मंगळवार, १६ जुलै, २०२४

मैत्रिणी 


 प्रत्येक व्यक्ती ला मित्र वर्ग हा हवाच. नसेल तर ती व्यक्ती एकलकोंडी !  ही मैत्री तुम्ही एकटे असता तेव्हा जास्त जाणवते, जरुरी वाटते. 

मला शालेय जीवनात भरपूर मैत्रिणी होत्या. पण त्यातील खऱ्या म्हणजे मनातले बोलू शकू अशी एकच होती.   ती आणि मी जोडी म्हणून ओळखले जायचो. अर्थात भारती. शाळेत तिच्या बरोबर जायचे, मग भले तिच्यामुळे उशीर होऊन मैदानाला दोन फेऱ्या मारायला लागल्या तरी बेहत्तर ! अभ्यास तिच्या बरोबर, खेळ तिच्या बरोबर, फिरणे तिच्या बरोबर ! तिची नी माझी ताटातूट झाली तेव्हा मी एकदम एकटी पडले आणि तो काळ नेमका नववी दहावी चा होता. ती दोन आणि पुढची ही दोन वर्षे अशीच जिवलग मैत्रिणी वाचून काढली. त्या काळी मोबाईल काय साधे फोन ही नव्हते उठसूट बोलायला. मग पत्र व्यवहार चाले. अर्थात एक मार्गी. त्या दरम्यान व एकटेपणा मुळे हळूहळू मला काव्य स्फुरून मी कवितेत व्यक्त व्हायला लागले ! कारण भारती नव्या दुनियेत गेली होती, तिच्या करिअर मध्ये बिझी. मी मात्र होते तेथेच, एकच ध्येय मनात ठेऊन, भारती गेली तेथे जायचे, मुंबई ला ! मुंबईत आमचे विविध नातेवाईक असल्याने, मुंबई ही तशी लांबून ओळखीची होती , तरीही तिची खरी ओळख भारती बरोबरच झाली. 
भारती खूप निरागस आणि प्रेमळ होती. तिच्या पालकांनी सुद्धा आमच्या मैत्री ला खतपाणी घातले होते, ही भाग्याची गोष्ट.  आम्हा दोन कुटुंबीय मध्ये सर्वच बाबतीत खूप अंतर असताना ही आमची मैत्री अजून टिकून आहे. 🙏अजूनही परदेशातून अगदी चार दिवस आली तरी मला भेट देण्याशिवाय तिची  ट्रीप पुरी होत नाही. आता मोबाईल क्रांती मुळे तास तास भर बोलणे होते ते वेगळेच.  तिच्या संगतीने मी ज्युडो ही शिकले ! शनिवारी अर्धा दिवस office असल्यावर न चुकता आम्ही भेटून सगळीकडे भटकंती ठरलेली. तिचा मुलगा आता doctor झाला आहे. राजापूरच्या घराबद्दल तिला खूप आत्मीयता असून दर वर्षी ती येथे येऊन राहते. खरेच,    तिच्याकडील धाडस, बिनधास्त पणा आणि आत्मविश्वास  प्रेरणा दायी आहे.
फणसासारखी आहे ती,  वरून काटेरी आणि आतून मधुर.

पुढे मी मुंबईत येऊन कॉलेज ला जाऊ लागल्यानंतर डहाणूकर मध्ये राजी भेटली. तिचा आणि माझा career प्रवास बरोबरीने चालू झाला. दोघी ही शॉर्ट hand च्या परीक्षा देऊन बारावी झालेल्या आणि पुढे अजून ती भाषा विकसित करायची होती. त्यामुळे संध्याकाळी क्लास, परीक्षा ह्या संबंधात आमचे  आदानप्रदान चालू झाले.  अगोदर डहाणूकर कॉलेज नंतर  सकाळचे म्हणून पोदार असे करत आम्ही दोघींनी बोरिवली - गोरेगाव - दादर- माटुंगा  ट्रेन किंवा दादर - कॉलेज चालत ग्रॅज्युएशन पुरे केले. 'पुरे केले'  म्हणण्याचे कारण पहाटे उठून सकाळचे कॉलेज वर्ग  'attend '  करणे एवढेच महत्वाचे होते कारण पुढे आम्हा दोघींनाही नोकरी करायची होती दिवसभर. मी मुंबई महानगर पालिकेत  आणि ती मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये. त्या वेळी आम्ही नोकरी करण्यासाठी लागणारी अर्हता अगोदरच पुरी करून ठेवली होती. मला शिक्षण पूर्ण करायला नोकरी शिवाय गत्यंतर नव्हते आणि तिच्याकडे त्या वेळची दक्षिणी संस्कृती . मुलगी झाली म्हणजे धनाची साठवण, हुंडा वगैरे, वडील चांगल्या नोकरीला  पण  थोडे कर्मठ..  पोस्ट ग्रॅज्युएशन ही एकत्र अभ्यास करून  केले नंतर आम्ही दीर्घ काळ IDBI, त्या वेळची मुख्य वित्तीय संस्था  आणि एअर  इंडिया येथे अनुक्रमे इमाने इतबारे मन लावून नोकरी केली. तिच्या प्रेम विवाहाला साक्ष देण्यापासून नंतरची काही वर्षेही आमची मैत्री उमलत राहिली. मुंबई मध्ये नवीन असताना माझ्या भाषा चांगल्या असल्या तरी इंग्लिश बोलताना तिचा सहवास कामी आला. तिचे मराठी आणि माझे इंग्लिश बहरू लागले..   मध्यंतरी काही काळ मैत्रीत खंड पडला तरी पुन्हा काही वर्षांनी मोबाईल फोन आल्यावर  आमचे संवाद चालू होऊन मैत्री पुन्हा जोम धरू लागली आहे. खरे पाहता ती मुंबईत जन्मलेली, दाक्षिणात्य ब्राह्मण. अस्खलित मराठी बोलणारी आणि इंग्लिश वर तसेच इतर भाषांवर  प्रभुत्व असणारी.  संगीताचे ज्ञान असणारी. मी साधी भोळी, बुद्धिवादी तरीही प्रेमळ, धाडसी थोडीशी tom boy type ( अर्थात हे भारती च्या संगतीतील परिणाम ) , संगीताची आवड,  आणि कष्टकरी !   आमची तत्कालीन ध्येये एकच. त्यामुळे एकमेकींशी विचारांची, गुणाशी नेहमीच  देवाणघेवाण होत राहिली आहे. 

Idbi मध्ये मी आणि ग्रेटा एकच दिवशी रुजू झालो. आमचे कार्य विभाग वेगवेगळे असले तरी जेवण एकत्र करू लागलो.  अतिशय सुंदर, मितभाषी, मंगलोरी ख्रिश्चन आणि मुंबईकर,  प्रेमळ, कुणाच्या अध्यात मध्यात नसणारी लाजवट ती आणि गव्हाळ रंगाची साधी पण हुषार वाटणारी, बोलकी, त्या वेळच्या बोली भाषेत घाटी वाटणारी पण नसलेली, चटचट  मी, एकमेकांचे होत गेलो ते अजून पर्यंत. आमचे तारुण्याचे दिवस आम्ही एकत्र जेवणात, केव्हाही काहीतरी मनात आलेले बोलण्यासाठी एकमेकांना साद घालणे,   मस्त फिरणे,  ट्रेकिंग, कार्यालयीन गॉसिपिंग  इत्यादी मध्ये छान जगलो. आमची जोडी office मध्ये वेगळी म्हणून उठून दिसायची !  तिच्या आईच्या हातचे डोसे आणि इडली अजूनही जिभेला स्वाद देतात. मी माझ्या बहिणीकडे राहत असल्याने व ती ही नोकरी करत असल्याने माझा ठराविक पोळी भाजीचा डबा असे. हळूहळू मला दाक्षिणात्य पदार्थांची गोडी लागली. 
या दरम्यान आमच्या अशाच एका गोड , सुंदर, लाघवी मैत्रिणीने लग्नानंतर थोड्याच दिवसात आत्महत्या केल्याने आमचे भावविश्व विस्कळीत झाले. मनाला सावरायला सहकारी तसेच वरिष्ठ मंडळींनी आम्हाला प्रत्यक्ष,  अप्रत्यक्ष रित्या खूप मदत केली. याच दरम्यान आम्ही दोघी आणि ज्योती अशी टीम अजून एक सहकारी मुलांच्या टीम ला जॉईन होऊन YHA चा  कुलू मनाली चा चंदरखणी ट्रेक केला. त्या अगोदर सरावासाठी आणि नंतर छंद म्हणून दोन वर्षे ट्रेकिंग मध्ये मस्त मजेत गेले. दोन दिवसाच्या आठवडा सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतला आम्ही. आमची मैत्री अशी बहरत चालली.  मी केव्हा हळवी झाले तर तिला गाणे म्हणायला सांगायची आणि ती ही केव्हाही आढेवेढे न घेता चक्क मला भेटून ते सादर करायची. घरी जाताना bus आणि train मध्ये आमच्या न संपणाऱ्या तारुण्य सुलभ गप्पा असायच्या.नंतर माझी बदली दुसऱ्या इमारतीत झाल्याने पुन्हा आमच्या भेटी फक्त फोन वर होऊ लागल्या

मी विधी विभागात आले ते थेट सात वर्षे तेथेच होती ! माझ्या पाठोपाठ, RFD मधून मेधा ही जसे काही माझी पाठ राखीण  म्हणून  विधी विभागात आली ती अजूनपर्यंत ! ह्या सात वर्षात अजूनही  जिवाभावाच्या मैत्रिणी भेटल्या आणि आमचा छान lunch group जमला.  अगदी पुढे जाऊन आमची कुटुंब मैत्री झाली. Covid काळातही आम्ही video कॉल द्वारे एकमेकाच्या संपर्कात राहून एकमेकाला आधार आणि आनंद  देत राहिलो. स्नेहा, सीमा, ललिता, कांचन ह्या ग्रुप मध्ये सामील होत गेल्या. आमच्या lunch time साठी आम्ही एका रिकाम्या छोट्याशा केबिन मध्ये बसायचो आणि बाजूला आमचे वरिष्ठ पण family oriented, मार्गदर्शक अधिकारी गप्पा ना प्रोत्साहन च द्यायचे ! त्यांनी सर्व विधी विभागाला छान बांधुन ठेवले होते. 
त्यानंतर माझी बदली प्रोजेक्ट finance मध्ये झाली आणि सर्व work culture च बदलले ! नवीन boss एकदम कडक, विधी विभागाच्या एकदम विरुद्ध, पण अतिशय हुषार, माणुसकी ला जपणारे, धार्मिक, स्वतःचा राग शांत झाल्यावर समोरच्या ची माफी मागणारे ! त्यांच्या बरोबर काम करताना खूप धमाल यायची, नवनवीन projects संदर्भात ते माझ्याकडून छान काम करून घ्यायचे, मला काही शिकवायला पाहायचे. त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास आणि career दृष्ट्या महत्वाचा पाया तयार झाला. तेथे तब्बल नऊ वर्षे काम केले. नंतर माझी बदली हैदराबाद ला झाली दोन वर्षे. तिकडे वेगळ्या अतिशय साध्या स्वभावाच्या प्रेमळ ,  निरागस मैत्रिणी लाभल्या. येथेच पुन्हा ज्योतीचा सहवास लाभला.  माझी trekking ची आवड जोपासण्यात तिचा मोठा सहभाग आहे. मी, ग्रेटा आणि ज्योती मुंबई च्या मुली म्हणून अगदी हिमाचल प्रदेशात ओळखू लागलो होतो कारण रोहतांग मध्ये बर्फ पडल्यामुळे अडकून पडूनही मस्त मजेत राहिलो एक दिवस, तक्रार न करता, निश्चिंत ! ह्या सर्वाचे श्रेय ज्योती ला जाते. प्रवास दरम्यान येता जाता, एखाद्या week end ला असे करत तिच्या मठ आणि सत्संग ची गोडी लागली. तेथेच मी रेकी  च्या दोन levels पुऱ्या केल्या. ज्योती अतिशय unique मुलगी. सिंधी  परिवारातील, कुटुंबाला आधार स्तम्भ, कामात हुषार, स्पष्टवक्ती, कुमारी राहून एका मुलीला दत्तक घेऊन तिचे अत्यंत निगुतीने पालन पोषण, शिक्षण, लग्न वगैरे करून देऊन आता स्वतः सन्यास घेऊन आश्रमात राहिली आहे.  तिच्या स्पष्टव्यक्ती पणामुळे तिचे तात्विक वाद ही व्हायचे कुणाही बरोबर, पण  ते तेवढ्या पुरतेच. कोणत्याही संकटाना हसत सामोरी जाणारी . जरुरी तेव्हा मुलीला, बहिणींना भेटून मदत असतेच.  किती आदर्शवादी जीवन आणि सर्व हसतमुख, हे महत्वाचे! 

मैत्रिणी वर लिहीत असताना मित्र वर्गाची ही आठवण होते. अल्प काळ पण त्या त्या वेळी मदतीला धाऊन येणारे पार्था, मेनन, वेंकी. हे सर्व कार्यालयीन साम्यामुळे वैयक्तिक  सल्लागार ठरले. वेंकी तर सर्वांचाच मित्र, त्याला केव्हाही हाक घाला,  सकारात्मक प्रत्युत्तर सहित हजर. मेहनती, हुषार, बिनधास्त आपली दुःखे झाकून हसत राहणारा अवलिया प्राणी. माझी गाण्याची फर्माईश केव्हाही सहज पुरी करायचा. त्याच्या आणि पार्थाच्या हातचे डोसे आम्ही मुली खायचो ! 

मुंबई ला परत आल्यावर lunch  ग्रुप बदलला आणि ग्रेटा आणि मी एकत्र जेऊ लागलो ! पण थोडेच दिवस. लग्नानंतर येथे काही वर्षे  एकटी राहून सर्वांना सांभाळणारी ग्रेटा नवऱ्याला भेटायला नोकरीवर तसेच  थोड्या दिवसांनी मिळणाऱ्या पेन्शन वर पाणी सोडून दुबई आणि नंतर canada ला निघून गेली. आम्ही नियमित एकमेकीना पत्र लिहायचो, आता फोन होतात सविस्तर, अजूनही never ending talk ! 

मी थोडीशी वर्कोहोलीक असल्याने मला ह्या माझ्या सर्व मैत्रिणीनी  मी वेळेवर जेवण घेण्यासाठी खूप मेहनत घेतली. एकत्र जेवण्याची मजा आम्ही अजूनही निवृत्तीनंतर घेत असतो. सहभोजनचा आनंद काही आगळाच ! कांचन ठाण्याला, मी ही ठाण्यात होते, स्नेहाचे माहेर ठाण्याचे, मेधाची बहिण ठाण्याला, असे आमचे हळूहळू कुटुंबीय ही ओळखीचे होऊन मैत्री वाढत गेली. 

कांचन मितभाषी पण नेमके बोलणारी, आमचे सर्वांचे हिशेब ठेवणारी, दोन्ही जावांबरोबर मैत्रीने राहणारी, थोडीशी reserved, सासूबाई कडून शिकून आम्हाला मस्त गरम गरम गूळ पोळ्या घेऊन येणारी. गोरी गोमटी असूनही Leap stick शिवाय तिला चैन नाही पडत! आणि कोब्रा असून मस्त कायम मांसाहाराचे डोहाळे लागलेली प्रेमळ श्रोती ! आमच्या सर्वात २-३ वर्षांनी लहान पण समंजस कांचन !   
स्नेहा लाघवी, हौशी, मस्त dress sense असणारी, ever green,  पण ऑफिस आणि घर ह्यात पूर्ण रमणारी. आमच्यासाठी वेळ देताना तिची खरेच तारांबळ व्हायची कारण संजय जास्त करून tour वर असल्याने तिला फक्त सुट्टीला लाभायचा. मी दादर ला राहायला आल्यावर आमची मैत्री अजून वाढली, office मधील आमचा कार्यालयीन प्रवास ही साधारणत: थोड्या फार फरकाने सारखाच होत गेला. 
ललिता म्हणजे आमची अन्नपूर्णाच. किती प्रकार करून आणायची आणि आम्हाला खिलवायची. तिच्या दाक्षिणात्य पदार्थावर आम्हा सर्वांची प्रथम उडी ! मेहनती सर्व परिवाराला बांधून ठेवणारी  मुलगी, आम्हा सर्व कोब्रा, कब्रा मध्ये छान रमली. आमचा हा लुंच ग्रुप खरेच सर्वांच्या कौतुकाचा विषय असायचा आणि काही जणींना त्यात सामील व्हायचे असायचे. पण आम्ही थोडक्यात मजा ह्या न्यायाने सीमित राहिलो. आम्हा सर्वांची wave length जुळल्याने आम्हाला अजून कोणी परकीय नको वाटले ! 
सीमा आणि मेधाने खूप वर्षांपूर्वी सेवा निवृत्ती घेतली तरीही आमची मैत्री आणि संवाद छान चालू राहिले. 
सीमा एवढी वर्षे परदेशात राहून, व्यस्त असूनही जेव्हां जेव्हां जमेल तेव्हा फोन करणे, नातवंडांचे फोटो पाठवणे, छान छान गाणी , व्हिडिओ share करणे हे चालू असते तिचे.  आमच्या बरोबर lunch ला बसणारी गोड मुलगी एकदम नवऱ्याची नोकरी बदलली म्हणून परदेशात जाते काय, तेथे जाऊन शिकते, तेथून अजून पुढे जात अमेरिकेत settle होते काय, स्वतः तेथील शिक्षण  घेऊन  नोकरी करून साठी नंतर ही नोकरी चालू ठेवते काय, बरे इथून गेलेला मुलगा तेथे निष्णात neuro surgeon आणि  त्याची  तीन  मुले  ह्या सर्वांबरोबर मस्त आनंदात आमच्या शी संपर्क ठेउन राहते काय, सर्वच कौतुकास्पद, सलाम त्या सीमा ला. 

मेधा सेवानिवृत्ती नंतर कुटुंबात रमली तरी स्वतः ला वेळ द्यायला शिकली आणि सतत काही ना काही शिकत राहून, जपान ट्रीप मधून खूप गोष्टीचा अभ्यास करून आता व्याख्याने देणे, स्फुट लेखन करणे, त्यांच्या पूर्ण परिवाराच्या वार्षिक गेट टुगेदर ची समर्थपणे जबाबदारी घेऊन, active सहभाग घेणे, सहली व्यवस्था करणे अशा कितीतरी गोष्टी ती सतत करत असते. तेही तिच्या मुलाच्या catering व्यवसायात सिंहाचा वाटा उचलून आणि एका यशस्वी cardiologist नवऱ्याला एकदम समर्पक साथ देऊन ! दोन्ही मुलांना सुजाण पालक म्हणून उत्तम रित्या वाढवणे हे तिच्या सेवानिवृत्तीचे फळ मिळायला तिने खूप मेहनत घेतली.  तिची ऊर्जा अशीच कायम राहू दे, कारण त्यातून आम्हा सर्वांना ही ऊर्जा मिळत असते ! Dr शेखर तर आम्हा सर्वांचे कौटुंबिक सल्लागार 🙏

