बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२०

तोवर

 तोवर 


आकाशाशी जडले नाते
घट्ट इतुके

दाखवी रोज रंग नवे
मला कितुके 

आधार वाटे मला 
सांगू कौतुके

तारे तेथे चमकती
मन  लुकलुके

दर्शन घ्याया त्याचे
कोणी ना चुके

रागावला तरी, माझा
नाते ना सुटे

अलका म्हणे रहा भव्य
जमेल तितुके

तो आहे छत्र धरुनी
तोवर साजुके

      -   अलका काटदरे 



रविवार, २० सप्टेंबर, २०२०

मोजके

 


बोलावे मोजके
मधुर तसे समजून
होईल मग आयुष्य सुरेल

चालावे सांभाळून
असावी भली तडफ
स्वतः ला मग आयुष्य रुचेल

स्मित हास्य मन शांत
कर्तव्या नसे  कसूर
समाधान मग आयुष्या पुरेल

स्वतः परी दुसरा
असावा नित्य विचार
सुख मग पूर्ण आयुष्या धरेल

आनंदी अंतरी तेच बाहेर
असावे सत्या सादर
मजेत मग आयुष्य सरेल !
        आयुष्य स्वप्न असे बहरेल !!

alka//13.9.20








प्राजक्त

प्राजक्ताच्या झाडाखाली केला अभ्यास
सोबतीला मुंग्या होत्या सतराशे साठ ! 

तहान भूक नसे भान, त्यांना दिनरात
शिस्त त्यांच्या प्रत्येक इवल्या पावलात 

घेतली थोडी तेथून, बाळगली ही तशी
प्राजक्त शुभ्र निर्मळ, असे कायम उराशी

मंजुळ घंटा नाद, सुग्रास जेवणाचा गंध
कान, नाक उघडे  तरी करार डोळ्याशी

गाणी जरी येती दूर दिशेवरूनी
आरक्त नाही झाले कान गाठ मनाशी

आठवणी कडक मधुर संवाद स्वतःशी
स्वप्ने रंगवली सदैव फुलणाऱ्या झाडाशी ! 

   अलका काटदरे / १.९.२०




 


आमच्या घरी तू लवकर ये
आल्यावर लवकर पुन्हा जाऊ नको
येताना भरपूर स्वप्ने आण ! 

स्वप्नांची पूर्तता आम्ही करू
आम्हाला तू थोडी सुबुद्धी दे
तुला आम्ही सदाच ऋणी राहू ! 

चुका काय केल्या तर माफ कर
मन आमचे सुंदर साफ कर
शांती सगळी कडे नांदू दे

बाप्पा तू आमचा आधार
तुला आमचे कैक आभार ! 
तुझ्या सेवेत आम्हाला रुजू दे !!

Alka/Ganesh/2020

उच्छवास

 (प्राजक्ता गोखले पटवर्धन हिचा मतला !)


श्वास मी घेते अशी नुसतीच अफवा आहे_
जीवनाला लागलेला फक्त चकवा आहे _

कोंडून का राहते कधी कुणाची  वाफ
उच्छवास हाच माझा श्वास ठरला आहे

मारल्या किती पैजा जीवना मी  तुझ्याशी
जीत तुझी जरी, मी ध्येयाच्या जवळ  आहे

हवेत मारुनी बाण मी फुशारले होते
तो एक मात्र बाण मनी रुतला च आहे

वादळ वारे जंगलात फिरुनी झाले
शीतल वारा अंगी काटा, एक बकवास आहे !


     -अलका काटदरे /9.8.2020

फुल पाखरू

 


आले हे कुठूनी, फुल पाखरू
रंग बिरंगी  रेशमी कांती

सुगंध काढीत येई वृक्षि
शुभ्र फुला आकर्षित
झाले कसे हे , फुल पाखरू

मध चाखी केवळ मधुर
गुण गुणी ही तसेच मधुर
मधुर ह्या हिरव्या वेली
बसले केव्हा हे, फुल पाखरू

कांती मखमली मनही भावूक
नाजूक फुला नितळ गाली
भान हरपले का हो, फुल पाखरू

केव्हा, कोठून  कसे का
आले,रमले,बसले
कोणते हे, फुल पाखरू ! 

