


आला गेला गाणी बजावणी अजुन काही
सुस्कारे तिचे  कोणी केव्हा ऐकलेच नाही

राबणे जसा  तिचा जन्मसिद्ध हक्क राही
जीभ त्यांची बोलण्या तिला फक्त पाही

राहिली नाही ओळख रक्तास कोणत्याही
बलिदान हे फुकट तरी  वाटलेच नाही

राहावयास मन, खावयास शब्द 
प्यायला कोळून लाज उरलीच नाही ! 



 सोहळे लशीचे

एक घेतली का दोन
ही  का  ती
कोणती चांगली
कोठे सोयीची
विचारच भरपूर !

अंग दुखेल ताप येईल
तरी देईल ती संरक्षण
फिरायला मोकळे 
कष्टायला तयार
भीती नाहीशी
पदरात विश्वास
मारील ती विषाणू
आभार माना लशीचे ! 
सोहळे करा लशीचे ! 





लस घ्या लस
कोणतीही पण
वेळेवर घ्या लस

इकडे काय तिकडे काय
सगळीकडे तीच लस
सुरक्षेसाठी तब्येती साठी
घेऊन टाका एक डोस

विषाणू च्या नावे होळी
खा गरम पोळी
जळून जाऊ दे विषाणू
वाजवू आपण पिपाणी

लस घ्या लस 
सुरक्षा लस ! 

 एवढ्यात जाऊ नका कोणी

आयुष्य किती सुंदर आहे
गप्पा किती भेटी व्हायच्या बाकी
अर्धवट सोडूनी जाऊ नका तुम्ही
मनी संकल्प, उमेद असू दे
काही नाही तरी एक दुसऱ्या साठी 
अनुभव गोष्टी किती सांगावया 
घरकुल सांभाळत  रहा तुम्ही
स्वतःची काळजी घेऊन रहा
आहार व्यायाम सातत्य ठेवा
अचानक जाणे जरी चांगले जीवा
मजबूत रहा हाकेला हाक द्याया 
आलाच तर त्याला ताकद दाखवा
पळून जाऊ दे तो तुम्ही खुशाल रहा ! 


 काय केले मी काहीच नाही अजुनी

तत्वे पाळली कुणा पटलीच नाही

आग लागली की वणवा म्हणावा
पाणी किती लागले गणतीच नाही

भटकंती झाली मी कळले सर्वांना 
मला कुणी तसे  कळलेच  नाही 

मौन धरुनी का वादळ शांतते
हेलकावे भावनांचे थांबलेच नाही 

रस्तो रस्ती एकच ती  पुराणी चर्चा
समजून उमजून  कुणी  वागलेच नाही

कराया तसे किती तरी सामोरे
येण्याची तारीख त्याने कळवलीच नाही !!

       अलका काटदरे /१६.३.२१



 हवी असते साथ 

स्त्री पुरुषांना एकमेकांची
खरे आहे..
परंतु ही साथ हवी असते
हळुवार बोलण्यासाठी
एकमेकांना समजून घेण्यासाठी
डोळ्यातील पाणी नजरेने टिपण्यासाठी
आधाराचा विश्वास देण्यासाठी
एकटेपणा घालवण्यासाठी
हवी असते साथ दोघांना 
संवेदनशील व्यक्ती  म्हणून 
नको असते ती एक नर मादी म्हणून !

23.2.21

 तू निमंत्रित पाहुणा नक्कीच नाहीस

आमच्या शब्दकोशात ही नाहीस
त्यात तुला स्थान मिळणार ही नाही

तू आमच्या प्रार्थनेत आलास
खूप दिवस नाही चालणार हे
बर्या बोलाने चालता हो
नाहीतर हाकलून देऊच आम्ही

खूप झाले तुझे खेळ आणि डाव
लहान मुले आहेत इथे, वाढू दे त्यांना
थोरानी तुला यापूर्वी ही पाहिले आहे
लक्षात ठेव ते बाणाहुन ही  तीक्ष्ण आहेत

तुला काय साधायचे आहे ह्या नाटकात
वाईट प्रसिद्धी मात्र मिळेल तुझी
कोणतीच फसवणूक चालू नाही देणार

लक्षात घे तुझे डावपेच ध्यानी आले आहेत
सर्वांची  तू खूपच परीक्षा पाहिली आहेस
पण आम्ही सर्व नियम नक्कीच पाळणार
तुझा पूर्ण अभ्यास केलाय आम्ही त्यासाठी

आमच्या संस्कारांना जागरूक आहोत आम्ही
तू या पृथ्वी वरुन निघून जा
नाहीतर आम्ही त्तुझा नाश करणार आहोत च !

  जीवन


जन्म मृत्यू 
जीवनाची रितच आहे

येणारा येतो अजाणता
केव्हा जाणार माहित नसते ! 

