भटकंती करायला मला नेहमीच आवडले आहे. तरीही सर्व प्रवासात एखादा प्रवास वारंवार लक्षात राहणारा असतो. प्रवास म्हटले की सर्वप्रथम निसर्ग समोर येतो, मनाला धुंध करणारा, ऊर्जा देणारा. एखादे रम्य ठिकाण पाहताना आजूबाजूचे सर्व पाहून घ्यायचे हा माझा नेहमीचा शिरस्ता ! त्यामुळे वेळ, खर्च ह्यांची बचत होतेच आणि वेळोवेळी भरपूर ठिकाणे पाहून होतात, एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा न जाता.
ह्या माझ्या शिस्तीला एकच अपवाद- कोकण प्रवासाचा. एकदा जाऊन नाहीच समाधान होत. वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळी मजा. मग ती वारीच ठरते दर वर्षीची.
उन्हाळ्यात आंबे, करवंदे, जांभळे इत्यादी फळे, पावसात धबधबे , विविध सण, थंडीत डवरलेली शेती, शेकोट्या.. किती पाहू न किती नको.. आता तर कलिंगड, काजू, मशरूम, अशी ही पिके काढू लागले आहेत कोकणातील लहान मोठे उद्योजक. आंब्याची वने तर जागोजागी. जगभर मागणी असलेला कोकणचा आंबा हे सर्व ज्ञात कोकणचे वैभव. अजूनही अशी वैभवे कोकणला लाभली आहेत. ब्रिटिश कालीन वखारी, बाजारपेठा, इतिहास कालीन वाडे, राजवाडे, कवी केशवसुत ह्यांचे जन्मस्थान निसर्गरम्य मालगुंड, सिंधू दुर्ग, विजय दुर्ग, पावस, गणपतीपुळे मंदिर, तेथील समुद्र किनारा, दापोलीचा समुद्र किनारा, अंजेल्याची देवी, अर्यदुर्गा, कुणकेश्वर, पुढे गोव्यातील मंगेशी, शान्ता दुर्गा, महलासा मंदिर ही सर्व कोकणी माणसाची दैवते. अगदी तळ कोकणात नजर टाकली तर मुरुडेश्र्वर, गोकर्ण ही सर्व अतिशय सुंदर पवित्र क्षेत्रे. मन कसे भारावून जाते. येथे आल्यावर या निसर्ग संपदेमुळे आणि येथील माणुसकी दर्शनाने आपण किती श्रीमंत आहोत असे वाटते. राहून राहून असेही वाटते की कोकणी माणसाने आपले धन जतन केले आहे आणि समृद्ध ही.
सण साजरे करावेत तर ते कोकणातच. चैत्रातील गुढी पाडवा नंतर श्रावण पासून अगदी संक्रांती होळी पर्यंत. हाती पैसा नसला तरी कोकणात श्री गणेशाचे भव्य स्वागत आणि आदरातिथ्य ही अगदी महिनाभर भक्तिभावाने होते. येथील आरास किंवा सजावट पाहण्यासारखी. धागड धिंगा मुळीच नाही. दिवाळीला फराळ एकमेकांना पोचतोच पोचतो आणि होळी तर पुऱ्या गावाची, खेळीमेळीने. इथल्या प्रसिद्ध खेळांसाठी शिमग्यात चाकर मनी अजूनही वेळात वेळ काढून येतात, पालखी फिरवतात, आशीर्वाद घेऊन परततात!
इथला माणूस जितका उत्सव प्रिय तेवढाच स्नेहाळ, बोलघेवडा, अतिथी देवो मानणारा. खरेच येथील फणासा सारखा, वरून रांगडा वाटला तरी आतून प्रेमळ. माणूस म्हणजे दोन्ही आले हं! घरातील बेकार आता शिकून सावरून नोकऱ्या करू लागल्या आहेत तरी सर्व कुळाचार, धार्मिकतेला विज्ञानाची जोड देऊन संसार सांभाळणाऱ्या ! मुंबईतील चाकर मनी कुटुंबा समवेत आले की विविध पदार्थ करून जेवणाच्या पंगती करणाऱ्या. आणि सर्व कसे हसतमुख, प्रसन्न मनाने. एवढ्यावरच नाही त्यांचा उत्साह आणि प्रेम थांबत. इतर व्याप सांभाळून, बागांची देखभाल, पापड कुरडया करणे, फणस गरे तळणे, साठे करून वाळवणे, संडग्या मिरच्या, कुळीथ पीठ करून वर आल्या गेलेल्यांच्या हाती भेटी पाठवणे आणि ते ही दुपारची झोप न काढता. किती वर्णन आणि कौतुक करावे तेवढे कमीच.
केळीचे हिरवे बाग, काजूच्या पिवळ्या नारिंगी वाड्या, नारळीची उंचच उंच झाडे, हिरवीगार भात शेते, मनमोहक अननसे, श्वास धुंद करणारा आंब्याचा मोहर, जमिनीपर्यंत लागलेले फणस, पांढरा शुभ्र प्राजक्ताचा सडा, पिवळी धमक सुरंगी, नाजुकशी बकुळी, पांढरा डवरलेला पण निष्पर्ण चाफा, परसदारी विहीर आणि अविरत काम करणारा रहाट हे सर्व कोकणात च पाहायला मिळते. नाही गर्दी, नाही कसले प्रदूषण, हवी हवीशी शांतता आणि तृप्त मने. काय हवे अजून ??
असा हा कोकण चा प्रवास प्रत्येकाने जरूर अनुभवावा. एकदा तरी पूर्ण कोकण पाहायला महिनाभर हवा. मी मात्र धावत्या भेटीत चार दिवसांचा तरी कोकण प्रवास करून येते दरवर्षी, उर्वरित वर्ष पूरेल एवढी ऊर्जा घेऊन !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा