बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

तुझ्या गर्भी

 तू कधीच कसे काही मागत नाहीस

सारखे देतच असतोस ?
कधी उन, कधी पाऊस 
तर कधी  सुखावह सावली
अगदी हव्या असलेल्या वेळेला
व्याकुळ झालेल्या मनाला
 
काय काय भरलय तुझ्या गर्भात
मनमोहक स्वप्ने दाखवतो रंगात
रम्य सकाळी आणि कातर वेळीही
पूर्वेला तसेच पश्चिमेला

विविध रंगात तुझ्या प्रसन्न वाटते
तसे  काळीज ही कधी थरारते
दिवस रात्र आमची तूच ठरवतो
चंद्र सूर्याला आळीपाळीने दडवतो

किरणांची लगबग, ऊन सावलीचा खेळ
ढगांचा लपंडाव, चांदण्यांची चमचम
विमानांची झेप, पक्ष्यांचा स्वैर विहंग

सगळे तुझ्या प्रांगणात
कसे सारे कवेत ठेवतोस
वाटेल तसे पसरत राहतोस
हवे तेव्हा  लगाम ही  घालतोस

उगम स्थान तुझ्या ठायी 
गंतव्य स्थान ही तेच राही
तरीही तुझ्या एवढे मन
कुणाला  का मिळत  नाही !!

     अलका काटदरे / July 2020


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा