मंगळवार, १६ जुलै, २०२४

 अजून


 आज शब्दकोडे सोडवताना अजून हा clue होता आणि मला अजून म्हणजे अद्याप किंवा अद्यापि एवढेच येत होते. जसा आपण विचार करतो, अजून हे झाले नाही, अजून अमूक आली नाही वगैरे वगैरे. किंवा अजून त्या झुडूपा  मागे.. हे  सुंदर गाणे ही आठवले ! बाकीचे शब्द सोडवल्यावर तेथे 'आणखी ' हा शब्द चपखल बसला जो मला आत्तापर्यंत मनाला शिवला ही नव्हता ! हो, आणखी, अजून...अजून पाहिजे, आणखी हवे होते या अर्थी.. 


यावरून लहानपणीची एक आठवण जागी झाली. आमच्याकडे पिठले भात नेहमी असायचा. त्यात लोणचे घालून खाणे मला खूप आवडायचे, त्यामुळे पंक्ती ला बसल्यावर आई पिठले वाढत असली की मी म्हणायची आणखी.. नंतर हा शब्द वापरल्याचे स्मरत नाही. आणि, अजून हेच शब्द वापरात होते. 

आणखी म्हणजे अधिक. सकारात्मक पाहिले तर आणखी, अजून अभ्यास करायला हवा, अजून काही करायला हवे, अजून हे राहीले, ते राहीले वगैरे.  अजून हे हवे, ते हवे असे म्हटले तर तो लोभ झाला, हाव किंवा पुढे जाऊन हव्यास ही म्हणता येईल. हा हव्यास आपला संपत नाही. एखादी गोष्ट आवडली की ती अजून हवी असे वाटणे. समाधान न होणे. 
त्यातून मग ती गोष्ट मिळवण्यासाठी दगदग होते, मनावर दडपण येते. त्याचे पर्यवसान प्रकृती बिघाड मध्ये ही होऊ शकते. तर हा हव्यास टाळण्यासाठी आहे त्यात, जमेल तेवढ्यात समाधान मानून राहणे हे योग्य. तरुण पणात ठीक आहे. अंगात  रग  असते , उत्साह  असतो, क्षमता ही असते. पण साधारण साठी जवळ आल्यावर हळूहळू आपल्या गरजा कमी करणे जरूर आहे. साठी  ह्या साठी की एक म्हण आहे साठी बुद्धी नाठी ! ती प्रत्यक्षात येऊ नये या साठी अगोदरच दक्षता  घेणे. साठीच्या आसपास खूप जण निवृत्त होतात किंवा निवृत्ती घेतात.  आपली उत्पन्न क्षमता कमी झालेली असते आणि जवळ असलेल्या  पुंजीवर उर्वरित, अज्ञात आयुष्य जगायचे असते. अशा वेळी आपले अजून बाकी राहिलेले छंद जरूर जोपासावे.  पण  कोणताही पसारा न करता. कारण  नंतर तो आवरणे कठीण होऊन बसते. 
थोडक्यात काय, पाय दमायला लागले की पसरावेत  जरूर, पण अंथरूण पाहून ! 
अजून काय लिहू ! 
लोभ असावा हे अजून न लगे सांगणे ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा