मंगळवार, १६ जुलै, २०२४

 सख्खे शेजारी 


खूप दिवस मनात होते, जे नात्याचे नव्हते पण रोजच्या सहवासामुळे कळत नकळत ज्यांच्यामुळे माझे आयुष्य सुसह्य, सुकर झाले, त्यांच्याही नकळत, त्यांचे शब्द चित्र रेखाटावे !  ह्यातील सर्वात अगोदर येतात माझे विविध ठिकाणचे शेजारी.आत्तापर्यंत भरपूर राहत्या जागा बदलल्या. त्यामुळे वेगवेगळे शेजारी मिळत गेले, अल्प काळ का होईना पण मोहोर उठवून गेले. सर्व आठवणी अजून ताज्या आहेत. 

माझे जन्मस्थान एक सुंदर शेतीप्रधान गाव होते, जेथे घरे लांब लांब असत पण एकमेकांशी रोज संबंध असायचा.  तेथे मी अगदीच बालिका असल्याने एवढा संबंध आला नाही त्यांच्याशी पण सर्व गाव आपलाच ही भावना आणि आपुलकी मात्र होती, प्रामुख्याने माझ्या वडिलांच्या जन  संपर्कामुळे ! ते तर गावचे सल्लागार च होते. 
तेथून शाळेसाठी शहरात आल्यावर घरे एकमेकाला लागून, मध्ये भिंत किंवा बोळ. त्यामुळे चार ही बाजूला शेजारी. समवयस्क मुले, सर्व मध्यम वर्गीय. शाळा मुलींची वेगळी, मुलांची वेगळी. नंतर पाचवी पासून माध्यमिक शाळा  सर्वांसाठी एकत्र. बाजूला दोन्ही कडे माझ्याच वर्गातील हुषार मुले, सप्रे आणि नाखरे ह्यांची. 
नाखरे पती पत्नी, आम्ही त्यांना आप्पा आणि बाई म्हणायचो, आमच्या समोरच रहायचे. एक बहुरंगी व्यक्तिमत्त्व. त्यांना कोणती कला अवगत नव्हती असे नाही. फोटोग्राफी, चित्रकला, संगीत, अभिनय, पेंटिंग, कित्ती सांगू तेवढे कमीच. मुलामध्ये पण हे सर्व गुण आले. मुले त्या मानाने थोडी भिडस्त आहेत. आप्पा स्पष्टवक्ते होते. शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे.  तेवढेच प्रेमळ, सर्वांना मदत करणारे ! धोपेश्वर ची शाळा हे त्यांचे पहिले अपत्य, मग त्यांची दोन सुसंस्कृत मुले !  मानाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला नाकारला त्यांनी !  अवलिया मनुष्य 🙏 आजूबाजूला जेव्हा सर्व गुरुजन शर्ट पँट मध्ये होते तेव्हा बाई नऊ वारी आणि आप्पा सफेद पांढरा सदरा आणि धोतर अशा वेषात दोघेही धोपेश्र्वर घाटी रोज चढ उतार करायचे ! किती साष्टांग घालायचे या दांपत्याला ! आमच्या सामायिक अंगणात आप्पा मुलांसाठी मस्त गाणी म्हणायचे मोठ्याने. शेपटी वाल्या प्राण्यांची भरली होती सभा हे त्यांचे आवडते गाणे !  आजूबाजूला असलेल्या छोट्या मुलांचे त्यांच्या कळत नकळत  फोटो काढणे आलेच.  दोन घरामधील अंगण हा त्यांचा स्टुडिओच होता फोटोग्राफी साठी.  माझ्या फोटोग्राफी छंदाचा उगम तेथेच झालेला असणार !   बाईनी आप्पा ना पूर्णपणे उत्तम साथ दिली. त्या खूपच गरीब स्वभावाच्या होत्या. कडक आप्पा आणि मऊ स्वभावाच्या त्या,  एकदम आदर्श जोडी ! रोज दोघे धोपेश्वर शाळेत रमायचे आणि घरी आल्यावर स्वतःच्या मुलांबरोबर बाकी मुलांचे स्पर्धा परीक्षांसाठी वर्ग घ्यायचे.
थोडीशी शिकलेली पण समंजस आमची आई आणि शिक्षिका नाखरे बाई ह्यांचे चांगले मेतकूट जमायचे. आईचा काही बाबतीत सल्ला घेतांना  बाई ना केव्हाही कमी पाणा नाही वाटायचा ! आमची दोन्ही कुटुंबे १५-२० वर्षे  अशी छान  समोरासमोर  प्रेमाने, आपुलकीने राहिली !  
त्यांची पुढची पिढी अशीच हुषार, सालस स्वभावाची, प्रेमळ आहे.  त्यांचा व्यवसाय आता त्यांचा धाकटा मुलगा यशस्वी रित्या चालवतो आहे. 

बापू सप्रे खरे तर ST मध्ये काम करायचे पण त्यांना गणिताची आवड भारी. आपल्या मुला बरोबर मला ही शिकवायचे, त्यामुळे माझा नववी दहावीत गणिताचा चांगला सराव झाला.  सुट्टीच्या दिवसात आम्ही  दिवसभर पत्ते कुटायचो ! माझा वर्गमित्र आता गणिताचा नावाजलेला प्राध्यापक असून तो ही विद्या दानाचे काम करत असतो.  बापू मुलांमध्ये रमायचे. सप्रे वहिनी छान गोऱ्या गोमट्या, लांब  शेपटा घालून असायच्या. मोठी मुलगी ही तशीच. कुणाच्या अध्यात मध्यात नाही. लाजाळू चे  पान !  ते ST मध्ये नोकरीला असल्याने माझ्या वडिलांच्या मुंबई वारी  आकस्मिक तिकिटांची जबाबदारी ते बिन तक्रार पार पाडायचे ! सर्व घरपोच ! असे हे दोन शेजारी आदर्श पालक म्हणून ही लक्षात राहिले

आमच्याच भिंती ला लागून पाघ्ये कुटुंबीय, एकदम धार्मिक. आम्ही मुली कुवारीण म्हणून जायचो त्यांच्याकडे आणि गणपती उत्सवात आरतीला. मस्त मंत्र जागर असायचा त्यांच्याकडे. प्रशस्त घर होते, परस दारी नदी पर्यंत विहीर, झाडे वगैरे. आई नेहमी जायची त्यांच्याकडे काही कार्य किंवा सण असताना मदतीला. मी त्यांच्या प्राजक्ता खाली निरव शांततेत परीक्षा काळात अभ्यास करायची, कारण घरच्या ओटीवर कायम कुणा ना कुणाचा राबता, आईचे चहाचे आधण आणि भाताचे पातेले कायम चुलीवर. फुंक मारून मारून तिची फुफ्फुसे मजबूत झाली असणार ! आम्हाला त्यांचे घर केव्हा परके नाही वाटले. त्यांच्याकडे उडी टाकून जाणे ही कसरत आम्हालाच जमायची. दिब्यांग असलेले काका अतिशय दक्ष असून त्यांना आजूबाजूचे सर्व ज्ञात असायचे, पाऊल कधी चुकले नाही त्यांचे. आणि त्यांचा सखा पोपट, आमचेही प्रेमानें स्वागत करायचा. 
बाकी बोळाच्या तोंडाला दिक्षित भटजी आणि शेवटाला माईणकर. हे शेजारी दूध रतीबा पुरते. अजून एक कुळकर्णी होते, त्यांची मुले मोठी असल्याने जास्त काही संबंध नव्हता पण त्यांची धाकटी मुलगी रत्नप्रभा हिचा उल्लेख हवाच. वयाने ज्येष्ठ अशी  प्रेमळ प्रभू मला शाळेत जाण्यास उद्युक्त करण्यास कारणीभत ठरली. ठिय्या देऊन बसणाऱ्या मला ती ओढत शाळेत घेऊन जायची पहिले काही दिवस ! आणि तीच मी शाळेत पाहिला क्रमांक घेऊन उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणासाठी मुंबई ला आले. भेटले होते तिला एकदा चर्चगेट ला. खूप प्रेमळ, हसरी आणि हुषार मुलगी. 
 पाध्ये आणि कुलकर्णी ह्यांच्या मध्ये पाटणकर, पेढी वाले. अत्यंत सुधारणा वादी, सुशिक्षित, सामाजिक भान असलेले कुटुंब. त्यांनाही मुलांची आवड, शिशु विहार चालवायच्या मंगला वहिनी. अर्थात त्यांच्याशी रोजचा काही संबंध यायचा नाही, पण सणासुदीला आवर्जून आम्हा मुलींना बोलवायच्या. 

माझी जिवलग मैत्रिण भारती उजव्या हाताला दोन घरे सोडून राहायची, तिच्या बरोबर शाळेत जाणे, home work करणे व संध्याकाळी खेळणे हा दिनक्रम ती मुंबई ला जाई पर्यंत चालू राहिला. मोठ्या आजी आजारी अवस्थेत पलंगावर असल्या तरी आम्हा मुलांशी पाटी वर लिहून संवाद साधायच्या. भारतीचे वडील Dr कुलकर्णी, भाई,  शहरातील नावाजलेले आणि निष्णात doctor. पाहताक्षणी रोगाचे निदान त्यांनीच करावे. एकदा मी रस्त्यातून खोकत जात असता मला डांग्या खोकला झालाय सांगून लगेच औषधोपचार सुरू. त्यांच्यामुळे मला माझ्या तब्येतीची काही फिकीर नसे, अगदी त्यांचे  अल्पकालिन  निधन होईपर्यंत ! 
त्यांनाही मुलांची खूप आवड आणि लोक सेवेची. त्यांच्या घरात मला मोठमोठ्या दिगज्जांचे दर्शन झाले, नाथ पै, पु ल, नाना गोरे, मधू दंडवते, इत्यादी. आम्ही शाळेत असताना निवडणूक वेळी समाजवादी पक्षाचा छान प्रचार करायचो ! 
भाई आम्हा मुलांना फोटो काढताना, रविवारचे गाडीतून फिरायला जाताना हमखास बोलवायचे. त्यांच्या घरात त्यांची, भावाची मुले असताना ही ! भिकू काका driver च्या कुटुंबाला ते कायमच मदत करत आले. पंचक्रोशीतले गोरगरीब त्यांना देवा ठिकाणी मानायचे.  आपल्या कडे असलेले नसलेल्या ना देणे हा जसा धर्म त्यांचा . काकी नी मला भारती प्रमाणेच प्रेम दिले. मुंबई हून येताना माझ्यासाठी काहीतरी असायचेच स्वतः च्या लेकी सारखे. त्यांच्या साऱ्या परिवाराला माझी ओळख अजूनही आहे.  ह्या  घराने मला कायम आपुलकी आणि प्रेम दिले आजतागायत. मी त्यांची सदैव ऋणी आहे. 
डाव्या हाताला घरातून लांब दिसणारे छायाचे घर. अध्यापनमध्ये दोन्ही पालक.  तिची आई आमची इंग्लिश शिक्षिका. सर्व मुली देखण्या आणि एकजात हुषार. त्यांच्याशी अजून ही अधून मधून संपर्क आहे. 

अशा शेजाऱ्यामध्ये राहून मी वाढले, कुठेही भेदभाव, नकारार्थी भावना नसायच्या.  सर्व गप्पा टप्पा घरासमोरील अंगणात मोठ्याने व्हायच्या, कोणतीही कान फुसी नाही ! 
मुंबईत एका भिंतीचे दुसरीला समजत नाही, येथे भिंती, दरवाजे नावालाच असायचे. सताड उघडे दिवसभर. रात्री आडकाठी लावली जायची, कोणी जनावर वगैरे येऊ नये म्हणून असावे ते ही. कारण माणूस आला तर आमच्याकडे त्याला कायम आसराच असायचा. आम्ही गाव सोडून आलो तरी आमच्या ओटी वर कायम तिकडील शेतकरी, शहरातील दवाखान्यात उपचाराला आलेल्या आजारी व्यक्ती, पंचक्रोशी मधून तालुक्याच्या ठिकाणी कामाला आलेले  लोक ह्या सर्वांचे येणे जाणे असायचे. त्यांना लोक का म्हणायचे प्रश्नच पडायचा ! आजारी मनुष्य बरा होऊनच जायचा. आई चहा, भाताचे आधण कायम चुलीवर  ठेउन असायची. तिचा गोठा, म्हशी, भाचे, पुतणे, पुतण्या, कधी मधी शिक्षणाला राहिलेली गावाकडील मुले हे सर्व  सांभाळणे वेगळेच. आजूबाजूच्या  शहरी घरांपेक्षा आमचे घर खूप वेगळे होते. घर आपलेच आहे, केव्हाही या, जा हा रिवाज सर्वांना नवीन होता, त्यांना त्यात कुतूहल, गंमत ही वाटत असावी. पण कोणाचीही केव्हाही तक्रार नाही, घरातले  लोकांकरिता झालेले वाद विवाद ऐकून त्यावर फालतू चर्चा नाही. आई  घराला जुंपलेली वात्सल्य मूर्ती ,  वडील टोपी, shirt, धोतर नेसणारे, शिस्तीचे, दोघांना यथोचित प्रेम आणि सन्मान च मिळाला येथेही. शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेले आमचे कुटुंब ओळखी तील मुंबईत स्थायिक झालेल्या दीक्षितांच्या घरात भाडे देऊन वीस वर्षाहून अधिक राहिले आणि सर्वातून निवृत्त. होऊन मुंबई ला स्थायिक झाले ! माझे आजोबा पणजोबा गिरगावात रहायचे म्हणे आणि माझे आई वडील डोंबिवली ला राहायला आले. 
   
माझे शालेय जीवन   हिंडणे, मैत्रिणी त रमणे, खेळणे,  वडिलांबरोबर बाजारहाट करणे, त्यांच्या कामा निमित्त नदी पल्याड जाणे ह्यात गेले. माझा अभ्यास म्हणजे शाळेत पूर्ण लक्ष देणे,  दिलेला गृहपाठ शाळा सुटल्यावर लगेच करून मोकळे होणे, परीक्षेच्या वेळी पाठ्यपुस्तकातील सर्व धडे दोनदा वाचून महत्वाचे लक्षात ठेवणे, बास! एवढाच असायचा ! बाकी वेळ, टायपिंग, विविध स्पर्धा, वाचनालयात  अधाशी प्रमाणे  तासन् तास  वाचणे यात जायचा !  असे आमचे लहानपणीचे शेजारी कायम लक्षात राहणारे ! 

मुंबई

राजापूर हून मुंबई हे मोठे स्थित्यंतर होते. अफाट लोकसंख्या, लागून इमारती, सर्व धर्मीय, प्रांतीय शेजारी. तरीही माझा प्रवास महाराष्ट्रीय वसाहती मध्येच प्रभादेवी, माहीम,  पार्ले, बोरिवली, डोंबिवली, ठाकुर्ली, मुलुंड, ठाणे, सायन, दादर इत्यादी ठिकाणी भटक्या जमाती प्रमाणे झाला ! नवनवीन शेजारी. Mhb वसाहतीत तर एकाची मुले घरा समोरच विधी करायची. केव्हा समोरच्या घरात कोणी दरवाजा बंद होऊन अडकले असेल तर लांबूनच खाणाखुणा करून त्याला सोडवायचे ! रात्रीचे गरबे असायचे. एवढ्याशा खोलीत एकत्र कुटुंबे राहायची दाटीवाटीने, आम्हीही ! तेथे रात्र मोजून चार तास असायची, परत  कष्टाचा दिवस सुरू अख्या वसाहती चा .  सर्वच शेजारी, एकमेकाला मदत करणारे, ओळख असण्याची ही जरुरी नसायची. कॉलनी सर्वांची ! एकंदरीत ते ही जीवन अनुभवले. 
बोरिवली ला सर्व शेजारी एकमेकाला धरून, कुटुंबे साथ देणारी. मी उपरी असले तरी कोणीही तसे जाणवू दिले नाही, अशी आपुलकी. डोंबिवली ला सहकारी वर्ग वेळेला धाऊन येणारा ! शेजारी दोन्ही जोशी,  अल्प कालावधीत  त्यांच्याशी ही आई वडिलांची छान गट्टी जमली. त्यांच्यावर जशी जबाबदारी टाकून मी मुलुंड ला राहायला आले. 
वडील गेले तेव्हा हेच शेजारी घरच्या सारखे वाटले.  सर्वांनी रजा घेऊन  आम्हाला मदत केली, त्यांना साश्रू निरोप दिला, ह्याहून अजून कोणते माझे भाग्य ? मी त्यांची कायमची ऋणी 🙏 .  ठाकुर्ली मुलुंड ला जास्त घरोबा कुणाशी झाला नाही कारण वास्तव्य वर्षभर ही नव्हते. ठाण्याला मात्र आमचे एकदम घरगुती संबंध प्रस्थापित झाले. एका बाजुला साळकर लहान कुटुंब आणि दुसरीकडे भांडारे एकत्र कुटुंब. दोन्ही कडे ज्येष्ठ पिढी व मुले. एका च्या घरात खुट झाले तर दुसरा विचारणार काय झाले ? असे असल्याने घरी आजी, पणजी असतानाही मी निश्चिंत दिवसभर ऑफिस ला जात होते.  लक्ष ठेवा वगैरे काही न सांगताच खिडकीतून सर्व आलबेल आहे ना हे आमचे दोन्ही शेजारी पाहायचे. केवढे हे न मागता लाभलेले भाग्य ! माझ्याकडून ह्या दोन्ही कुटुंबांना तसे म्हटले तर काहीच मदत होत नव्हती, तरीही आपली जबाबदारी मानून हे शेजारी घरचे काका काकी झाले होते. 

तेथून सायन ला आल्यावर अल्पकाळ का असेना पाने बाजूचे दोन शेजारी , एक ख्रिश्चन शिक्षिका आणि समोर राहणारे दोन तरुण डॉक्टर ह्यांनी आमच्या लहान मुलांना जरुरी तेव्हा मदतच केली. २००५ च्या मुंबई च्या महापूर प्रसंगी आमचे वास्तव्य तेथेच होते. तेव्हा परधर्मीय पर प्रांतीय असा कोणताही भेदभाव न दिसता माणुसकीचेच दर्शन झाले. 

आणि आता सध्याचे वास्तव्य गेले १७-१८ वर्षे. अगदी गिरगावातील चाळी ची आठवण करून देणारे. नव्या जुन्या रहिवाशांचे मिश्रण पण चपखल एकमेकात सामावलेले. शेजारी परांजपे. आम्हाला शेजारी चांगले मिळाले म्हणून आम्हालाच नावाजणारे !  यशस्वी नोकरी निवृत्ती नंतर लाफ्टर क्लब ला जाऊन , तेथे वेगवेगळ्या कला सादर करून, मुला नातवंडांना सांभाळून भजन छंदात रमणाऱ्या संध्या ताई आणि त्यांना समर्पक साथ देणारे काका. मुले हुषार, प्रेमळ. आम्हाला त्यांची सदैव जाग आणि सोबत. त्यांची मुले, नातवंडे लांब राहत असली तरीही ओळख ठेऊन सदाचारी आहेत. तरुणी, ज्येष्ठ अशा आम्ही सर्व गच्चीत किंवा घरी वेगवेगळे उपक्रम राबवतो. तेथे पिढी. मधील अंतर जाणवत च नाही एवढे सर्व एकमेकींना सांभाळून घेतात. इथे मला माझे लहानपण चेच दिवस आठवतात, मैत्रिणींबरोबर मजा करण्याचे ! 

असे हे आमचे विविध शेजारी, सोबती.  नात्या पेक्षाही गरजेला सर्वात अगोदर धाऊन येणारे. गंमत म्हणजे आम्ही नोकरी निमित्त दिवसभर घराबाहेर असूनही ह्या सर्व ठिकाणी शेजाऱ्यांच्या चाव्या आमच्याकडे आणि 
आमच्या सुखी संसाराच्या चाव्यांचे एक टोक त्यांच्याकडे ! 
निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात आणि हे मी आवर्जून माझ्या कार्यालयात पण सांगायची की बाबांनो, माझ्या चुका मला दाखवून द्या, त्याशिवाय माझी प्रगती नाही.. परंतु ह्या माझ्या शेजाऱ्यांनी केव्हा आमची निंदा केल्याचे ऐकिवात नाही अजून तरी !! 



गच्ची 


 पूर्वीच्या काळी उंच मजल्यावर राहणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जायचे, आत्ताही तसेच आहे, पण आता मोठमोठे टॉवर्स आहेत. जिने चढावे लागत नाहीत. तर कोकणात दुमजली, तीन मजली घरे असायची. आमच्या  घरासमोर बंगला आणि त्यात गच्ची होती, तिचे अप्रूप राहिले नेहमी.  मुंबईत ला आल्यावर तिसरे, चौथे मजले राहून झाले. गॅलरी  मिळत गेल्या पण गच्ची ची मजा काही न्यारी असायची. इमारती मधील सर्व रहिवासी एकत्र येणे, काही कार्यक्रम करणे हे शक्य होते. ठाण्याला असताना आम्ही फक्त एकदा वार्षिक कार्यक्रम करायचो, गच्चीत. 

दादर मधील आमच्या इमारतीला छान  लांब लचक गच्ची लाभली आहे.  वर्षातून एकदा संमेलन  किंवा personal पार्टी साठी तिचा वापर होऊ लागला. हळूहळू सर्व जण, स्त्री वर्ग प्रामुख्याने, नोकरी धंद्यातून थोडे मोकळे होऊन भिशी, हळदी कुंकू, राष्ट्रीय  सण, कोजागिरी असे कार्यक्रम आम्ही करू लागलो. इमारतीतील महिला वर्गाला एकत्र येऊन रिचार्ज होण्याचे आमची गच्ची हे प्रमुख स्थान ठरले. 
गच्ची चा उपयोग वैयक्तिकरित्या मी बराच केला असे मला वाटते. मला चालायला खूप आवडते. Covid काळात अगदी पंचाईत झाली, कुठे जाता येईना,  भीती पोटी. मग गच्चीच आली कामाला ! आमच्या समोरच एक बंगला आहे, ती सुद्धा गच्ची छान सजवून बाग, व्यायाम, भोजन, गप्पा अशासाठी वापरली जाते ते पाहून प्रेरणा मिळते. 
आमच्या इमारती च्या गच्चीत काय काय गुजगोष्टी केल्या मी सकाळ संध्याकाळ.. किती पक्ष्यांचे दिनक्रम पाहिले, त्यांचा नियमित वावर मनाला उभारी द्यायचा.  त्यांचे उडणे एकदम प्रेरणा दायी. पंखात हवा भरून घ्यायची मग थोडा विहार करायचा, पुन्हा थोडे पंख मारून हवा भरून घ्यायची पुन्हा तयार एका लयीत प्रवास करायला !  एकेक समूह जेव्हां एखाद्या इमारती भोवती फेर धरून मुक्त मौज करतो तोही खूप आल्हाद दायक.  असे recharge होणे आपल्याला ही जमले पाहिजे ह्याची जाणीव झाली.  ते अचानक इकडून तिकडे समूहाने जायला लागल्यावर समजावे त्यांना कोणत्या तरी संकटाची चाहूल लागली आहे किंवा कोठेतरी खाद्याचा साठा उपलब्ध झाला आहे ! पक्ष्यांना वातावरणातील बदल सर्वात अधिक समजतात असे आढलून आले आहे. . एवढेसे पक्षी आकाशात विहार करताहेत आणि आपण मानव, शिकले सवरलेले, छोट्या छोट्या गोष्टींनी खाली बसतो ह्याचे वैषम्य ही वाटायचे. 
पोपट, कबुतरे, चिमण्या, कावळे, कोकिळा, सर्व संध्याकाळचे गच्चीतून स्वच्छंद फिरताना दिसले. कावळ्यांच्या तर नेहमी सभाच भरायच्या, त्यातून माझ्यासारखी ला शब्द धुमारे  नाही  फुटले तर नवलच ! 
कबुतरांचे प्रणयाराधन गच्चीच्या कठड्यावर नेहमीच चालू असते, पण एकदम शिस्तशीर ! मादी लगेच राजी नाही झाली तर नर अगदी सहनशीलता ठेवून असतो ! मादी पण स्वतःचे लाड पुरवून घेते ! मध्येच सफेद बगळे ठराविक मोसमात हजेरी लावून जातात, जास्त करून संध्याकाळचे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जाताना दिसतात. छान वाटते, नेहमी जोडीने असतात. 

आकाश.. किती रंग दाखवावे त्याने. किती छटा, सुख दुःखाच्या.. उगवती, मावळती पाहणे अतिशय नयन रम्य. 
पांढरे, काळे, राखाडी, निळे, जांभळे अशा विविध छटा पाहून मन पण वेगवेगळ्या भावनेने, आठवणींनी व्यापून जायचे. कधी काळी आकाशाचे भव्य स्वरूप पाहून मन ठेंगणे व्हावे, सूर्याची प्रखर ताकद, चंद्राची नाजूक शांत,  
दर दिवशी वाढणारी मूर्ती, ढगांचे विविध आकार,  त्यातून 
भासणाऱ्या आकृती आणि सुचलेल्या कवी कल्पना, किती मनमुराद आस्वाद घेतला आहे ह्या सर्वांचा मी. माझा फोटो काढण्याचा छंद ही पुरवला गेला. रोज एक तरी फोटो काढतच होते, एवढी वैविधता ! थोडासा शिडकावा पडून गेल्यावर दिसलेली इंद्रधनुष्य थेट बालपणात घेऊन जायची श्रावण मासी कविता म्हणायला !

रात्रीच्या लुकलुक करणाऱ्या चांदण्या आकाशाचे स्टेज कसे सजवून टाकायच्या !  शुक्र आणि बुध स्वतः चे आगळे स्वरूप दाखवणारे ! ग्रहणे मात्र जास्त पाहिली नाही गच्ची तून कारण घरातूनच क्वचित दिसत असत.
आणि ह्या सर्वांना साजेशी तिन्ही सांजेला चमचम करत आपापल्या मुक्कामाला निघालेली विमाने, अहाहा ! काय देखावा असतो आकाशात. आपल्याला ही आपल्या मनीच्या रम्य ठिकाणी घेऊन जातो. 

आम्ही आमची गच्ची covid काळात वापरली ते पाहून कदाचित आजूबाजूच्या रहिवाशांनी आपापल्या गच्च्या साफ करून घेतल्या. कोणी झाडे लावली, मुले खेळायला लागली, कपडे वाळत घातले गेले आणि ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळचा एक विरंगुळा झाला. तरुण रहिवासी पण थोडे हवा खायला येऊ लागले.  आजूबाजूच्या इमारतीतील बगीचे पाहूनही मन खुलून जाते. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे !! खरेच अशी प्रेरणा घेऊन सारे सुखी शांत जीवन जगायला मदत करतील तर ते जीवन किती समृद्ध होईल. 





 पाहुणे आणि हॉटेल 


मध्यंतरी म्हणजे बहुधा गेल्या वर्षी एक पोस्ट वाचनात आली होती की पुणे मुंबई कडील लोक कोणी पाहुणे जेवायला किंवा राहायला आले की विचारतात पोळ्या किती करू किंवा त्यांना सरळ हॉटेल मध्ये घेऊन जातात. ह्यावर माझ्या मनात घर करून राहिलेले विचार - 

कोकणात असताना कोणी ना कोणी आले गेले असायचे घरी, गप्पा गोष्टी, तालुका किंवा जिल्हा ठिकाणी आल्यावर कामे होऊन परतायची बस मिळेपर्यंत कोणी नातेवाईक किंवा जवळचे स्नेही ह्यांच्याकडे जाणी येणी असायची. फोन वगैरे करायची जरुरी नसायची, किंबहुना नसायचेच तेव्हा मध्यमवर्गीय लोकांकडे. आमच्या घरी चुलीवर नेहमी चहाचे आणि भातासाठी आधण असायचेच. भात, भाकऱ्या, पिठले  ह्यांना तोटा नसायचा आणि सर्वांनी गप्पा  करत एकत्र जेवायचे असल्याने आपोआपच सर्व फस्त व्हायचे. उरलेच तर गडी माणसे, कामवाल्या, चारा वाल्या उन्हातान्हातून फिरणाऱ्या असायच्या, त्यांना दिले जायचे किंवा भाकरी दुसऱ्या दिवशी दशमी साठी उपयोगी यायची. त्या काळी फ्रीज नसायचे,  जरुरी ही नव्हती गावा गावा मध्ये.
बरे, घरातल्या गृहिणी ना स्वयंपाक करणे हेच प्रमुख काम असल्याने कोणी आले राहायला तर जेवण करण्याचे विशेष कष्ट नाही वाटायचे. आणि हे पाहुण्यांचे राहणे म्हणजे आपला आग्रह असायचा, आलात आहात तर थोडे जेऊन , राहून आरामात जा. किंवा त्यांचे तालुका, जिल्हा ठिकाणी काम एखादे दिवशी झाले नसेल तर आपोआप दुसऱ्या दिवशी पर्यंत राहणे व्हायचे. 
सांगायचा मुद्दा हा की मुंबई पुण्यासारख्या शहरात रोजचे जीवन , सुट्ट्या, छोटी कुटुंबे, लहान राहत्या जागा, वेळेची बंधने हे सर्व असते. महिला वर्ग ही नोकरीत अडकलेला, मुले पाळणा घरात ! त्यामुळे कोणी नातेवाईक  किंवा पाहुणे अचानक आले तर गृहिणीची थोडी तारांबळ उडते आणि मग पाहुण्यांना घेऊन रेस्टॉरंट मध्ये जाणे अपरिहार्य होते. एखादी व्यक्ती खपून जाते पण कुटुंब आले तर अशी पंचाईत ! फ्रीज असल्याने एक दोन दिवसाची कणिक  मळून ठेवली असेल तर उत्तम, नाही तर रात्री ऑफिस मधून घरी आल्यावर करणे नको वाटते. इथल्या पालकांना तर मुलांचा अभ्यास ही पाहायचा असतो, सकाळी लवकर उठून डबे तयार करून लोकल गाठायची असते. ह्या सर्वात पाहुणे येणे, त्यांचे गप्पा मारणे व राहणे हे तिला खूप हवे असते , रूटीन मधून change म्हणून, नाती जपायची ही असतात तिला. पण व्यवहार किंवा वास्तवाचे ही भान आले आहे आता. त्यामुळे ती गृहिणी पाहुण्यांसह हॉटेल मध्ये जेवायचा किंवा घरी पार्सल मागवायचा पर्याय निवडते. त्यामुळे उरल्या सुरल्याचा प्रश्न येत नाही. शहरी  खाणे आणि गावाकडील खाणे ह्यात फरक पडतोच थोडासा. घरात भाज्या , बाकी सामान, पिठे इत्यादी असेल तर पटकन स्वयंपाक  नक्कीच जमतो  तिला पण खाणाऱ्याचा अंदाज नसल्याने  जेवण कमी जास्त झाले तर दुसऱ्या दिवशी डब्यात घेऊन जाणे तिला रुचत नाही कारण तेथे ही सर्व ग्रुप मिळून जेवतात, मुलांच्या बाबतीत ही तेच. ताजा डबा देणे केव्हाही महत्वाचे.  बरे, हल्लीच्या जीवन शैली मध्ये नाना प्रकारची दुखणी टाळायची असतील तर ताजे गरम अन्न खाणे हा सर्वोत्तम उपाय. 
आगाऊ सूचना देऊन येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही करून    ठेवता येते, जे टिकाऊ असेल. मुंबई पुणे मधील ट्रॅफिक पाहता दिलेली वेळ नेहमी पाळली  जातेच असे नाही. रात्रीचे  पाहुणे असतील तर त्यांची राहण्याची व्यवस्था किंवा दुसऱ्या दिवशी चे नियोजन ही करायचे असते. घरी किंवा पाहुण्या मंडळी मध्ये बालके असतील तर त्यांच्याकडे ही लक्ष पुरवायला लागते. दिवसाच्या  पाहुण्यांचा चहा वगैरे घरात मस्त गप्पा झाडत पिण्यात पण मजा असते. प्रवासातून आल्यावर कडकडून भूकही लागलेली असते. आलेल्या  पाहुण्यात सखी , बाई माणूस, थोडी  ज्येष्ठ महिला असेल तर ती लगेच गृहिणी ला मदत करायला जाणार, आपसूक !  का बरे तिला स्वस्थ बसू देऊ नये आपण ? तिला ही थोडा आराम नको का ? हे सर्व टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे जेवण बनवून घेणे, पार्सल मागवणे किंवा सरळ छानशा hotel मध्ये जाऊन pending पार्टी देणे, मस्त गप्पा करून पाहुण्याना  हवा तसा हवापालट घडवणे !  
पूर्वीच्या काळी मुलींना जेवण येते का नाही, सुगरण कोण, अमूक घरी उत्तम स्वयंपाक, वगैरे पाहिले जायचे. आता मुलांना ही जेवण बनवता येते, सर्व काही मायाजाल वर उपलब्ध असते. आवड असली तरी वेळेचे बंधन येतेच. 
थोडक्यात, जशी वेळ तसे करावे, पाहुणे काय म्हणतील किंवा कायम मनात घर करून बसलेल्या अपराधी भावनाना थारा देण्याची जरुरी नाही.  सुट्टी असेल, एखादा  सण साजरा करायचा असेल, आमंत्रण देऊन पाहुणे येणार असतील तर काही गोष्टी घरी कराव्यात, वेळकाढू गोष्टी मागवून घ्याव्यात. स्तोम कशाला माजवयाचे ! 
क्वालिटी ला प्राधान्य देऊन आलिया वेळेसी असावे सादर !
****

 बँक आणि मी 


उणी पूरी चाळीस वर्षे बँकिंग क्षेत्रात काम केल्यावर काही आठवणी नाहीत कसे शक्य आहे ! 

मनाने थोडे मागे गेल्यावर खूपच आठवणी दाटून आल्या. 

बॉम्ब स्फोट झाले, पूर आले,  train accident , काही झाले तरी आम्ही आपले office मध्ये, जीव मुठीत धरून ! Bnkg ही एक सेवा असल्याने  कोविड काळातही रोज जाऊन काम केले.  एक दोन वेळा office मध्ये राहायला ही लागले आहे. हा जो मिळून मिसळून आपले  समजून एक दिलाने काम करण्याचा अनुभव असतो तो खूप काही देऊन जातो, पुढील आयुष्यासाठी.
ऐशीच्या काळात bnkg क्षेत्राचे खूप आकर्षण होते .BSRB  मधून नव्याने झालेल्या बँकेमध्ये नोकरी मिळाली.  सळसळणारे  रक्त आणि कामाचा प्रचंड उत्साह. माझे पोस्टिंग divisional office ला,  पण जरुरी  भासल्यास एखाद्या शाखेमध्ये पाठवले जायचे, तसे एकदा काळबादेवीला पाठवले गेले. Counter जॉब नसला तरी  खूप रहदारी, सगळ्या छोट्या दुकानदारांची खाती.  एकदा अचानक लक्षात आले अरे आपण वर जातोय बसायच्या  जागी, तो जिना तर ओपन आहे आणि खाली बाकी सहकारी, खातेदारांची ये जा चालू आहे ! झाले, त्यावेळी  नेहमीचा पेहराव मिडी असायचा , तो घालणे बंद केले ! ह्याच बँकेत एक अधिकारी होते , सुरुवातीच्या मला वाटते पहिल्याच दिवशी असावे,  म्हणाले हा चेक व्यवस्थित  लिहिलास तर तू बँकर. ९०० रुपये पगार असताना प्रथमच पाच लाखाचा चेक लिहिला सर्व नियम पाळून ! अधिकारी खूष, माझी कॉलर ताठ ! नंतर मी ती बँक सोडून औद्योगिक बँक मध्ये भरती झाले, जेथे मला अपेक्षे  प्रमाणे कामाचे समाधान समाधान मिळाले. तेथे मी 1982-2020 दरम्यान कार्यरत राहिले. 
एकदा असेच एक धंदेवाईक गृहस्थ पैशाची थैली घेऊन आले.  डोळ्यात न मावणारी cash पाहून माझी तर धडकीच भरलेली . अर्थात boss नी त्यांची रवानगी  investment साठी योग्य ठिकाणी केली . काही लोक त्यांच्या  रिवाजा प्रमाणे दिवाळी दरम्यान भेटी आणून द्यायचे. पाचशे रुपये वरील काहीही आम्ही घेणार नाही म्हणून सांगायचो आणि नंतर boss ला मिळालेल्या सर्व भेटी एकत्र करून पुऱ्या dept ला वाटायचो . त्यात प्रामुख्याने सुका  मेवा , मिठाई, भांडी, tray अशा गोष्टी असायच्या. हा माझ्या साहेबांचा मोठेपणा होता. तेच diary calendar बाबतीत. मला मिळालेल्या diary चा उपयोग मी कविता लिहिण्यासाठी केला. 
मला boss देतील तेवढेच फक्त  घरी आणले जायचे. एकदा घरी  एक crockery सेट आला. त्यांना फोन करून फैलावर  घेतले आणि सेट  परतून लावला. डोळ्यात तेल घालून ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागायचे . असे आमचे शिस्तीचे दोन साहेब आणि मी, खूप वर्षे एकत्र होतो. 
माझे पोस्टिंग आमच्या ट्रेनिंग centre ला झालेले तेव्हा श्रीलंके मधून ही participant आलेले. ट्रेनिंग झाल्यावर श्रीलंकेहून एका मुलीने पत्राद्वारे  नावानिशी आभार मानले आणि आमच्या पूर्ण प्रोग्राम चे कौतुक केले, ती एक जपून ठेवलेली आठवण. 
Head office ला असल्याने बाकी सर्व शाखांशी फोनवरून संपर्क व्हायचा. शाखाप्रमुख मीटिंग साठी हेड ऑफिस ला आले की न चुकता भेटून जायचे. ही सगळी संपत्ती निवृत्त जीवनाला उभारी देण्यास नक्कीच उपयुक्त ठरते. 
ही संस्था जेव्हा आमच्याच रिटेल शाखेला merge झाली तेव्हा एकदा असेच घराजवळील आमच्या एका शाखेमध्ये ओळख करून घ्यायला म्हणून गेले तर तेथील  अधिकारी स्वतः खिडक्या दरवाजे बंद करत होते !कारण विचारले तेव्हा समजले आज वॉचमन आलेले नाहीत ! 
पुढे demonetisation  काळात  माझी रवानगी chest मध्ये, तेव्हा  प्रथम तोंडाला मास्क लावलेला, सहकारी बँक कडून आलेली कॅश मोजताना !  Demonetisation काळात तर एक खातेदार बळजबरीने आमच्या एका manager च्या केबिन मध्ये घुसून पैसे मागू लागला. आमचा manager तेवढाच ताकदीचा होता म्हणून त्याने निभावले. माझ्या सारख्यांची काही चालली नसती. तरीही मला विश्वासाने  नेहमी नवनवीन ठिकाणी पाठवायचे. 
अशा काही ना काही प्रसंगामुळे  शाखेमध्ये  काम करण्याची माझी आंतरिक इच्छा नसायची. पुढे पुढे केले शाखेत काम , पण वेगळ्या प्रकारचे, over the counter नाही करावे लागले, हे माझे भाग्यच. मला कोणाला धमकावयाला जमायचे नाही, शक्यतो सामोपचाराने तोडगा काढण्यावर भर असायचा ! संप, धरणे ह्या वेळी पंचाईत वाटायची कारण समोर काम दिसायचे, त्यामुळे प्रत्येक वेळी कामालाच अग्रक्रम दिला. एक दिवस काम न केल्याने आपल्या बँकेचे किती नुकसान होणार आहे, हाच विचार मनी यायचा. 
निवृत्त झाल्यावर माझ्या नोकरीने मला किती शिकवले, आमचे active आयुष्य कसे सुखा समाधानात गेले, एकमेकांना समजून खेळीमेळीने  कशी कामे केले, सहकारी  वर्ग, मित्र मैत्रिणी ही सर्व शिदोरी कायम बरोबर राहणारी, मन प्रसन्न ठेउन आनंद देणारी ! 


 मैदान 


 मैदान मला नेहमीच खुणावत राहिले. 

शाळेचे मैदान खूप भव्य होते आणि मला कवायत ही खूप आवडायची. PT च्या विषयातील उंच उडी जास्त आवडायची, उंच होण्याचे स्वप्न असे प्रदर्शित व्हायचे ! 
भारती मुळे उशीर झाला कि मैदानाला दोन फेऱ्या मारणे ठरलेले असायचे, पण त्यात ही गंमत वाटायची, पुन्हा उशीर नाही करायचा वगैरे दोघींना ही वाटत नसावे असे वाटते ! कबड्डी हा आवडता खेळ, volley ball ची शाळेची टीम होती. Team मध्ये नव्हते पण चार पाच वेळेला नेट वरून ball घालवल्याचे लक्षात आहे. अर्थात खेळात कोठेही चमकले नाही. मे  महिन्यात लगोरी, पत्ते व इतर सर्व सुट्टी तील खेळ मात्र भरपूर खेळले आहे, त्याला कुणाची ना नसायची ! 
घरून पुस्तकी अभ्यास करण्यावर जास्त भर असायचा. मला NCC ला जायची खूप इच्छा होती पण घरून विरोध. बरे मी काही अभ्यास सोडून देणार नव्हते पण माझ्या वडिलांना माझ्या क्षमतेची कल्पना असणार ! 
तर अशी माझी  मैदानाशी गट्टी आणि काही अतृप्त इच्छा ! 

पुढे मुंबईला आल्यावर लक्षात आले इथे भरपूर मैदाने आहेत, धावायला, खेळायला, कर्तुत्व दाखवायला ; मात्र ती लांब लांब  खुणावत रहायची येथे ही. कुणीही यावे खेळावे अशी मैदाने नव्हतीच ती ! प्रचंड लोकसंख्या, जीवघेणी स्पर्धा ह्या सर्वातून ताऊन सुलाखून निघालात तर मैदान तुम्हाला खुले.. मग मी माझ्या एकंदरीत परिस्थितीला साजेशी मैदाने निवडली. थोडीफार न्याहाळून घेतली लांबून. कधी काळी जमल्यास तेथे डोकावयाला..
तर मुंबई ला येऊन सर्वात महत्वाचे, गरजेचे नोकरीचे मैदान काबीज केले. College चालू होतेच. वेळ मिळेल तेव्हा भारती बरोबर ज्युडो शिकले, ज्ञाना पुरते. संवादिनी ही.
पुढे पुढे मैदानात स्पर्धा दिसू लागल्यावर अजून शिकण्याची उर्मी आली. शिक्षणाचे मैदान हे केव्हाही अमर्याद. शिकावे तेवढे कमी. नोकरी साठी लागणारे छोटे छोटे courses ही केले. पुढे जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले, तेव्हा ह्या courses ना महत्व उरले नाही. तरी  cv मध्ये लिहायला कामी आले.
शिक्षण, नोकरी करत निसर्गाची ओढ लागली. ती भागवली. ते ही मैदान अतिशय सुरेख. तेथे मात्र जराही स्पर्धा नसायची. सर्वजण छांदिष्ट, प्रसन्न मनाने निसर्गात रमायचे. दोन तीन वर्षे मनमुराद trekking केले. Recharge होत गेले. हळूहळू घरून विवाहासाठी दबाव येऊ लागला. तो ही आखाडा महत्वाचा ! जमेल तर खेळायचे नाहीतर सोडून द्यायचे असे  आत्ता सारखे दिवस नव्हते ते ! सर्व काही विश्र्वास आणि नशीब ह्या दोन गोष्टींवर विसंबून चालायचे. 
झाले, विवाह ठरला, झाला आणि प्रचंड मोठ्ठे मैदान समोर आले, केव्हाही न कल्पिलेले, न पाहिलेले ! तेथेही स्पर्धक नसले तरी प्रेक्षक मात्र भरपूर, अगणित!  सुरुवातीला भीड बाळगली. पुढे पुढे ती कमी झाली आणि सर्व खेळ मस्त वेगात चालू राहिले. मुले मोठी झाल्यावर carrom, बॅडमिंटनही खेळले त्यांच्या सरावासाठी. त्यातून ही खूप शिकता येते. 

आयुष्यभराचा खेळ, तुम्ही खेळाल तसा. नियम, बंधने तुम्ही पाळलीत तर, नाहीतर हवे झुगारून द्यायचे धारिष्ट्य. मला धारिष्ट्य ही नव्हते, तशी बंधने ही नव्हती. एकंदरीत माझ्यासाठी खेळ खेळत राहिले, मनमुराद. दमले ही खूप वेळेला तरी time please म्हणायची सोय नव्हती, शक्यच नव्हते. Show must go on ! 



मैत्रिणी 


 प्रत्येक व्यक्ती ला मित्र वर्ग हा हवाच. नसेल तर ती व्यक्ती एकलकोंडी !  ही मैत्री तुम्ही एकटे असता तेव्हा जास्त जाणवते, जरुरी वाटते. 

मला शालेय जीवनात भरपूर मैत्रिणी होत्या. पण त्यातील खऱ्या म्हणजे मनातले बोलू शकू अशी एकच होती.   ती आणि मी जोडी म्हणून ओळखले जायचो. अर्थात भारती. शाळेत तिच्या बरोबर जायचे, मग भले तिच्यामुळे उशीर होऊन मैदानाला दोन फेऱ्या मारायला लागल्या तरी बेहत्तर ! अभ्यास तिच्या बरोबर, खेळ तिच्या बरोबर, फिरणे तिच्या बरोबर ! तिची नी माझी ताटातूट झाली तेव्हा मी एकदम एकटी पडले आणि तो काळ नेमका नववी दहावी चा होता. ती दोन आणि पुढची ही दोन वर्षे अशीच जिवलग मैत्रिणी वाचून काढली. त्या काळी मोबाईल काय साधे फोन ही नव्हते उठसूट बोलायला. मग पत्र व्यवहार चाले. अर्थात एक मार्गी. त्या दरम्यान व एकटेपणा मुळे हळूहळू मला काव्य स्फुरून मी कवितेत व्यक्त व्हायला लागले ! कारण भारती नव्या दुनियेत गेली होती, तिच्या करिअर मध्ये बिझी. मी मात्र होते तेथेच, एकच ध्येय मनात ठेऊन, भारती गेली तेथे जायचे, मुंबई ला ! मुंबईत आमचे विविध नातेवाईक असल्याने, मुंबई ही तशी लांबून ओळखीची होती , तरीही तिची खरी ओळख भारती बरोबरच झाली. 
भारती खूप निरागस आणि प्रेमळ होती. तिच्या पालकांनी सुद्धा आमच्या मैत्री ला खतपाणी घातले होते, ही भाग्याची गोष्ट.  आम्हा दोन कुटुंबीय मध्ये सर्वच बाबतीत खूप अंतर असताना ही आमची मैत्री अजून टिकून आहे. 🙏अजूनही परदेशातून अगदी चार दिवस आली तरी मला भेट देण्याशिवाय तिची  ट्रीप पुरी होत नाही. आता मोबाईल क्रांती मुळे तास तास भर बोलणे होते ते वेगळेच.  तिच्या संगतीने मी ज्युडो ही शिकले ! शनिवारी अर्धा दिवस office असल्यावर न चुकता आम्ही भेटून सगळीकडे भटकंती ठरलेली. तिचा मुलगा आता doctor झाला आहे. राजापूरच्या घराबद्दल तिला खूप आत्मीयता असून दर वर्षी ती येथे येऊन राहते. खरेच,    तिच्याकडील धाडस, बिनधास्त पणा आणि आत्मविश्वास  प्रेरणा दायी आहे.
फणसासारखी आहे ती,  वरून काटेरी आणि आतून मधुर.

पुढे मी मुंबईत येऊन कॉलेज ला जाऊ लागल्यानंतर डहाणूकर मध्ये राजी भेटली. तिचा आणि माझा career प्रवास बरोबरीने चालू झाला. दोघी ही शॉर्ट hand च्या परीक्षा देऊन बारावी झालेल्या आणि पुढे अजून ती भाषा विकसित करायची होती. त्यामुळे संध्याकाळी क्लास, परीक्षा ह्या संबंधात आमचे  आदानप्रदान चालू झाले.  अगोदर डहाणूकर कॉलेज नंतर  सकाळचे म्हणून पोदार असे करत आम्ही दोघींनी बोरिवली - गोरेगाव - दादर- माटुंगा  ट्रेन किंवा दादर - कॉलेज चालत ग्रॅज्युएशन पुरे केले. 'पुरे केले'  म्हणण्याचे कारण पहाटे उठून सकाळचे कॉलेज वर्ग  'attend '  करणे एवढेच महत्वाचे होते कारण पुढे आम्हा दोघींनाही नोकरी करायची होती दिवसभर. मी मुंबई महानगर पालिकेत  आणि ती मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये. त्या वेळी आम्ही नोकरी करण्यासाठी लागणारी अर्हता अगोदरच पुरी करून ठेवली होती. मला शिक्षण पूर्ण करायला नोकरी शिवाय गत्यंतर नव्हते आणि तिच्याकडे त्या वेळची दक्षिणी संस्कृती . मुलगी झाली म्हणजे धनाची साठवण, हुंडा वगैरे, वडील चांगल्या नोकरीला  पण  थोडे कर्मठ..  पोस्ट ग्रॅज्युएशन ही एकत्र अभ्यास करून  केले नंतर आम्ही दीर्घ काळ IDBI, त्या वेळची मुख्य वित्तीय संस्था  आणि एअर  इंडिया येथे अनुक्रमे इमाने इतबारे मन लावून नोकरी केली. तिच्या प्रेम विवाहाला साक्ष देण्यापासून नंतरची काही वर्षेही आमची मैत्री उमलत राहिली. मुंबई मध्ये नवीन असताना माझ्या भाषा चांगल्या असल्या तरी इंग्लिश बोलताना तिचा सहवास कामी आला. तिचे मराठी आणि माझे इंग्लिश बहरू लागले..   मध्यंतरी काही काळ मैत्रीत खंड पडला तरी पुन्हा काही वर्षांनी मोबाईल फोन आल्यावर  आमचे संवाद चालू होऊन मैत्री पुन्हा जोम धरू लागली आहे. खरे पाहता ती मुंबईत जन्मलेली, दाक्षिणात्य ब्राह्मण. अस्खलित मराठी बोलणारी आणि इंग्लिश वर तसेच इतर भाषांवर  प्रभुत्व असणारी.  संगीताचे ज्ञान असणारी. मी साधी भोळी, बुद्धिवादी तरीही प्रेमळ, धाडसी थोडीशी tom boy type ( अर्थात हे भारती च्या संगतीतील परिणाम ) , संगीताची आवड,  आणि कष्टकरी !   आमची तत्कालीन ध्येये एकच. त्यामुळे एकमेकींशी विचारांची, गुणाशी नेहमीच  देवाणघेवाण होत राहिली आहे. 

Idbi मध्ये मी आणि ग्रेटा एकच दिवशी रुजू झालो. आमचे कार्य विभाग वेगवेगळे असले तरी जेवण एकत्र करू लागलो.  अतिशय सुंदर, मितभाषी, मंगलोरी ख्रिश्चन आणि मुंबईकर,  प्रेमळ, कुणाच्या अध्यात मध्यात नसणारी लाजवट ती आणि गव्हाळ रंगाची साधी पण हुषार वाटणारी, बोलकी, त्या वेळच्या बोली भाषेत घाटी वाटणारी पण नसलेली, चटचट  मी, एकमेकांचे होत गेलो ते अजून पर्यंत. आमचे तारुण्याचे दिवस आम्ही एकत्र जेवणात, केव्हाही काहीतरी मनात आलेले बोलण्यासाठी एकमेकांना साद घालणे,   मस्त फिरणे,  ट्रेकिंग, कार्यालयीन गॉसिपिंग  इत्यादी मध्ये छान जगलो. आमची जोडी office मध्ये वेगळी म्हणून उठून दिसायची !  तिच्या आईच्या हातचे डोसे आणि इडली अजूनही जिभेला स्वाद देतात. मी माझ्या बहिणीकडे राहत असल्याने व ती ही नोकरी करत असल्याने माझा ठराविक पोळी भाजीचा डबा असे. हळूहळू मला दाक्षिणात्य पदार्थांची गोडी लागली. 
या दरम्यान आमच्या अशाच एका गोड , सुंदर, लाघवी मैत्रिणीने लग्नानंतर थोड्याच दिवसात आत्महत्या केल्याने आमचे भावविश्व विस्कळीत झाले. मनाला सावरायला सहकारी तसेच वरिष्ठ मंडळींनी आम्हाला प्रत्यक्ष,  अप्रत्यक्ष रित्या खूप मदत केली. याच दरम्यान आम्ही दोघी आणि ज्योती अशी टीम अजून एक सहकारी मुलांच्या टीम ला जॉईन होऊन YHA चा  कुलू मनाली चा चंदरखणी ट्रेक केला. त्या अगोदर सरावासाठी आणि नंतर छंद म्हणून दोन वर्षे ट्रेकिंग मध्ये मस्त मजेत गेले. दोन दिवसाच्या आठवडा सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतला आम्ही. आमची मैत्री अशी बहरत चालली.  मी केव्हा हळवी झाले तर तिला गाणे म्हणायला सांगायची आणि ती ही केव्हाही आढेवेढे न घेता चक्क मला भेटून ते सादर करायची. घरी जाताना bus आणि train मध्ये आमच्या न संपणाऱ्या तारुण्य सुलभ गप्पा असायच्या.नंतर माझी बदली दुसऱ्या इमारतीत झाल्याने पुन्हा आमच्या भेटी फक्त फोन वर होऊ लागल्या

मी विधी विभागात आले ते थेट सात वर्षे तेथेच होती ! माझ्या पाठोपाठ, RFD मधून मेधा ही जसे काही माझी पाठ राखीण  म्हणून  विधी विभागात आली ती अजूनपर्यंत ! ह्या सात वर्षात अजूनही  जिवाभावाच्या मैत्रिणी भेटल्या आणि आमचा छान lunch group जमला.  अगदी पुढे जाऊन आमची कुटुंब मैत्री झाली. Covid काळातही आम्ही video कॉल द्वारे एकमेकाच्या संपर्कात राहून एकमेकाला आधार आणि आनंद  देत राहिलो. स्नेहा, सीमा, ललिता, कांचन ह्या ग्रुप मध्ये सामील होत गेल्या. आमच्या lunch time साठी आम्ही एका रिकाम्या छोट्याशा केबिन मध्ये बसायचो आणि बाजूला आमचे वरिष्ठ पण family oriented, मार्गदर्शक अधिकारी गप्पा ना प्रोत्साहन च द्यायचे ! त्यांनी सर्व विधी विभागाला छान बांधुन ठेवले होते. 
त्यानंतर माझी बदली प्रोजेक्ट finance मध्ये झाली आणि सर्व work culture च बदलले ! नवीन boss एकदम कडक, विधी विभागाच्या एकदम विरुद्ध, पण अतिशय हुषार, माणुसकी ला जपणारे, धार्मिक, स्वतःचा राग शांत झाल्यावर समोरच्या ची माफी मागणारे ! त्यांच्या बरोबर काम करताना खूप धमाल यायची, नवनवीन projects संदर्भात ते माझ्याकडून छान काम करून घ्यायचे, मला काही शिकवायला पाहायचे. त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास आणि career दृष्ट्या महत्वाचा पाया तयार झाला. तेथे तब्बल नऊ वर्षे काम केले. नंतर माझी बदली हैदराबाद ला झाली दोन वर्षे. तिकडे वेगळ्या अतिशय साध्या स्वभावाच्या प्रेमळ ,  निरागस मैत्रिणी लाभल्या. येथेच पुन्हा ज्योतीचा सहवास लाभला.  माझी trekking ची आवड जोपासण्यात तिचा मोठा सहभाग आहे. मी, ग्रेटा आणि ज्योती मुंबई च्या मुली म्हणून अगदी हिमाचल प्रदेशात ओळखू लागलो होतो कारण रोहतांग मध्ये बर्फ पडल्यामुळे अडकून पडूनही मस्त मजेत राहिलो एक दिवस, तक्रार न करता, निश्चिंत ! ह्या सर्वाचे श्रेय ज्योती ला जाते. प्रवास दरम्यान येता जाता, एखाद्या week end ला असे करत तिच्या मठ आणि सत्संग ची गोडी लागली. तेथेच मी रेकी  च्या दोन levels पुऱ्या केल्या. ज्योती अतिशय unique मुलगी. सिंधी  परिवारातील, कुटुंबाला आधार स्तम्भ, कामात हुषार, स्पष्टवक्ती, कुमारी राहून एका मुलीला दत्तक घेऊन तिचे अत्यंत निगुतीने पालन पोषण, शिक्षण, लग्न वगैरे करून देऊन आता स्वतः सन्यास घेऊन आश्रमात राहिली आहे.  तिच्या स्पष्टव्यक्ती पणामुळे तिचे तात्विक वाद ही व्हायचे कुणाही बरोबर, पण  ते तेवढ्या पुरतेच. कोणत्याही संकटाना हसत सामोरी जाणारी . जरुरी तेव्हा मुलीला, बहिणींना भेटून मदत असतेच.  किती आदर्शवादी जीवन आणि सर्व हसतमुख, हे महत्वाचे! 

मैत्रिणी वर लिहीत असताना मित्र वर्गाची ही आठवण होते. अल्प काळ पण त्या त्या वेळी मदतीला धाऊन येणारे पार्था, मेनन, वेंकी. हे सर्व कार्यालयीन साम्यामुळे वैयक्तिक  सल्लागार ठरले. वेंकी तर सर्वांचाच मित्र, त्याला केव्हाही हाक घाला,  सकारात्मक प्रत्युत्तर सहित हजर. मेहनती, हुषार, बिनधास्त आपली दुःखे झाकून हसत राहणारा अवलिया प्राणी. माझी गाण्याची फर्माईश केव्हाही सहज पुरी करायचा. त्याच्या आणि पार्थाच्या हातचे डोसे आम्ही मुली खायचो ! 

मुंबई ला परत आल्यावर lunch  ग्रुप बदलला आणि ग्रेटा आणि मी एकत्र जेऊ लागलो ! पण थोडेच दिवस. लग्नानंतर येथे काही वर्षे  एकटी राहून सर्वांना सांभाळणारी ग्रेटा नवऱ्याला भेटायला नोकरीवर तसेच  थोड्या दिवसांनी मिळणाऱ्या पेन्शन वर पाणी सोडून दुबई आणि नंतर canada ला निघून गेली. आम्ही नियमित एकमेकीना पत्र लिहायचो, आता फोन होतात सविस्तर, अजूनही never ending talk ! 

मी थोडीशी वर्कोहोलीक असल्याने मला ह्या माझ्या सर्व मैत्रिणीनी  मी वेळेवर जेवण घेण्यासाठी खूप मेहनत घेतली. एकत्र जेवण्याची मजा आम्ही अजूनही निवृत्तीनंतर घेत असतो. सहभोजनचा आनंद काही आगळाच ! कांचन ठाण्याला, मी ही ठाण्यात होते, स्नेहाचे माहेर ठाण्याचे, मेधाची बहिण ठाण्याला, असे आमचे हळूहळू कुटुंबीय ही ओळखीचे होऊन मैत्री वाढत गेली. 

कांचन मितभाषी पण नेमके बोलणारी, आमचे सर्वांचे हिशेब ठेवणारी, दोन्ही जावांबरोबर मैत्रीने राहणारी, थोडीशी reserved, सासूबाई कडून शिकून आम्हाला मस्त गरम गरम गूळ पोळ्या घेऊन येणारी. गोरी गोमटी असूनही Leap stick शिवाय तिला चैन नाही पडत! आणि कोब्रा असून मस्त कायम मांसाहाराचे डोहाळे लागलेली प्रेमळ श्रोती ! आमच्या सर्वात २-३ वर्षांनी लहान पण समंजस कांचन !   
स्नेहा लाघवी, हौशी, मस्त dress sense असणारी, ever green,  पण ऑफिस आणि घर ह्यात पूर्ण रमणारी. आमच्यासाठी वेळ देताना तिची खरेच तारांबळ व्हायची कारण संजय जास्त करून tour वर असल्याने तिला फक्त सुट्टीला लाभायचा. मी दादर ला राहायला आल्यावर आमची मैत्री अजून वाढली, office मधील आमचा कार्यालयीन प्रवास ही साधारणत: थोड्या फार फरकाने सारखाच होत गेला. 
ललिता म्हणजे आमची अन्नपूर्णाच. किती प्रकार करून आणायची आणि आम्हाला खिलवायची. तिच्या दाक्षिणात्य पदार्थावर आम्हा सर्वांची प्रथम उडी ! मेहनती सर्व परिवाराला बांधून ठेवणारी  मुलगी, आम्हा सर्व कोब्रा, कब्रा मध्ये छान रमली. आमचा हा लुंच ग्रुप खरेच सर्वांच्या कौतुकाचा विषय असायचा आणि काही जणींना त्यात सामील व्हायचे असायचे. पण आम्ही थोडक्यात मजा ह्या न्यायाने सीमित राहिलो. आम्हा सर्वांची wave length जुळल्याने आम्हाला अजून कोणी परकीय नको वाटले ! 
सीमा आणि मेधाने खूप वर्षांपूर्वी सेवा निवृत्ती घेतली तरीही आमची मैत्री आणि संवाद छान चालू राहिले. 
सीमा एवढी वर्षे परदेशात राहून, व्यस्त असूनही जेव्हां जेव्हां जमेल तेव्हा फोन करणे, नातवंडांचे फोटो पाठवणे, छान छान गाणी , व्हिडिओ share करणे हे चालू असते तिचे.  आमच्या बरोबर lunch ला बसणारी गोड मुलगी एकदम नवऱ्याची नोकरी बदलली म्हणून परदेशात जाते काय, तेथे जाऊन शिकते, तेथून अजून पुढे जात अमेरिकेत settle होते काय, स्वतः तेथील शिक्षण  घेऊन  नोकरी करून साठी नंतर ही नोकरी चालू ठेवते काय, बरे इथून गेलेला मुलगा तेथे निष्णात neuro surgeon आणि  त्याची  तीन  मुले  ह्या सर्वांबरोबर मस्त आनंदात आमच्या शी संपर्क ठेउन राहते काय, सर्वच कौतुकास्पद, सलाम त्या सीमा ला. 

मेधा सेवानिवृत्ती नंतर कुटुंबात रमली तरी स्वतः ला वेळ द्यायला शिकली आणि सतत काही ना काही शिकत राहून, जपान ट्रीप मधून खूप गोष्टीचा अभ्यास करून आता व्याख्याने देणे, स्फुट लेखन करणे, त्यांच्या पूर्ण परिवाराच्या वार्षिक गेट टुगेदर ची समर्थपणे जबाबदारी घेऊन, active सहभाग घेणे, सहली व्यवस्था करणे अशा कितीतरी गोष्टी ती सतत करत असते. तेही तिच्या मुलाच्या catering व्यवसायात सिंहाचा वाटा उचलून आणि एका यशस्वी cardiologist नवऱ्याला एकदम समर्पक साथ देऊन ! दोन्ही मुलांना सुजाण पालक म्हणून उत्तम रित्या वाढवणे हे तिच्या सेवानिवृत्तीचे फळ मिळायला तिने खूप मेहनत घेतली.  तिची ऊर्जा अशीच कायम राहू दे, कारण त्यातून आम्हा सर्वांना ही ऊर्जा मिळत असते ! Dr शेखर तर आम्हा सर्वांचे कौटुंबिक सल्लागार 🙏

आणि नीलिमा ! आमची हिरॉईन, सुंदर दिसणारी आणि वागणारी मुलगी. सासर माहेर सर्वांचे अगत्याने करणारी, मधुर आवाज आणि आवड असतानाही गाणे विकसित न करता जोडीदाराबरोबर जीवन संगीत गाणारी, आपल्या समस्या, दुःख विसरून भोवताली आनंद पसरवणारी,  हळवी , निरागस , हसतमुख, मैत्रीण. 
माझ्या या साऱ्या मैत्रिणी सुगरण बरे का, ऑफिस, घर, नातलग सांभाळून छान छान पदार्थ सादर करणाऱ्या ! 

अजून काही अल्पकालीन मैत्रिणी म्हणजे माझ्या पुण्याच्या वास्तवातल्या.. आम्ही सहा जणी एकत्र तीन खोल्यामध्ये राहायचो. स्वभाव, आवडी निवडी, वयोगट, भाषा, प्रांत, सर्व भिन्न असलेल्या पण मस्त राहिलो रोज चा दिवस छान संपन्न करत. प्रत्येकीला घरी लवकर जायचेच होते पण केव्हा रडके चेहरे करून नाही बसलो ! एकमेकांची काळजी वाहिली, समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. आपले संसार आठवड्यापूरते पार्श्वभूमीला ठेऊन येथे समरस झालो, एका तऱ्हेने हॉस्टेल life जगलो म्हणा ना, जरी मनात नेहमी विचार कुटुंबाचे ! 

ह्या सर्वातील मी ! 
घरातील आदर्शवादी, विकसनशील,  उत्तम सुसंस्कार आणि आजूबाजूचे सामाजिक तसेच शैक्षणिक भारावलेले वातावरण यामुळे शाळेत मी बऱ्यापैकी अभ्यासू, sincere म्हणून गणले गेले. हमखास result देणारी म्हणून मला प्राथमिक व माध्यमिक शाळेत नेहमी सर्व स्पर्धा, उपक्रमात भाग दिला जाऊ लागला. मी ही स्वतः टाचणे काढून वक्तृत्व, निबंध स्पर्धा, शालेय स्कॉलरशिप, हिंदी भाषिक  इत्यादी स्पर्धात  भाग घेऊन यश मिळवले. सुरुवातीला मराठी वाचनालयात भारती बरोबर रमणारी मी, आठवी पासून  typing आणि shorthand क्लासेस मुळे  इंग्रजी वाचण्याचा सराव करू लागले ज्याचा मला पुढे नोकरी दृष्ट्या खूपच उपयोग झाला. माझे drafting  सर्वत्र वाखाणले गेले. मुंबईत आल्यावर राजी, ग्रेटा आणि ज्योती ह्यांच्या मुळे मला हिंदी, इंग्लिश भाषा बोलण्यासाठी अजून सुकर झाल्या. माझ्या वडिलांचे वाचन , फिरती आणि जनसंपर्क भरपूर असल्याने आम्हाला ते सतत काही ना काही प्रेरणादायी गोष्टी कानावर घालायचे. मोठ्यांची उदाहरणे द्यायचे. आईकडून मेहनत, सहिष्णुता, हसतमुख परोपकार वृत्तीचे बाळकडू होतेच.  साने गुरुजी कथामाले मुळे संस्कार अजून दृढ झाले. मुंबईत आल्यानंतर देश तसा वेष,  तोंड बोलण्यासाठी दिले आहे, ऐकायला दोन कान, पाहायला दोन डोळे आहेत असे वडिलांनी मंत्र दिल्याने मी थोडीफार चौरस होत गेले.  मी विविध दृष्टीने निरुपद्रवी असल्याने माझी सर्वांशी पटकन मैत्री जमायची. गंमत म्हणजे मी कोकणातून आले असले तरी माझ्या एकंदरीत अवतरावरून मी काहीना गोवा, काहीना दक्षिणी तर काहींना कारवारी वाटायची, इंग्लिश प्रेमाने आणि  अस्खलित बोलल्याने ख्रिश्चन मुलींना जवळची वाटायची, त्यामुळे  विविध प्रांतीय मैत्री होत गेली. एक थोडीशी सीनिअर तर मला स्ट्रीट स्मार्ट म्हणे ! माझे भरभर चालणे असल्याने स्टेशन ते ऑफिस पळणाऱ्याचा एक ग्रुप झाला 
होता ! असो.  इच्छा आणि  बौद्धिक कुवत असल्याने मला परिस्थितीजन्य नोकरी करणे क्रमप्राप्त होते. अठरा पुरी होताच नोकरी चालू झाली ती अगदी साठी पर्यंत. इमाने इतबारे ! या सर्वात मला मानसिक बळ मिळाले ते  घर, शाळा आणि या मैत्रिणीकडून !  
माझ्याकडून असलेल्या सर्वांच्या अपेक्षा मला पुऱ्या नाही करता आल्या कारण मी संसारात मग्न होऊन इतर गोष्टी,  झेपतील एवढ्याच केल्या. त्याचा खेद नाही कारण आपल्याला एकाच वेळी सर्व साध्य होत नसते. आता अट्टाहासाने काही करावे असे ही वाटत नाही. 
जमेल तेवढे आनंदात राहून समोरच्याला आनंदी ठेवणे एवढीच मन धारणा आहे. जग सुखी तर आपण सुखी !  प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तर नक्कीच सर्वत्र सुख, शांती  पुन्हा  प्रस्थापित होईल ! 





माझ्या शाळा 


 शालेय जीवनातच किती तरी वेळा हा निबंध लिहिला होता. तर मग आता पुन्हा काय आठवले ? कारण एक प्राथमिक, मग माध्यमिक, नंतर कॉलेज आणि. मग जीवन शाळा ! परंतु येथे दोनच शाळा बद्दल लिहीत आहे.   शाळेची ओळख झाली ती आमच्या येथील कन्या शाळा. लहानपणी पाचवी पर्यंत आम्ही सर्व मुली तेथेच शिकलो. मस्त पटांगण, मध्यवर्ती ध्वजस्तंभ, दोन इमारती, आजूबाजूला लाल माती, चिरे, आडोशाला घाटी असे सुंदर दृश्य आमचे स्वागत करायला तयार असे. केव्हा केव्हा आम्ही आडवाटेने शाळेत यायचो तेव्हा रस्त्यात मस्त    पडलेल  असायचे, मध्येच देवयानी, एक सुंदर प्रेमळ थोडीशी ज्येष्ठ मैत्रिणीचे घर, वाचनालय असे सर्व मोह असायचे !  तिचा जोडीदार मुंबई हून यायचा तेव्हा चीतचोर मधील गाणी म्हणायचं  तेव्हा आमचा गाव अधिकच सुंदर व्हायचा !   मातीच्या भिंती आणि त्यातील सर्व मुलींच्या आवाजातील कविता, गाणी, महिन्याला केलेली भेळ, फेर धरून केलेले नाच हे होतेच आणि त्यात अगदी वात्सल्य सिंधू शेट्ये बाई असायच्या. लांबून बाजार पेठेतून येऊन कित्ती प्रेमाने त्या सर्व बाल जीवांचे मनोरंजन करता करता सर्व बालपणच सुसंस्कारित करून टाकायच्या. वर्गातील दोन प्रधान बहिणी नेहमी आठवतात. डोक्यावर पान थापून यायच्या! होत्या मात्र खरेच शांत स्वभावाच्या पण त्यांचे पाहून आम्हाला केव्हा असे केसांवर पान थापून यावेसे नाही वाटलेले ! 

साखळकर बाई शाळेच्या मुख्याध्यापिका, पूर्ण शाळा त्यांच्या उत्कृष्ट  कार्य शैली आणि  व्यवस्थेवर चालायची. इंदिरा गांधींना जसे HE man म्हटले जाई तसे त्या होत्या, संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या. दिसायला ही तशाच. डोक्यात एकच विचार, शाळा !  आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटायचा आणि त्यांच्यामुळे एक आत्मविश्वास ही असायचा.  स्वतः खूप हुषार, त्यांचा मुलगा बोर्ड मध्ये आलेला, तशी शाळेतील सर्वच मुले विविध परीक्षे मध्ये जिल्हा, राज्य स्तरावर यावीत असे त्यांना वाटे. खूप परिश्रम घ्यायच्या , माझ्यावर त्यांचे खूपच जीव. मी त्यांना थोडाफार न्याय देऊन चौथी ला स्कॉलरशिप मिळवली. ती पुढे सातवी पर्यंत चालू राहिली. 
शेटये बाई आणि साखळकर बाई, दिसायला, वागायला दोन टोके, पण त्यांच्यातील दुआ एकच, मुले आणि त्यांचा विकास !  

अतिशय भारावलेले दिवस होते ते. 


माध्यमिक शाळा 
 शाळेची सुंदर इमारत, मध्यभागी प्रशस्त मैदान, आजूबाजूला चिंचा, करवंदे  घेऊन बसलेल्या बायका, इकडून तिकडे धावणारे शिक्षक गण, मित्र मैत्रिणी बरोबर गप्पा मारताना अपुरी वाटणारी मधली सुट्टी हे सर्व चित्र डोळ्यासमोर असायचे आणि तसे निबंधात प्रतित व्हायचे.
शाळेची जागा आणि रचना ही सुंदर होती. शहरात शिरल्यावर दवाखाना, मंदिर आणि त्यानंतर लगेचच शाळेचा भव्य परिसर. मोठाले मैदान, लहान लहान विविध विषयाच्या इमारती, वाचनालय, कला केंद्र, मुख्य इमारत, असे सर्व एका पाठोपाठ उतारावर. बाजारपेठ किंवा गुजराळी कडून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तथा शिक्षक वर्गाला  चढ लागे थोडा शाळेत शिरण्यापूर्वी तसेच भटाळी मधील विद्यार्थ्यांना घाटी असायची. यशाचे ध्येय  गाठताना दम लागणारच , आपले ध्येय पायरी पायरी ने गाठायचे आणि पायउतार होताना पाय न घसरवता खाली यायचे ह्याची शिकवण च होती एक प्रकारे ! जी आत्ता लक्षात येते आहे !
 
आताच्या डोळ्यांना त्यावेळी गुरुजनानी घेतलेले परिश्रम, त्यांची तळमळ दिसते आहे. म्हणून हा लेखन प्रपंच. तो काळ  आणि सभोवताल ही तसेच होते. समाजवादी विचाराने भारावलेले वातावरण. मुलांसाठी, पुढच्या पिढीला घडविण्याची धडपड. खरेच सोनेरी दिवस लाभले आम्हाला. नव्या दमाचे नवीन गडी शाळेत येऊन दाखल होत होते आणि ज्येष्ठ गुरुजन त्यांना तयार करत होते. आमच्या शाळेला जवळ जवळ शंभर वर्षांची थोर परंपरा होती. दादा सरदेशपांडे ह्यांच्या कृपेने ही शाळा बहरत चालली होती. 

आमची शाळा composite होती म्हणजे सर्व विषय, सर्व कला शिकवणारी. श्रमदानाला महत्व देणारी. शाळेची नवीन इमारत बांधताना आम्ही थोडेफार जे श्रमदान केले काही दिवस,  ते अजूनही  ध्यानात आहे. त्यामुळे आलेला आत्मविश्वास नक्कीच पुढील जीवनाचा पाया ठरतो. 

स्वातंत्र्याची विशी उलटून गेली होती, नवनवीन पंचवार्षिक योजना साकार होत होत्या. नंतर आणीबाणीचे वारे ही वाहायला लागले. नव्याने स्वातंत्र्याची चव चाखणारे लगेच पुढे सरसावले. ऐन घटकेला आमचे आधारस्तंभ वासुकाका तुरुंगात गेले. आणि दहावीची तोंडावर आलेली परीक्षा. मन एकदम हवालदील झाले. तरी बाकी सर्व गुरुजनानी स्वतः जातीने लक्ष घालून आमची तयारी करून घेतली.  आम्हा चार पाच मुलांकडून शाळेला बोर्डात नंबर लागण्याची शक्यता वाटत असावी, त्यामुळे गणित, शास्त्र आणि भाषा या विषयांची आमच्याकडून अगदी जातीने तयारी करून घेतली गेली. कुणा कुणाची  नावे घेऊ ?  सर्वांचे लाडके आदरणीय वासू काका,  papers सोडवून घेणारे गुर्जर सर, प्रयोग शाळेत मुलांना रमवणारे, भौतिक शास्त्राची मुलांना आवड निर्माण करणारे महाजन सर, देशपांडे सपत्नीक, कला शाखेशी मैत्री वाढवणारे नवरे सर, AD, GD, AG सर, व्यायामाचे महत्त्व पटवून देणारे मोडक आणि भावे सर, accounts  शिकवताना आजूबाजूच्या जगाची ओळख करून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय शिकायला हवे सांगणारे कुलकर्णी सर..आणि एकंदरीत सर्व शाळाच मुलांच्या विकासासाठी झटत होती हे आमचे केवढे भाग्य. बरे, हे शिक्षक आपल्या विषयापुरते नसायचे. केव्हाही अडल्या गरजेला दुसरा कोणताही विषय घ्यायची तयारी असायची त्यांची. वासूकाका म्हणजे इंग्लिश व्याकरण आणि गणित चे आधारस्तंभ, आमच्या भावी जीवनाचा पाया त्यांनीच रचला. 
त्यांच्या प्रयत्नांना आम्ही अपुरे पडलो हेच खरे ! 
****

 अजून


 आज शब्दकोडे सोडवताना अजून हा clue होता आणि मला अजून म्हणजे अद्याप किंवा अद्यापि एवढेच येत होते. जसा आपण विचार करतो, अजून हे झाले नाही, अजून अमूक आली नाही वगैरे वगैरे. किंवा अजून त्या झुडूपा  मागे.. हे  सुंदर गाणे ही आठवले ! बाकीचे शब्द सोडवल्यावर तेथे 'आणखी ' हा शब्द चपखल बसला जो मला आत्तापर्यंत मनाला शिवला ही नव्हता ! हो, आणखी, अजून...अजून पाहिजे, आणखी हवे होते या अर्थी.. 


यावरून लहानपणीची एक आठवण जागी झाली. आमच्याकडे पिठले भात नेहमी असायचा. त्यात लोणचे घालून खाणे मला खूप आवडायचे, त्यामुळे पंक्ती ला बसल्यावर आई पिठले वाढत असली की मी म्हणायची आणखी.. नंतर हा शब्द वापरल्याचे स्मरत नाही. आणि, अजून हेच शब्द वापरात होते. 

आणखी म्हणजे अधिक. सकारात्मक पाहिले तर आणखी, अजून अभ्यास करायला हवा, अजून काही करायला हवे, अजून हे राहीले, ते राहीले वगैरे.  अजून हे हवे, ते हवे असे म्हटले तर तो लोभ झाला, हाव किंवा पुढे जाऊन हव्यास ही म्हणता येईल. हा हव्यास आपला संपत नाही. एखादी गोष्ट आवडली की ती अजून हवी असे वाटणे. समाधान न होणे. 
त्यातून मग ती गोष्ट मिळवण्यासाठी दगदग होते, मनावर दडपण येते. त्याचे पर्यवसान प्रकृती बिघाड मध्ये ही होऊ शकते. तर हा हव्यास टाळण्यासाठी आहे त्यात, जमेल तेवढ्यात समाधान मानून राहणे हे योग्य. तरुण पणात ठीक आहे. अंगात  रग  असते , उत्साह  असतो, क्षमता ही असते. पण साधारण साठी जवळ आल्यावर हळूहळू आपल्या गरजा कमी करणे जरूर आहे. साठी  ह्या साठी की एक म्हण आहे साठी बुद्धी नाठी ! ती प्रत्यक्षात येऊ नये या साठी अगोदरच दक्षता  घेणे. साठीच्या आसपास खूप जण निवृत्त होतात किंवा निवृत्ती घेतात.  आपली उत्पन्न क्षमता कमी झालेली असते आणि जवळ असलेल्या  पुंजीवर उर्वरित, अज्ञात आयुष्य जगायचे असते. अशा वेळी आपले अजून बाकी राहिलेले छंद जरूर जोपासावे.  पण  कोणताही पसारा न करता. कारण  नंतर तो आवरणे कठीण होऊन बसते. 
थोडक्यात काय, पाय दमायला लागले की पसरावेत  जरूर, पण अंथरूण पाहून ! 
अजून काय लिहू ! 
लोभ असावा हे अजून न लगे सांगणे ! 

 झोप आणि नीज 


दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच पण नीज मध्ये जो गोडवा आहे तो झोपेत नाही. नीज म्हटले की लगेच नीज नीज रे बाळा, नीज माझ्या, सारखी  अंगाई गीते  आणि पाठोपाठ आई  आठवते.  झोप म्हटले की झोप आता, बास झाले, झोपा काढा, झोपून रहा, झोपा  केला, वगैरे दटावणीचे सूर आठवतात! 

तर अशी ही झोप (नीज म्हणणारे कोणी नाही आता) किती महत्वाची आहे. आज आणि उद्या यातील अती महत्वाचा दुवा ! त्या झोपेत काय काय होते ! स्वप्ने पडतात, कोणी घोरते, कोणी चालते, कोणी बडबडते ही. दिवास्वप्न पाहणारे ही भरपूर असतात. हे सर्व दिवसभर केलेल्या धावपळीचे व विविध गोष्टी  ऐकण्याचे, वाचल्याचे, पाहण्याचे परिणाम असतात. झोपेतून कोणाला उठवू नये म्हणतात, ते या साठी ! 
प्रवासात, नीरस भाषणाच्या कार्यक्रमात, नको असलेल्या गप्पा चालू असतानाही झोप येते काहीना. लिंगभेद करावयाचा झाल्यास असे एक निरीक्षण आहे की (माझे) महिला खूपच सावध, दक्ष तसेच  संकोच बाळगून असल्याने  त्या अशा कार्यक्रमात वगैरे झोपत नाहीत. त्यांना आपण पाहिलेले, ऐकलेले दुसऱ्यांना नक्कीच केव्हा ना केव्हा सांगायचे असते ! त्यामुळे लक्ष देऊन असतात ! संसाराच्या दोरीवर कसरत करताना, ऑफिस मध्ये मात्र त्यांना पेंग येऊ शकते जी चहाच्या माऱ्याने घालवतात बिचाऱ्या. वार्धक्यात, ही झोप त्या महिला भरून काढतात असेही दिसते. चालक केव्हा केव्हा पेंग आलेली असतानाही वाहन चालवतात, त्यांचे मात्र नवल वाटते आणि त्यांच्या मागे बसून माझ्यासारख्या महिला त्यांच्याशी वार्तालाप करून त्यांना जागे ठेवण्याचे प्रयत्न करतात, त्यांचेही कौतुक !
काहींची झोप हुकमी असते, काहीना अमुकच ठिकाणी लागते, काही कोठेही डोळे मिटतात !  सहज सोपी चिरनिद्रा पण काही भाग्यवंताना लाभते. 

अशी चुटकी किंवा पेंग ही आवश्यक असते,  नव्या दमाने उद्याला सामोरे जायला. अर्थात प्रत्येक व्यक्तीची झोपेची जरुरी कमी जास्त असू शकते. नवजात बालक दिवसभर झोपून रात्री ही झोपते हा काळ सर्वसाधारणपणे अठरा तास असतो. हळूहळू झोप कमी होऊन हालचाली वाढल्या की ते बारा तासांवर येऊन पोचते. तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तीना आठ तास झोप भरपूर होते. वार्धक्य आले की झोप हळूहळू कमी होऊन सात ते सहा तासांवर येऊन पोचते. पाच तास ही पुरते.  विद्वान लोक खूप कमी झोपतात कारण सतत ते कार्यरत असतात. त्यांच्या तन, मनाला मग कमी झोपेची सवय होते. म्हणजे आठ तास झोपणारे लोक कमी बुद्धीचे असतात असे मुळीच नाही. परंतु ते आपली कार्यक्षमता पूर्णपणे वापरत नाहीत, असे वाटते. 
सध्याची तरुण पिढी पाहिल्यास तरुण  मुले खूपच कमी झोपतात असे लक्षात येते. अर्थात हे सर्व सोशल मीडिया मुळे तसेच आंतरराष्ट्रीय काम किंवा व्यवहारामुळे. 
पुरेशी झोप घेणे हे आरोग्य दृष्ट्या अती महत्वाचे वाटते. मानसिक सल्लागार ही हेच सांगतात. अपुऱ्या झोपेचे दुष्परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर नक्कीच होतात आणि ते टाळणे नक्कीच जरुरी आहे. विद्यार्थी दशेत तर पुरेशी झोप आवश्यकच आहे अर्थात घरी, शाळेत वर्ग चालू असताना नव्हे !  झोप ह्या विषयावर खूप संशोधन झाले आहे. अती झोप जशी वाईट तसा निद्रानाश ही वाईट. 

मी ह्या विषयावर लिहिण्याचे कारण मला कुठेही केव्हाही झोप येत नाही,  तरीही झोप मला अतिशय प्रिय आहे. मला बोलता बोलता झोपणाऱ्या व्यक्तींचे कौतुक आहे आणि मी त्यांना निवांत झोपू देते! दिवसाकाठी शांत मनाने, समाधानाने झोपण्यात जी मजा आहे ती अजून कशात नाही. गृहस्थाश्रमी  असताना सुट्टीच्या दिवशी दुपारी  दहा मिनिटांची झोप ही पुन्हा ताजेतवाने करायची. आता निवृत्ती नंतर वेळ असला तरी माझी झोप हुकमी नाही. तिच्या वेळेलाच ती येते . तिला चुकून कधी जास्त वेळ पकडून ठेवले तर डोके जड होते ! 
मतितार्थ, प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी आणि ती ओळखून प्रत्येक व्यक्तीने आपापली झोपेची वेळ ठरवावी. वेळेत नियमितता ठेवणे नक्कीच प्रकृतीला हितकारक. एकदा वेळ ठरली की उठण्यासाठी गजर ही लावण्याची गरज नसते. हा झोपे वरील प्रबंध नाहीये, झोपेला आळवण्याचे प्रयत्न ! 
अलका काटदरे/२६.११.२०२३


 पुणे आणि मुंबई 


पुण्यात एवढे काय आहे की जो जातो तो पुण्य नगरीच्या प्रेमात पडतो.

मला वाटते सुंदर मिलाप आहे जुन्या आणि नवीन विचारांचा. मिश्रण आहे एकत्र झालेले दोन पिढ्यांचे. जागा मुबलक, माती ओढाळ, माणसे अजूनच लाघवी. अरे तुरे करतील तसे अगत्याने  गत संस्कृती चा पाढाही वाचतील. शिकवण्याची ह्यांना खूप खुमखुमी. तेथे गेल्याने अगाध ज्ञानाचा सागर समोर पसरतो. काय काय शिकावे ह्यांच्याकडून? 
स्पष्टवक्ते पणा जो मुंबईकरांना कधी जमला नाही 
स्वाभिमान, जो बाळगण्याची भीती नेहमीच राहिली मुंबई  च्या चाकरमनीला.
चिकाटी, जी मुंबईकराला चिकटलीच आहे आपोआप,  पण नको त्याची ! 
वारसा प्रेम , जे मुंबईकर सांगू शकत नाहीत कारण येथे त्यांना त्यांचीच  ओळख नसते.
संस्कृती दर्शन,  जे पूर्वापार पेशवे काळापासून जिवंत आहे आणि जे मुंबईकरांना दाखवता येणे महा कठीण काम, कुणाकुणा ची आणि कोणती संस्कृती दाखवायची ! 

पुण्यातील अजूनपर्यंत चे आकर्षण म्हणजे मोठाली घरे आणि प्राचीन राजवाडे. ते तर इतिहासापासून पाहिले होतेच पण एकेका कुटुंबाचे ही मस्त जुने वाडे पाहिले की मुंबईकराना स्वप्नात असल्यासारखे वाटते.  जागोजागी छोटी छोटी मंदिरे, देवांना न जुमानता त्यांना ठेवलेली  नावे आणि देवपूजा झाल्यावर पोटपूजेची व्यवस्था म्हणून कोपऱ्या  कोपऱ्यावर टपरी चहा आणि खाद्यगृहे. म्हणजे घरी दारी खाणार तुपाशीच पण उपाशी ही नाही राहणार ! 
धन्य ते पुणेकर आणि त्यांची अजब  जीवनशैली. 
तेथील संगीताचा वारसा, बुद्धिवादी आणि जीवनाशी कोणतीही तडजोड न स्वीकारणारे लोक, खळखळ वाहणारी  नदी, भव्य रस्ते आणि त्यातून आपल्याला हवे तसे बाजी मारून पुढे सरसावणारे पुणेकर ! संध्याकाळी बाजी मारून दिवसाशी दोन हात करून पुन्हा सातच्या आत घरी परतणारे पुणेकर. 
हे सर्व मनुष्य निर्मित आणि निसर्ग संपदा, विचारूच नका. डोंगर कड्यानी भरलेला, trekkers गड्यांचा हक्काचा प्रदेश. थंडीत गुलाबी थंडी आणि उन्हाळ्यात बिन घामाचा पण शरीर कडक करणारा उकाडा. अशी दोन टोके, पुणेकरांसारखीच !  

नाहीतर मुंबई ! 

घेतेय सर्वांना सामावून, मिरवत राहिलीय झेंडा आपल्या उदार अंत:करणाचा. आपल्या वितभर  खळगीची भ्रांत करता करता जमेल तेवढे समाज कार्य करीत. पूर येऊ देत, स्फोट होऊ देत, धमक्या काय आणि अपघात किती, तिला काही फरक पडत नाही ! 
समुद्राचा गाज ऐकत  अखंड वाहणारी जीवन सरिता ! 
येथे आलेल्या प्रत्येकाला आपलेसे करणारी पण तेवढेच प्रत्येकाच्या मनात त्याच्या गावा कडील ओढ कायम ठेवणारी. खरी तर दयनीय अवस्था आहे तिची,  पण वाली कोण ? जो तो आपली तुमडी भरण्यात गर्क आणि येथील राजकारण ! विचारूच नका. मोर्चे, बंद, सभा, घोषणा काय काय ऐकावे तिने. तरीही बिचारी सर्व सण साजरे करते, इमाने इतबारे, साग्र संगीत !  हिच्या जीवावर पूरा देश नाचतो तरीही हिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. का तर ही कुणा एकाची माती नाही ! 
मुंबईने लवकरच पुण्यनगरी पासून काही धडे घ्यावेत असे मात्र वाटते ! 
         ✍️अलका काटदरे/ ९.८.२३

मैत्री 


 मैत्री - एक लहानसा शब्द, पण खूप मोलाचा.


आयुष्यात सारे काही आहे आणि तुमची कुणाशी मैत्रीच नाही मग तुम्ही अगदीच भणंग. वाचायला खूप जड जातय ना? खरेच मैत्रीचे मोलच तेवढे आहे. 

माझ्यापासून पाहायचे झाल्यास मला खूप मैत्रिणी आहेत,
प्रकारही खूप त्यांचे. शाळेतील, कार्यालयीन, प्रवासातील,
कॊलेजमधील, नातेवाईक. हॊ, नातेवाईक मधून पण
एक मैत्री होऊ शकते- नि:पक्ष, नि:स्वार्थी! 

या सर्वांमधून खोलवर पाहता, मला सर्वात जवळची
वाटते ती माझी पुस्तकांशी मैत्री. स्तंभित व्हाल आपण
हे वाचून. शाळेत कायम मैत्रिणींच्या गराड्यात राहूनही
कसे माहीत नाही, पण ह्या पुस्तकानी मात्र मन प्रचंड
आकर्षित करून घेतले. आमच्या घराजवळच एक सुंदर
वाचनालय होते. पुस्तके नाना तऱ्हेची , भरगच्च. वेळ 
भरपूर. असे सर्व असता, सहवासाने प्रेम न वाढले तरच
नवल! घरूनही पूर्ण पाठींबा! मग काय! अगदी दिलखुलास
गप्पा मारुन घेतल्या, शाळेच्या दिवसात. कधी 
विसंशी, कधी सुमतीजींशी तर कधी राजाकाकांशी. लहान
वयात त्यांच्याकडून मी खूप काही शिकले. काही विचार
पक्के झाले, काही संकल्पना तयार झाल्या. स्वप्ने तर
विचारू नका, किती रंगवली- सर्व ह्या पुस्तकांच्या मदतीने!
आणि मग हा छंदच लागला, वाचायचा. पुस्तकांच्या शोधात
नंतर निघतच राहिले, वेगवेगळ्या ठिकाणी ! वेगवेगळ्या
भाषेत!

हळूहळु मैत्री विस्तारत गेली. विषयही बदलत गेले. कधी
प्रेमाचे, कधी अध्यात्मिक तर कधी मौलिक- सर्वच बाबतीत!
वेगवेगळ्या पुस्तकातून शब्दांचे बारकावे लक्षात आले.
त्यातून परिक्षण ही करता आले- चांगल्या वाईटाचे.

वेळेचे बंधन नाही, अवाजवी खर्च नाही. आपल्या आवडी
जपून आपल्यावर कॊणतेही बंधन न घालणारा हा छंद.
नव्या पुस्तकाची चाहूल लागताच माझी होणारी तारांबळ,
आता केव्हा हे वाचायचे आणि ती हुरहूर!  हा सर्व आनंद
घेत असता हे ही लक्षात  आले�

मनीचा चंद्र ते ISRO चा चांद 


 खरेच, खूप छान विषय. अगदी पाळण्यात असल्यापासून ज्या चांदोबाला भेटतोय, ऐकतोय, वाचतोय, त्या चंद्रमाला आता अनुभवायची वेळ येणे हे केवढे परम भाग्य या पिढीला आणि एवढी वर्षे जो कल्पना विलास वाटला तो वास्तवात कसा आहे हे कुतूहल जागे करून, होऊन, प्रत्यक्ष त्याची पाहणी करायची वेळ आलीय ही सुवर्णसंधी. 

 चांदोमामा च्या स्वरूपात भेटणारा चंद्र, आईच्या अंगाईतून जाणवणारा प्रेमळ मामा, मग लपाछपी खेळणारा, लिंबोणीच्या झाडामागे लपणारा चांदोबा, चांदण्या बरोबर चमकणारा, प्रेमी युगुलाना खुणावणारा चांद, लालिमा पसरवणारा चंद्र, मधू इथे आणि चंद्र तेथे म्हणायला लावणारा आणि मधुचंद्राची लज्जत वाढवणारा चंद्र, भाऊबीजेच्या दिवशी भगिनींना प्रेमाने ओवाळणी करण्यासाठी परातीत दर्शन देणारा चंद्र, कडव्या चौथला तमाम उत्तरवासिय सौभाग्यवतीना दर्शन देऊन नवऱ्यावरील प्रेम वाढवणारा चंद्र ! किती त्याची रूपे आणि किती त्याच्या भूमिका ! सर्व आपल्या मनीचे, कल्पनेतले ! कोणी हे सर्व कल्पिले ? कवी वृत्तीच्या मानवाने. प्रेमाने आसुसलेल्या, थकल्या भागल्या जीवाला रात्री प्रसन्न शांतता द्यायच्या एकाच ध्येयाने जसे प्रेरित होऊन हा चंद्र तेथे भव्य निळ्या, गडद आकाशात उभा ठाकलेला असतो, स्तब्ध, एकटाच ! संपूर्ण जगाला, सर्व धर्मियांना प्रेमळ वेड लावणारा चंद्र ! जेवढा तो भाऊराया तेवढाच देवासमान. कलेकलेने वाढणारा, जगाला प्रगतीची आशा दाखवणारा चंद्र. 
ह्या मनीच्या चंद्राने जसे आबालवृद्धांना वेड लावले तसेच किंबहुना जास्त वेड संशोधकांना लागले, ह्या ग्रहाचा अभ्यास करण्याचे. म्हणूनच कदाचित lunatic हा शब्द आला असावा ! वेड, संशोधनाचे वेड ! 
अंतरंगात ससा लपवून ठेवणारा चंद्र वास्तवात कसा आहे हे प्रथम नासाने शोधले. भारत ही प्रयत्नशील होताच. येथील पृथ्वी वरील समस्या अधुकर असल्याने चंद्र ग्रहाचा विचार करायला थोडा विलंब झाला, तरी चंद्रावर यशस्वी रित्या विक्रम यान सोडणारे आपण जगाच्या पाठीवर चौथे आहोत, हे ही नसे थोडके.
ISRO ने यशस्वी केलेल्या चंद्र यान  उड्डाण नंतर, चंद्र  जो कवी  कल्पनेत मधुर, शांत, प्रेमळ, अशिक होता तो प्रत्यक्ष किती रुक्ष आहे हे दाखवून दिले. आता जो आपल्याला दिसला आहे तो आहे खरा खडबडीत, पण काय सांगावे, जसजसे आपण त्याच्या अंतरंगात जाऊ तसतसे त्यांचे सौंदर्य ही आपल्याला जाणवेल. तसा तो छुपाच आहे ना ! आपली प्रतिमा तो नक्कीच राखेल. त्याच्यावर पाणी आहे म्हणे, तर अजूनही विश्व असू शकेल. हे मात्र नक्की की या ISRO च्या चांद बरोबर आपली मैत्री अधिक दृढ होईल, वेगळ्या स्वरूपात. चंद्र केवळ दिखावा नसून त्याच्याकडे जगाला भुलविण्याचे काय सामर्थ्य आहे हे तो दाखवलेच.
अर्थात हे वास्तव पाहायला आपल्याला कितीतरी वर्षे लागली, प्रचंड खर्च झाला, कितीतरी मनुष्य बळ लागले. म्हणजे मनातला चंद्र आणि वास्तवातील, हे गणित किती विषम. चंद्राचे प्रतिबिंब किती स्वस्त ! आपण त्यावर समाधान मानून का नाही राहिलो ? मनीच्या चंद्राने पळण्यातलता बाळापासून एकट्या पडलेल्या भगिनी पर्यंत सर्वांना आधार दिला आहे आणि मला खात्री आहे तो आधार तिचा अजूनही भक्कम होणार आहे. बाळा ना अजूनही नवल कथा ऐकायला मिळणार आहेत कारण आपण सर्व नित्य प्रगती पथावर आहोत. ह्या मनीच्या चंद्राने शेवटी आपल्याला आकर्षित करून स्वतः कडे खेचले आहेच. 
संशोधकांना आता अमवस्या, पौर्णिमा, त्यांचे परिणाम हे अधिक योग्य रीतीने आपल्या पर्यंत पोचवता येणार आहेत. भारतीय संशोधकांनी मारलेली ही सर्वात मोठी उडी आहे. अगोदर चंद्र यायचा खाली खेळायला, आकाशात दर्शन देऊन, पाण्यात प्रतिबिंबित होऊन ! आता आपण जाऊ आपली खेळणी घेऊन चंद्राकडे , त्याच्याशी विज्ञान खेळ खेळायला ! 
कल्पना थांबणार नाहीत तरी वास्तव समोर येईलच !!