गेलेल्याला माहित नसते
पाठीमागे काय चालले आहे

त्याच्या नावानी, त्याच्या नावावर
नाव म्हणून सोडायची नाही वाऱ्यावर

न्याय अन्याय सारे ह्याच जन्मा
भोगून जायचे पुढील किनाऱ्यावर

सुकाणू द्यायचे नाही कुणाला
राहिले जरी कुणाच्या आधारावर

येताना रडत आलो
अलका म्हणे, 
जाताना तर हसत जाऊ!
           अलका काटदरे

 हे वर्ष तसे जगण्यातच गेले

एकेक श्वास मोजण्यात गेले

झोप उडाली स्वप्ने कुठली
रोजचा पाठ  गिरवून  गेले

आरोग्याची गुरुकिल्ली नियम
मंत्र मनाशी रुजवून गेले

कोण आपला कोण परका
नाही उरले काही,  सांगून गेले

चिंता विवंचना दूर राहिल्या
सकाळ दिसेल ना, संभ्रमुन गेले

घास आठवून मना बळकटी
गप्पागोष्टी पण विसरवून गेले

एकमेका साह्य आणि सह्य
दोघांचं मेळ घालवून गेले

कित्येक गोष्टी भिजून राहिल्या
घोंगड्याची ऊब समजावून गेले

येणारे वर्ष समृध्द असू दे
एकेका श्वासा भिनवून गेले
                  3.12.2020

aala divas aapala


सध्या रोज तुझाच विषय असतो

केव्हा येशील, कसा येशील
सांगून का अचानक

लोकांचे अनुभव, स्वतः च्या मर्यादा
इच्छा आकांक्षा, चितारलेली स्वप्ने
मग हळूहळू सगळ्याला मुरड
आणि फक्त आला दिवस आपला !

आवरा आवर, भेटी गाठी
अर्धवट राहिलेली कामे
सगळ्याला तसा वेगच आला
एकेका क्षणाचे महत्त्व
अचानक जास्तच मनी रुजले

अभिमान सारे गळून पडले
राहिली फक्त कृतज्ञता
तू तू मी मी कोठेच गेले
संस्कार सारे कामी आले
विचार पडला सर्वांचा
आपुल्या पश्चात काळजीचा

तू अटळ आहेस माहित असले तरी
आमचे स्वातंत्र्य अबाधित होते
उद्याचे मनोरे रचले जात होते रे ! 
तसा तू सांगोपांग विचार करशील च
ये केव्हाही, माझ्या तारखेला मी हजर आहे ! 
दिनदर्शिका तुझी पडताळून पहा मात्र !
थोडी विश्रांती घेतलीस तर तुलाही बरे !!
                   घेशील ना ??

अलका काटदरे /२४.१२.२०

 तिचे काय चालू आहे !



ती काय करतेय
सर्वांना दिसतेय 
तिचे काय चालू आहे
हे मात्र कळणार नाही
कारण ती आहे घरात
सतराशे साठ व्यापात

चहा, नाश्ता पासून जेवण
दुपारचे, रात्रीचे
चटण्या, कोशिंबिरी, लोणची
तात्पुरते तसे बेगमीचे
आला गेला नाही सध्या
तरी फोनाफोनी आहेच
वाण्याचे सामान, भाज्या
आणून, नाहीतर मागवून
नीट ठेवणे आहेच
कपडे धुणे रोजचे
कामवाली नसतेच
मुलांचे ऑनलाईन अभ्यास
अजूनच भर webminar

घरकाम काही काम नसते
पण work फ्रॉम होम
मात्र कामच असते !!
त्यांना डिस्टर्ब नाही करायचे
हिचे काम आहे रोजचे च !

तिचे हे सारे दखलपात्र नसते
कारण तिला ह्याची सवय असते
आणि तीच तर म्हणते नेहमी
विशेष काय त्याचे !!

वेळ मिळेल तसा walk
येता जाता कामे, योगासने, 
वाचन ,जेवताना टीव्ही
हे दिसते हं सर्वांना 
अरे, ती तर मजेत आहे
आराम चालला आहे तिचा !
भर दुपारी फिरण्या एवढी आहे 
Energy आहे की तिच्यात !!

ती काय करतेय दिसतय सर्वांना
पण तिचे काय चाललय ?  

तिच्या मनाची घालमेल,
नानाविध काळज्या,
स्वप्ने  सगळ्यांची,
चहू बाजूंनी कुचंबणा 
मन: स्ताप झालेला,
करून घेतलेला,
कपातील वादळे, वादविवाद,
स्वतः हुन घेतलेली जबाबदारी
कुतरओढ,  तऱ्हे तऱ्हेचे  आवेग
सारे तिच्या एवढ्याशा मनात

कारण तिला वाढवायची आहे
संस्कृतीची कमान ! 
सून आहे ती घरंदाज
घर करायचे आहे तिला मना मनात !
हट्ट, लाड कुणी पुरवायचे
प्रश्नच नाही उद्भवत कधी  घरात ! 

वेगाने कामे निभावताना
तिला तरी माहित आहे का?
तिची थकलेली गात्रे
निवांत क्षण मागताहेत
कौतुकाचे कटाक्ष, 
आपुलकीचा शब्द,
केलेल्याची जाण,
मनाला विसावा..
आधाराचा हात

छोट्या छोट्या अशा गोष्टींनी
होईल भार हलका तिचा
नाचू लागेल मन तिचे !
प्रेमाने न्हाऊन निघेल तिचा  ऊर !

शांत होईल आतल्या आत
जे काही चालले आहे तिच्या मनात
हसण्यात तिच्या येईल निरागसता
चालण्यात तिच्या येईल डौल
बोलण्यात विश्वास, अभिमान

दिसु दे की तिचे असे काही ..
साधेसेच पण निर्मळ समाधानी 
निवांत आतले मन !!

अलका काटदरे / Dec.20