     अलका काटदरे/6.8.20





मंथन


काळे काळे कावळे, भेटती एका टाकी
कुठे आज मासा अन कुठे आज भजी

शित मिळेना सारे सण आले तरी
थेंब मिळेना कुणा रिकाम्या  घागरी

कुणा चिमणीचे आज  ठोठवू दारी
तुझे माझे कुणाचे बरे, ऐकावे परी

पाऊस आला मोठा झाडे ही पडती
कुठे बांधायचे घरटे, प्रश्न ही चर्चिती

काळे काळे कावळे आले मेटाकुटी
विचार मंथन होई पण राहती उपाशी !
 
अलका काटदरे/ १०.८.२०


बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

अजून किती



झगडून  माझे झाले  आहे 
     अजून किती वादायचे 
सैरावैरा इथे तिथे 
     अजून किती पळायचे 
मानापमान होतच गेले 
     अजून किती झेलायचे 
डोकावून सर्वत्र आले आहे 
     अजून किती शोधायचे 
रात्रीचे दिवस केले 
     केव्हा निवांत निजायचे 
माया केली , गोंजारले ही 
     त्यांना कधी हे समजायचे 
अति तटीच्या डाव नाही 
     आचरणी कधी आणायचे 
आयुष्य एक प्रवास आहे 
      वाटसरू ना केव्हा कळायचे ?
(29.6.20)

कान्हा

 आहे अजूनी आणि जगेनच पुन्हा

क्षण मंतरून, ओंजळी भरी कान्हा


कोलमडला नाही  तेव्हाही  गोवर्धन
खांदा भारी ऊब देऊनी, राहीला पान्हा

गोकुळ हे  नांदे,  ऊर्जा पसरवे सर्वा
नाही केव्हा चिंता, वस्त्रे पुरवी कान्हा

येता ग्रीष्म वाळली पाने, हो थोडीशी
श्रावणात मग बहरून गेला तो तान्हा

वेळ असे सर्वांना,  एकमात्र औषध
येणार  नाही नको ती वेळ पुन्हा पुन्हा !

       अलका काटदरे/ ११.८.२०




तुझ्या गर्भी

 तू कधीच कसे काही मागत नाहीस

सारखे देतच असतोस ?
कधी उन, कधी पाऊस 
तर कधी  सुखावह सावली
अगदी हव्या असलेल्या वेळेला
व्याकुळ झालेल्या मनाला
 
काय काय भरलय तुझ्या गर्भात
मनमोहक स्वप्ने दाखवतो रंगात
रम्य सकाळी आणि कातर वेळीही
पूर्वेला तसेच पश्चिमेला

विविध रंगात तुझ्या प्रसन्न वाटते
तसे  काळीज ही कधी थरारते
दिवस रात्र आमची तूच ठरवतो
चंद्र सूर्याला आळीपाळीने दडवतो

किरणांची लगबग, ऊन सावलीचा खेळ
ढगांचा लपंडाव, चांदण्यांची चमचम
विमानांची झेप, पक्ष्यांचा स्वैर विहंग

सगळे तुझ्या प्रांगणात
कसे सारे कवेत ठेवतोस
वाटेल तसे पसरत राहतोस
हवे तेव्हा  लगाम ही  घालतोस

उगम स्थान तुझ्या ठायी 
गंतव्य स्थान ही तेच राही
तरीही तुझ्या एवढे मन
कुणाला  का मिळत  नाही !!

     अलका काटदरे / July 2020


ओघळलेले क्षण

 ओघळलेले क्षण 


येती पाठोपाठ आठवणी संगतीच्या 

नजरेस नजर भिडता तुझ्या न  माझ्या

दूरवर घुमला आवाज मौनाचा
गात्रे धावती विसरून अटी अंतराच्या

एका होई बाधा कशाची दूरवर
प्रतिबिंब पडे लख्ख नजरेत दुजाच्या

विचार पटले मने बिलगली एक झाली
एवढेच होते वास्तव साक्षी सर्वांच्या

सोनेरी दिवस कुठे जपून ठेवू हे
पोथडी भरली  गोष्टींनी रम्य वेळेच्या

ओघळलेले क्षण पकडून मुठीत माझ्या
कटुता सारी विसरेन मी गत काळाच्या !

        अलका काटदरे /June 2020






श्रावण धून

        श्रावण 

 रंग बदलले पाऊस आला सरसर अंगणी माझ्या

गडगड करती नभी बादल वरुण राही उभा 


वेली वर पाने पसरती सुमने घेती सभा
पक्षी डोलती वृक्षि  हिरव्या लगबग त्यांची बघा

ढग बनती डमरू आणि तारे मिरविती तोरा
कुठे कुठे धावे हे मन संसार विसरुन न्यारा

ऊन पाऊस खेळ चाले धरती पांघरे प्रभा
नयनी दाटे आनंदाश्रु पाहुनी रम्य ही शोभा

इंद्रधनु मोहक भासे सर्वानाच उमगे भाषा
निसर्ग करी श्रावणात असा एकच रंग अवघा ! 

(Priya Kalika Bapat - Kavyhotra 26.7.2020)




आवाज


आवाजाची मला जन्मा भीती

हात यायचे दोन्ही कानी

बालपणी नदी किनारी
वैकुंठे  कोणी जाई
वाहत्या झऱ्याचा झुळझुळ मग
त्यातच लुप्त होई !

शाळेला जाता बसचा ब्रेक
गप्पांना  तेव्हाच कसे भरते येई
घसा खरडता औषध घेऊनी
सवय ही मोडीत जशी जाई !

अनोळखी येता कोणी घरी
विनोदावर त्यांच्या अलगद हसू
खुदू खुदु आमचे त्यावेळी
शब्द  घेऊनी दोन बंद  होई !

आली मग आगगाडी नशीबा
धावत गेले नित्य समांतर
त्याच गाडीत बसुनी मग
Ear phone कसा सेवे येई !

संसारात कूकर ची शिट्टी
बाळांची रडणी टीव्ही चालू
फेरीवाले चिंचोळ्या गल्लीत
मिश्रण कसे ते श्रवणीय होई !

गोविंदा गणपती 
येती सारे रस्तोरस्ती
भल्या पहाटे जग झोपूनी
मंदिरी घंटा तशी प्रिय होई !

राहता राहिले ऑफिस सुंदर
सहकारी अन् मैत्रिणी जिवलग
शांतता नांदे एकमेका समजून 
अंतरी आवाज तरी दबून जाई !

निवृत्तीला येता शरीर
मन  करी आक्रोश
आवाज कुठे गेला 
आवाज कुठे गेला !!

अलका काटदरे / १४.८.२०






शुक्रवार, ३ जुलै, २०२०

आकाश



तुझे आकाश, माझे ही तेच 
मला दिसले मोहक रंग 
तुला काळे ढग .. . 

निघालेलं भरभरून पडायला 
कोठेतरी शेती करायला 

चांदण्या लपल्या  रंगात 
मिस्किलपणे जागे ढगात 
गडामगड गडामगड 

खेळ चाले आकाशी 
पाऊस पडे  चहू राशी 

पाऊस तुझा, तोच माझा 
तुला आवडले भिजायला 
मला स्मृती साठवायला 

स्मृती तुझ्या नि माझ्या  
त्याच एका  वेळच्या 

विविध रंग तरंगले 
दोघांनाही हसवले ... 
आकाशी रंग पांगले !!

रविवार, २८ जून, २०२०

तुला तुझे, गगन मिळू दे




तुला तुझे, गगन मिळू दे
स्वप्नाना तुझ्या एक दिशा मिळू दे

भव्य जसे दिव्य ही जीवन झळाळू दे
लाविला दिवा दारी उजळत राहू दे

काळोखी वाट त्वरा सरून जाऊ दे
किरण त्या तेजाचे तुझपरी पोचू दे

लक्ष लक्ष सु-आशीर्वाद तुला लाभू दे
चिमुकले रोपटे कसे बहरून जाऊ दे

तुझे तुला गगन मिळू दे..

जगण्याचे संचित


मरायचेच  आहे तर सुखाने जगू या 
लढायचे आहे तर स्वतःशीच बोलूया 

दमायचेच  आहे शरीराने का मानाने 
सोडायचे व्यसन कोणते, वेळीच ठरवू या 

व्रते धरुनी सारी वर्षे लोटली 
निश्चयाचा मेरुमणी जोमाने धरूया   

मांडायची आहे पंगत आठवणींची 
हळूच कोमल भावनांना भिडू या 

पसारा आवरायचा  आहे खरा 
संग्रह विविध नात्यांचा जपूया    

ऋण राहिले परतायचे जगी 
जगण्याचे संचित सुशोभित करूया !

वाट कोणाची हे मन पाहे ..

स्तब्ध शांत सुन्न हे 
वाट कशाची मन पाहे 

पान ही हलेना, फुलही डोलेना 
एकही विचार मनात येईना

उर्मी नसे, उचंबळही  नाही
कसे, केव्हा, झाले मन हे असे 

अलगद झुल्यावर बसले जरी 
झुला स्थिर ठेवला असे

नका त्याला जराही 
नका त्याला जराही, देऊ झोका 
स्तब्ध शांत सुन्न हे
वाट कशाची मन पाहे

झुला घेईल हिंदोळे, वाऱ्या सहे
मन नाजूक, हुंकारेल..
नका आत्ता, त्याला जराही 
नका आत्ता, त्याला जराही देऊ झोका 

स्तब्ध, शांत, सुन्न हे
वाट कोणाची हे मन पाहे ..

गुरुवार, ७ मे, २०२०

मला तर माहीतच नाही

प्रेम काय असते? मला तर माहीतच नाही

लहानपणी आई बरोबर राहायचे
शाळेत बाईंचे ऐकायचे
मैत्रिणी बरोबर हुंदडायचे
सर्व काही मन लावून

अभ्यास पूर्ण, खेळ भरपूर
हाच तर धर्म होता
नेकी,सचोटी,कष्ट, नम्रता   
आपोआपच आत्मसात झाले
का होतेच जन्मजात

मोठेपणी कष्ट पडतील ते
काम मिळेल ते, मोबदला मिळेल तो
सर्व काही आवडून, आनंदाने
जबाबदारी वाढली तशी
घेऊन शिरावर, स्वबळावर
ह्यालाच समजत गेलो जीवन

सर्वांचा दुवा प्रेम होताच ना
त्या गुणावर, आदर्शा वर
अजून काही असते का वेगळे
प्रेम म्हणजे ,
अडीच अक्षरी दोघांमधले
एकमेकांना बांधून ठेवणारे ?

दुजाभव नसलेले, निर्मळ
निस्वार्थी, अहंकार विरहित
भावनेने ओथंबलेले
जबाबदारीची जाणीव
आणि निष्ठेने त्याची पूर्तता
ही नव्हे का प्रेमाची ओळख ? 

प्रेम प्रेम अजून काय असते
मला  तर काही माहीतच नाही
ह्या पलीकडे  काही जमतही  नाही
नाही मला अक्षरे माहीत 
आणि नाही  कसले भाव
एकच मला समजे सेवाभाव !




Whatever I could

I did whatever I could
I gave whatever I should

I  spread cheers to u all
I  stored hopes to u all

I threw any evil so far
I picked all good u had

Some issues tantrums I saw
I worried but never for that

Trust and Hope I held
As I fetched them all along

U gave strength to me
I am so thankful for that

I am thankful to u all
For whatever u could and did

I am so thankful to Him
He is sending New Year to me

Bright,Happy and Juicy
Let this year be Healthy..

Healthy Wealthy and Shiny
Let us Welcome the Coming !

@alkakatdare

सांज वेळी

जखमा सांजवेळी..


जखमा  सांज वेळी,  सांगू  कशा कुणाला
उघडूनी बंद झडपे, पूर मी करू कशाला...

गात्रे थकूनी निजती, हे ज्ञात ना कुणाला
रग मनीची जिरूनी जीव हा मलूल झाला

रात्री दिनी विचार,  कुठला मला सलेना
भले बुरे करुनी मी  जीव आटवू कशाला

ठिणगी ची साधी गोष्ट पडली कधी कळेना
उरल्या जीवाचे तुकडे जगी दाखवू कशाला ? 

जखमा सांजवेळी...

                       अलका काटदरे /२.१०.१९

अंतर



अंतर ठेवायचे किती कसे तेवढे तू ठेव
अंतरात राहिल्या गोष्टी कुठे कुणाकडे तरी बोल 

बोललेले राहील स्मरणी नक्की हे  ध्यानी ठेव
स्मृतींशी असे देणेघेणे मनाचे समजून बोल

हलके होता मन अलगद  हिंदोळ्यावर  ठेव
अधिक करत स्मृतींना स्वतःशी मग हलकेच बोल

आजची स्वप्ने, उद्याच्या स्मृती अन  मधुर ठेव
अंतर त्यामध्ये किती ठेवायचे हे तू ठरवून ठेव ! 









काय मागितले असेन तिने

काय मागीतले असेल
देवाकडे तिने ?

चार सुखाचे घास
धडधडीत शरीर

सळसळीत कांती
आणि नागिणीची शिताफी
त्या चिमुकलीसाठी..

झालच  तर -
सरस्वती सारखी बुध्दी
तडफ झाशीच्या राणीची

प्रसन्नता लक्श्मीची
आणि सौंदर्य चांदणीचे
त्या चिमुकलीसाठी..

का मागीतले असेल
स्वत:साठी बळ
पचवायला तिचे नशीब
जसे घडेल तसे..

का असेही म्हणाली असेल
देवाला ती..

हिला आणलीस तशी घेॆऊन जा
काहीतरी विपरीत घडण्याआधी...

काय बरे मागीतले असावे तिने...?

बांध

बांध घालावा की नाही
ह्या वाहत्या पाण्याला
नाही घातला तर कसेही वाहेल
कुठेही जाईल
वळण घेईल का बरोबर
आटले जरी थोड्या महिन्यांनी
धुऊन काढेल  सर्वांना
एकेक निरसन  करायला हवे

पाण्याला वळण द्यायलाच हवे
पुरापासून वाचायला
नासधूस थांबवायला
बेभान वृत्तीला आवरायल
अविचार थांबवायला
योग्य वेळी योग्य ठिकाणी
थोपवून त्याला  शांत करायलाच हवे

निसर्गाची देणगी मानून घ्यायची
त्याला वाहू द्यायचे स्वच्छंद
आपणही आनंदात नहायचे
जराशी योग्य दिशा देऊन 
सर्वांचे भले बुरे पाहून
पाणी वळवायलाच हवे !!








हाक

मारतो आहेस हाक अधून मधून
माहित आहे मला..
मुद्दामच दुर्लक्ष करते आहे ! 

ओ तुझ्या हाकेला एवढ्यात नाही मिळणार
आहे अजून मी  व्यस्त आणि मस्त
माझ्या नानाविध बहुरंगी व्यापात

माहित आहे मला 
तुला ह्याचाही कंटाळा येईल
वाट पाहशील आणि निघून जाशील

अगदीच निराश नको हाऊस
देईन हाकेला ओ सावकाशीने, 
माझ्या सोयीने,  आनंदाने
मुळीच नाही असेही नाही ! !
--- अलका काटदरे१७.२.२०

हवी तुझी एक साथ.

हवी तुझी एक साथ...(Title)

चालेल मला नाही काही मिळाले तर पण , 
हवी तुझी एक साथ....

लपालपी खेळायला, इथून तिथून धावायला
भोज्जा द्यायला, मस्ती करायला
करु आपण उद्याची बात (१)

दूर दूर लांब लांब ,असे एक बिकट वाट
खेळत, बागडत, हसत हसत 
करु आपण पुरी एक रात (२)

आज इथे उद्या कुठे , काय कसे सारे वाटे
तरी राहू आपण एक साथ
करु एकच उद्याची बात (३)

मन माझे श्वास तुझा, डोळे माझे स्व्प्न तुझे
करु आपण दोघे मात
आजवर, करु उद्याची बात (४)

हसू आपले कायम राहील
दु:ख सारे झडून जाईल
करु आपण फ़ुलांची रास
तुझी मला हवी ... सदाची .......साथ
हवी तुझी एक  साथ....  (५)

---------अलका काटदरे/१४.१.२०१५

तू आहेस ना !