परंपरा, कोणत्या पाळाव्यात/ कोणत्या टाळाव्या 


 परंपरा पाळाव्यात की नाही हा दिवसेंदिवस, प्रगतीच्या वाटेवर चालणाऱ्या समाजाला, प्रश्न पडतो आहे. ह्याचे प्रमुख कारण परंपरा, मग त्या रूढी असोत किंवा श्रद्धा, म्हणजे अशिक्षित पणा चे लक्षण समजून त्यावर मागासलेपणाचा शिक्का मारला जातो. 

परंपरा म्हणजे त्यात रीतिरिवाज, रूढी, अंधश्रद्धा, सर्व आले. काही रूढी बाबत मला उमगलेला अर्थ असा होता -

रात्रीची नखे किंवा केस न कापणे - पूर्वी कंदीलावर रात्र असताना नखे/केस पायाखाली किंवा स्वयंपाक घरात सहजी सापडू शकत होती, ते टाळणे.

प्रवासाला जाताना हातावर दही ठेवणे - दही म्हणजे खाल्लेले अन्न पचण्यासाठी योग्य. प्रवासात पोटाला आराम मिळण्यासाठी गृहस्वामिनिने घेतलेली खबरदारी.

पाहुणे किंवा घरची मंडळी बाहेर पडल्या पडल्या कचरा न काढणे - माणूस निवर्तल्यावर लगेच जमीन सारवली जाते, तसे इतर वेळी होऊ नये म्हणून. 

अंघोळी नंतर कचरा न काढणे - स्वच्छता दर्शक.
म्हणजेच काय, प्रत्येक रूढीचा शास्त्रीय अर्थ शोधून ती योग्य वाटली तर आचरणे, असे वाटते.

आपले विविध सण, व्रत वैकल्ये, हा सर्व सामाजिक एकतेसाठी चा खटाटोप होता व जाणीवपूर्वक त्याच्या साठी समाज सुधारकांनी प्रयत्न केले होते. आत्ताच्या वेगवान दिनचर्येतून सर्वांना एकत्र आणण्यासाठी सण व उत्सव हे अधिक महत्त्वाचे वाटतात परंतु त्याचे अवडंबर करणे किंवा स्तोम माजवून, गोंगाट करून ते साजरे करणे हे तेवढेच चुकीचे आहे. आपल्या परंपरा अशा हव्यात, जेणेकरून लहान मुलांमधील मधून उद्याचे नागरिक घडतील, आबालवृद्धांना एकत्र करून जीवन मुल्ये जपतील, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा देतील. या पार्श्वभूमीवर कितीतरी ठिकाणी उत्सवा मधून तंटे, पक्ष, वाद उद्भवलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. हे सर्व करण्या मागे ज्येष्ठ नागरिकांचा महत्वाचा सहभाग आवश्यक वाटतो. परंपरा ह्या आत्ताच्या युवा पिढीवर लादल्या न जाता त्या निखळ मूल्ये तोलणाऱ्या व करमणूक करणाऱ्या कशा राहतील हे पाहणे जास्त महत्वाचे.
अजून एक प्रामुख्याने जाणवणारा मुद्दा म्हणजे परंपरांचे जतन करणे ही स्त्री ची जबाबदारी समजली जाते. तसे न होता, स्त्री पुरुष दोघांनीही मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी, परंपरा व रूढी चे योग्य अर्थ सांगून त्यातील जेवढे प्रत्यक्ष शक्य आहेत, योग्य आहेत ते स्वीकारले गेले पाहिजेत. सध्या सर्वत्र व्यवस्थापन शिकवणाऱ्या संस्थांचे पेव फुटले आहे. नोकरीसाठी आवश्यक पूर्वतयारी म्हणून त्याकडे पाहिले जातेय. अशावेळी इतिहासाकडे नजर टाकल्यास असे लक्षात येईल की आत्ताचे event mgmt, business mgmt, टीम work, लेडेरशिपे हे सदोदित कानावर पडणारे शब्द पूर्वजांनी किती लीलया पेलले होते. त्या मागे ह्या परंपरा होत्याच. कोणत्याही देशाची परंपरा ही त्याची ओळख होऊ शकते जसे की नमस्कार हा भारतीय, दोन हात जोडून केलेला म्हणजे एकत्र येणे व वाकून केलेला म्हणजे आदर प्रदर्शित करणे. लहान लहान कृतीत केवढा अर्थ दडलेला आहे. सगळ्यांनी पंगत मांडून एकत्र जेवणे यासारखी सुंदर दुसरी रीत नाही. होते एवढेच, हे प्रत्यक्षात उतरायला दोन व्यक्ती एकत्र येणे ही कठीण होऊन बसलेय. अशावेळी जे प्रॅक्टिकल किंवा शक्य आहे तेच स्वीकारले पाहिजे. नाहीतर उपवासाची परंपरा म्हणून उपास करून पित्त वाढवणे, नवर्यासाठी थांबून भूक मारणे, जिवंतपणी भांडून मेल्यानंतर श्रद्धेचे अवडंबर करणे, मंगळागौरी ची जागरणे करून office ला दांड्या, भजने करून आवाज प्रदूषण, दहीहंडी किंवा होळीच्या वेळी घातकी प्रकार घडणे हे सर्व आपण पाहतोच आहोत. 
परंपरा, कोणत्याही व्यक्तीला, समाजाला, देशाला,  हवीच. तिचे पालन योग्य रीतीने, जमेल तेवढे, शिस्तीने, स्वखुशीने, समजून उमजून, मर्यादेमध्ये होणे जरुरी आहे. परंपरेमधून एकमेकांविषयी सद्भावना वाढीला लागून सुंदर समाधानी समाज दर्शन घडणे महत्वाचे. हे जर घडत नसेल तर अशा परंपरा झुगारून सुधारित मूल्ये देणे ही आत्ताची आवश्यक गरज आहे. 

 भटकंती करायला मला नेहमीच आवडले आहे. तरीही सर्व प्रवासात एखादा प्रवास वारंवार लक्षात राहणारा असतो. प्रवास म्हटले की सर्वप्रथम निसर्ग समोर येतो, मनाला धुंध करणारा, ऊर्जा देणारा. एखादे रम्य ठिकाण पाहताना आजूबाजूचे सर्व पाहून घ्यायचे हा माझा नेहमीचा शिरस्ता ! त्यामुळे वेळ, खर्च ह्यांची बचत होतेच आणि वेळोवेळी भरपूर ठिकाणे पाहून होतात, एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा न जाता. 

ह्या माझ्या शिस्तीला एकच अपवाद- कोकण प्रवासाचा. एकदा जाऊन नाहीच समाधान होत. वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळी मजा. मग ती वारीच ठरते दर वर्षीची.
उन्हाळ्यात आंबे, करवंदे, जांभळे इत्यादी फळे, पावसात धबधबे , विविध सण, थंडीत डवरलेली शेती, शेकोट्या.. किती पाहू न किती नको.. आता तर कलिंगड, काजू, मशरूम, अशी ही पिके काढू लागले आहेत कोकणातील लहान मोठे उद्योजक. आंब्याची वने तर जागोजागी. जगभर मागणी असलेला कोकणचा आंबा हे सर्व ज्ञात कोकणचे वैभव. अजूनही अशी वैभवे कोकणला लाभली आहेत. ब्रिटिश कालीन वखारी, बाजारपेठा, इतिहास कालीन वाडे, राजवाडे, कवी केशवसुत ह्यांचे जन्मस्थान निसर्गरम्य मालगुंड, सिंधू दुर्ग, विजय दुर्ग, पावस, गणपतीपुळे मंदिर, तेथील समुद्र किनारा, दापोलीचा समुद्र किनारा, अंजेल्याची देवी, अर्यदुर्गा, कुणकेश्वर, पुढे गोव्यातील मंगेशी, शान्ता दुर्गा, महलासा मंदिर ही सर्व कोकणी माणसाची दैवते. अगदी तळ कोकणात नजर टाकली तर मुरुडेश्र्वर, गोकर्ण ही सर्व अतिशय सुंदर पवित्र क्षेत्रे. मन कसे भारावून जाते. येथे आल्यावर या निसर्ग संपदेमुळे आणि येथील माणुसकी दर्शनाने आपण किती श्रीमंत आहोत असे वाटते. राहून राहून असेही वाटते की कोकणी माणसाने आपले धन जतन केले आहे आणि समृद्ध ही. 
सण साजरे करावेत तर ते कोकणातच. चैत्रातील गुढी पाडवा नंतर श्रावण पासून अगदी संक्रांती होळी पर्यंत. हाती पैसा नसला तरी कोकणात श्री गणेशाचे भव्य स्वागत आणि आदरातिथ्य ही अगदी महिनाभर भक्तिभावाने होते. येथील  आरास किंवा सजावट पाहण्यासारखी. धागड धिंगा मुळीच नाही. दिवाळीला फराळ एकमेकांना पोचतोच पोचतो आणि होळी तर पुऱ्या गावाची, खेळीमेळीने. इथल्या प्रसिद्ध खेळांसाठी शिमग्यात चाकर मनी अजूनही वेळात वेळ काढून येतात, पालखी फिरवतात, आशीर्वाद घेऊन परततात! 
इथला माणूस जितका उत्सव प्रिय तेवढाच स्नेहाळ, बोलघेवडा, अतिथी देवो मानणारा. खरेच येथील फणासा सारखा, वरून रांगडा वाटला तरी आतून प्रेमळ. माणूस म्हणजे दोन्ही आले हं! घरातील बेकार आता शिकून सावरून नोकऱ्या करू लागल्या आहेत तरी सर्व कुळाचार, धार्मिकतेला विज्ञानाची जोड देऊन संसार सांभाळणाऱ्या ! मुंबईतील चाकर मनी कुटुंबा समवेत आले की विविध पदार्थ करून जेवणाच्या पंगती करणाऱ्या. आणि सर्व कसे हसतमुख, प्रसन्न मनाने. एवढ्यावरच नाही त्यांचा उत्साह आणि प्रेम थांबत. इतर व्याप सांभाळून, बागांची देखभाल, पापड कुरडया करणे, फणस गरे तळणे, साठे करून वाळवणे, संडग्या मिरच्या, कुळीथ पीठ करून वर आल्या गेलेल्यांच्या हाती भेटी पाठवणे आणि ते ही दुपारची झोप न काढता. किती वर्णन आणि कौतुक करावे तेवढे कमीच. 
केळीचे हिरवे बाग, काजूच्या पिवळ्या नारिंगी वाड्या, नारळीची उंचच उंच झाडे, हिरवीगार भात शेते, मनमोहक अननसे, श्वास धुंद करणारा आंब्याचा मोहर, जमिनीपर्यंत लागलेले फणस, पांढरा शुभ्र प्राजक्ताचा सडा, पिवळी धमक सुरंगी, नाजुकशी बकुळी, पांढरा डवरलेला पण निष्पर्ण चाफा, परसदारी विहीर आणि अविरत काम करणारा रहाट हे सर्व कोकणात च पाहायला मिळते. नाही गर्दी, नाही कसले प्रदूषण, हवी हवीशी शांतता आणि तृप्त मने. काय हवे अजून ?? 
असा हा कोकण चा प्रवास प्रत्येकाने जरूर अनुभवावा. एकदा तरी पूर्ण कोकण पाहायला महिनाभर हवा. मी मात्र धावत्या भेटीत चार दिवसांचा तरी कोकण प्रवास करून येते दरवर्षी, उर्वरित वर्ष पूरेल एवढी ऊर्जा घेऊन !!