रविवार, २० सप्टेंबर, २०२०

मोजके

 


बोलावे मोजके
मधुर तसे समजून
होईल मग आयुष्य सुरेल

चालावे सांभाळून
असावी भली तडफ
स्वतः ला मग आयुष्य रुचेल

स्मित हास्य मन शांत
कर्तव्या नसे  कसूर
समाधान मग आयुष्या पुरेल

स्वतः परी दुसरा
असावा नित्य विचार
सुख मग पूर्ण आयुष्या धरेल

आनंदी अंतरी तेच बाहेर
असावे सत्या सादर
मजेत मग आयुष्य सरेल !
        आयुष्य स्वप्न असे बहरेल !!

alka//13.9.20








प्राजक्त

प्राजक्ताच्या झाडाखाली केला अभ्यास
सोबतीला मुंग्या होत्या सतराशे साठ ! 

तहान भूक नसे भान, त्यांना दिनरात
शिस्त त्यांच्या प्रत्येक इवल्या पावलात 

घेतली थोडी तेथून, बाळगली ही तशी
प्राजक्त शुभ्र निर्मळ, असे कायम उराशी

मंजुळ घंटा नाद, सुग्रास जेवणाचा गंध
कान, नाक उघडे  तरी करार डोळ्याशी

गाणी जरी येती दूर दिशेवरूनी
आरक्त नाही झाले कान गाठ मनाशी

आठवणी कडक मधुर संवाद स्वतःशी
स्वप्ने रंगवली सदैव फुलणाऱ्या झाडाशी ! 

   अलका काटदरे / १.९.२०




 


आमच्या घरी तू लवकर ये
आल्यावर लवकर पुन्हा जाऊ नको
येताना भरपूर स्वप्ने आण ! 

स्वप्नांची पूर्तता आम्ही करू
आम्हाला तू थोडी सुबुद्धी दे
तुला आम्ही सदाच ऋणी राहू ! 

चुका काय केल्या तर माफ कर
मन आमचे सुंदर साफ कर
शांती सगळी कडे नांदू दे

बाप्पा तू आमचा आधार
तुला आमचे कैक आभार ! 
तुझ्या सेवेत आम्हाला रुजू दे !!

Alka/Ganesh/2020

उच्छवास

 (प्राजक्ता गोखले पटवर्धन हिचा मतला !)


श्वास मी घेते अशी नुसतीच अफवा आहे_
जीवनाला लागलेला फक्त चकवा आहे _

कोंडून का राहते कधी कुणाची  वाफ
उच्छवास हाच माझा श्वास ठरला आहे

मारल्या किती पैजा जीवना मी  तुझ्याशी
जीत तुझी जरी, मी ध्येयाच्या जवळ  आहे

हवेत मारुनी बाण मी फुशारले होते
तो एक मात्र बाण मनी रुतला च आहे

वादळ वारे जंगलात फिरुनी झाले
शीतल वारा अंगी काटा, एक बकवास आहे !


     -अलका काटदरे /9.8.2020

फुल पाखरू

 


आले हे कुठूनी, फुल पाखरू
रंग बिरंगी  रेशमी कांती

सुगंध काढीत येई वृक्षि
शुभ्र फुला आकर्षित
झाले कसे हे , फुल पाखरू

मध चाखी केवळ मधुर
गुण गुणी ही तसेच मधुर
मधुर ह्या हिरव्या वेली
बसले केव्हा हे, फुल पाखरू

कांती मखमली मनही भावूक
नाजूक फुला नितळ गाली
भान हरपले का हो, फुल पाखरू

केव्हा, कोठून  कसे का
आले,रमले,बसले
कोणते हे, फुल पाखरू ! 

     अलका काटदरे/6.8.20





मंथन


काळे काळे कावळे, भेटती एका टाकी
कुठे आज मासा अन कुठे आज भजी

शित मिळेना सारे सण आले तरी
थेंब मिळेना कुणा रिकाम्या  घागरी

कुणा चिमणीचे आज  ठोठवू दारी
तुझे माझे कुणाचे बरे, ऐकावे परी

पाऊस आला मोठा झाडे ही पडती
कुठे बांधायचे घरटे, प्रश्न ही चर्चिती

काळे काळे कावळे आले मेटाकुटी
विचार मंथन होई पण राहती उपाशी !
 
अलका काटदरे/ १०.८.२०


बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

अजून किती



झगडून  माझे झाले  आहे 
     अजून किती वादायचे 
सैरावैरा इथे तिथे 
     अजून किती पळायचे 
मानापमान होतच गेले 
     अजून किती झेलायचे 
डोकावून सर्वत्र आले आहे 
     अजून किती शोधायचे 
रात्रीचे दिवस केले 
     केव्हा निवांत निजायचे 
माया केली , गोंजारले ही 
     त्यांना कधी हे समजायचे 
अति तटीच्या डाव नाही 
     आचरणी कधी आणायचे 
आयुष्य एक प्रवास आहे 
      वाटसरू ना केव्हा कळायचे ?
(29.6.20)

कान्हा

 आहे अजूनी आणि जगेनच पुन्हा

क्षण मंतरून, ओंजळी भरी कान्हा


कोलमडला नाही  तेव्हाही  गोवर्धन
खांदा भारी ऊब देऊनी, राहीला पान्हा

गोकुळ हे  नांदे,  ऊर्जा पसरवे सर्वा
नाही केव्हा चिंता, वस्त्रे पुरवी कान्हा

येता ग्रीष्म वाळली पाने, हो थोडीशी
श्रावणात मग बहरून गेला तो तान्हा

वेळ असे सर्वांना,  एकमात्र औषध
येणार  नाही नको ती वेळ पुन्हा पुन्हा !

       अलका काटदरे/ ११.८.२०




तुझ्या गर्भी

 तू कधीच कसे काही मागत नाहीस

सारखे देतच असतोस ?
कधी उन, कधी पाऊस 
तर कधी  सुखावह सावली
अगदी हव्या असलेल्या वेळेला
व्याकुळ झालेल्या मनाला
 
काय काय भरलय तुझ्या गर्भात
मनमोहक स्वप्ने दाखवतो रंगात
रम्य सकाळी आणि कातर वेळीही
पूर्वेला तसेच पश्चिमेला

विविध रंगात तुझ्या प्रसन्न वाटते
तसे  काळीज ही कधी थरारते
दिवस रात्र आमची तूच ठरवतो
चंद्र सूर्याला आळीपाळीने दडवतो

किरणांची लगबग, ऊन सावलीचा खेळ
ढगांचा लपंडाव, चांदण्यांची चमचम
विमानांची झेप, पक्ष्यांचा स्वैर विहंग

सगळे तुझ्या प्रांगणात
कसे सारे कवेत ठेवतोस
वाटेल तसे पसरत राहतोस
हवे तेव्हा  लगाम ही  घालतोस

उगम स्थान तुझ्या ठायी 
गंतव्य स्थान ही तेच राही
तरीही तुझ्या एवढे मन
कुणाला  का मिळत  नाही !!

     अलका काटदरे / July 2020


ओघळलेले क्षण

 ओघळलेले क्षण 


येती पाठोपाठ आठवणी संगतीच्या 

नजरेस नजर भिडता तुझ्या न  माझ्या

दूरवर घुमला आवाज मौनाचा
गात्रे धावती विसरून अटी अंतराच्या

एका होई बाधा कशाची दूरवर
प्रतिबिंब पडे लख्ख नजरेत दुजाच्या

विचार पटले मने बिलगली एक झाली
एवढेच होते वास्तव साक्षी सर्वांच्या

सोनेरी दिवस कुठे जपून ठेवू हे
पोथडी भरली  गोष्टींनी रम्य वेळेच्या

ओघळलेले क्षण पकडून मुठीत माझ्या
कटुता सारी विसरेन मी गत काळाच्या !

        अलका काटदरे /June 2020






श्रावण धून

        श्रावण 

 रंग बदलले पाऊस आला सरसर अंगणी माझ्या

गडगड करती नभी बादल वरुण राही उभा 


वेली वर पाने पसरती सुमने घेती सभा
पक्षी डोलती वृक्षि  हिरव्या लगबग त्यांची बघा

ढग बनती डमरू आणि तारे मिरविती तोरा
कुठे कुठे धावे हे मन संसार विसरुन न्यारा

ऊन पाऊस खेळ चाले धरती पांघरे प्रभा
नयनी दाटे आनंदाश्रु पाहुनी रम्य ही शोभा

इंद्रधनु मोहक भासे सर्वानाच उमगे भाषा
निसर्ग करी श्रावणात असा एकच रंग अवघा ! 

(Priya Kalika Bapat - Kavyhotra 26.7.2020)




आवाज


आवाजाची मला जन्मा भीती

हात यायचे दोन्ही कानी

बालपणी नदी किनारी
वैकुंठे  कोणी जाई
वाहत्या झऱ्याचा झुळझुळ मग
त्यातच लुप्त होई !

शाळेला जाता बसचा ब्रेक
गप्पांना  तेव्हाच कसे भरते येई
घसा खरडता औषध घेऊनी
सवय ही मोडीत जशी जाई !

अनोळखी येता कोणी घरी
विनोदावर त्यांच्या अलगद हसू
खुदू खुदु आमचे त्यावेळी
शब्द  घेऊनी दोन बंद  होई !

आली मग आगगाडी नशीबा
धावत गेले नित्य समांतर
त्याच गाडीत बसुनी मग
Ear phone कसा सेवे येई !

संसारात कूकर ची शिट्टी
बाळांची रडणी टीव्ही चालू
फेरीवाले चिंचोळ्या गल्लीत
मिश्रण कसे ते श्रवणीय होई !

गोविंदा गणपती 
येती सारे रस्तोरस्ती
भल्या पहाटे जग झोपूनी
मंदिरी घंटा तशी प्रिय होई !

राहता राहिले ऑफिस सुंदर
सहकारी अन् मैत्रिणी जिवलग
शांतता नांदे एकमेका समजून 
अंतरी आवाज तरी दबून जाई !

निवृत्तीला येता शरीर
मन  करी आक्रोश
आवाज कुठे गेला 
आवाज कुठे गेला !!

अलका काटदरे / १४.८.२०