 तू आहेस ना अंतरी , तू आहेस ना !

सात्विक गुण तुझे, सन्मान वचन तुझे
शिस्त तुझी मर्यादा, त्रिवार वंदन पुरुषोत्तमा
तू आहेस ना !

वेळ कशी आली, काळ सांगून येत नाही
कोण येते  कोण जाते,हिशेब काही लागत नाही
पण तू आहेस ना ! 

आशा किती ठेवायची, उमेद किती बाळगायची
जळी स्थळी तो दिसे, मन माझे कापून उठे
शांत करण्या मला तू आहेस ना ! 

आयुष्य समोर दिसे, काय दिले का घेतले
क्षमा याचना करे, काही जर भले बुरे
साक्षीला त्या तू आहेस ना ! 

तुझे  गुण सर्वान लागो, प्रेम भक्ती दूर पसरो
मर्यादा पुरुष तू, तुझे राज्य आम्हा लाभो
सार्थ कराया हे तू , आहेस ना अंतरी  !! 

           अलका काटदरे (30.4.20)






ऐक ना गड्या


ऐक ना गड्या माझे थोडे तरी रे
ठाऊक आहे प्रसंग भारी जरी रे

विवंचना कोणा नाही, भीती कुणास नाही
सांग मला सांग मला सांग गड्या रे
ऐक ना गड्या माझे थोडे तरी रे ! 

एक दिवस सर्वांना जायचे खरे रे
काहीतरी भले करून जायचे ना रे

स्वतः वर विश्वास ठेव, मनगटी ताकद ठेव
संयम सोडू नको, मित्रा माझ्या रुसू नको
उठ राजा चल राजा,  पाऊल  टाक रे ! 

स्वप्ने मनी तू बाळगली ना  रे
पूर्तता त्यांची कुणी करायची आहे

आनंद घ्यायला लाग, आनंद द्यायला शिक
चित्र काढ, रंग भर, आवेश राहू दे
चल गड्या निघ सख्या कात टाक रे !!

        अलका काटदरे/ ३१.३.२०२०






भविष्यवाणी --

         भविष्यवाणी --

करोना आला रे वळण लावूनी गेला
लक्षी राहील,  तो कसा मेला
त्याचा सर्वांनी प्रतिकार 
कसा हो केला

साधीशी, गोष्ट, होती  
हात  वारंवार धुण्याची
सर्वांनी स्वच्छता  पाळून
आणि
पूर्व संस्कार स्मरून

त्या राक्षसाला, थोडे घाबरले मात्र
बाकी सर्व, राहिले जागरूक

थांबले सर्व प्रवास, केले जवळ आवास
केला संवाद,  दुरुनी  परी प्रेमाचा
लढविला  किल्ला करोना चा

प्रेम वाढविले, संवाद सुरूही झाले
दूरस्थ एकीचे प्रयत्न ही  केले
कणा त्याचा, मग सरसावला
जो मलूल पडून होता

सर्वसामान्य जागा झाला
आरोग्याला मानू लागला
स्वतःची नवीन ओळख झाली
आणि हा 
चमत्कार झाला
त्या राक्षसाचा डाव मोडीत गेला 

आला तो  उगा ऐटीत
सर्वांना जागे करीत
खड बडले जरी खरे हो,
शिस्तीत राहिले सारे
हादरले थोडे जरी हो,
त्याचा नाश करूनच बसले

मेला तो, जळूनी खाक झाला
जिद्द अन संयम नियम झाला

करोना- मरो ना  
दोन हात धरू ना
सर्वांनी सरसावू ना
राक्षसाचा नायनाट केला ना ! 
      -- अलका काटदरे २२.३.२०