आणि नीलिमा ! आमची हिरॉईन, सुंदर दिसणारी आणि वागणारी मुलगी. सासर माहेर सर्वांचे अगत्याने करणारी, मधुर आवाज आणि आवड असतानाही गाणे विकसित न करता जोडीदाराबरोबर जीवन संगीत गाणारी, आपल्या समस्या, दुःख विसरून भोवताली आनंद पसरवणारी,  हळवी , निरागस , हसतमुख, मैत्रीण. 
माझ्या या साऱ्या मैत्रिणी सुगरण बरे का, ऑफिस, घर, नातलग सांभाळून छान छान पदार्थ सादर करणाऱ्या ! 

अजून काही अल्पकालीन मैत्रिणी म्हणजे माझ्या पुण्याच्या वास्तवातल्या.. आम्ही सहा जणी एकत्र तीन खोल्यामध्ये राहायचो. स्वभाव, आवडी निवडी, वयोगट, भाषा, प्रांत, सर्व भिन्न असलेल्या पण मस्त राहिलो रोज चा दिवस छान संपन्न करत. प्रत्येकीला घरी लवकर जायचेच होते पण केव्हा रडके चेहरे करून नाही बसलो ! एकमेकांची काळजी वाहिली, समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. आपले संसार आठवड्यापूरते पार्श्वभूमीला ठेऊन येथे समरस झालो, एका तऱ्हेने हॉस्टेल life जगलो म्हणा ना, जरी मनात नेहमी विचार कुटुंबाचे ! 

ह्या सर्वातील मी ! 
घरातील आदर्शवादी, विकसनशील,  उत्तम सुसंस्कार आणि आजूबाजूचे सामाजिक तसेच शैक्षणिक भारावलेले वातावरण यामुळे शाळेत मी बऱ्यापैकी अभ्यासू, sincere म्हणून गणले गेले. हमखास result देणारी म्हणून मला प्राथमिक व माध्यमिक शाळेत नेहमी सर्व स्पर्धा, उपक्रमात भाग दिला जाऊ लागला. मी ही स्वतः टाचणे काढून वक्तृत्व, निबंध स्पर्धा, शालेय स्कॉलरशिप, हिंदी भाषिक  इत्यादी स्पर्धात  भाग घेऊन यश मिळवले. सुरुवातीला मराठी वाचनालयात भारती बरोबर रमणारी मी, आठवी पासून  typing आणि shorthand क्लासेस मुळे  इंग्रजी वाचण्याचा सराव करू लागले ज्याचा मला पुढे नोकरी दृष्ट्या खूपच उपयोग झाला. माझे drafting  सर्वत्र वाखाणले गेले. मुंबईत आल्यावर राजी, ग्रेटा आणि ज्योती ह्यांच्या मुळे मला हिंदी, इंग्लिश भाषा बोलण्यासाठी अजून सुकर झाल्या. माझ्या वडिलांचे वाचन , फिरती आणि जनसंपर्क भरपूर असल्याने आम्हाला ते सतत काही ना काही प्रेरणादायी गोष्टी कानावर घालायचे. मोठ्यांची उदाहरणे द्यायचे. आईकडून मेहनत, सहिष्णुता, हसतमुख परोपकार वृत्तीचे बाळकडू होतेच.  साने गुरुजी कथामाले मुळे संस्कार अजून दृढ झाले. मुंबईत आल्यानंतर देश तसा वेष,  तोंड बोलण्यासाठी दिले आहे, ऐकायला दोन कान, पाहायला दोन डोळे आहेत असे वडिलांनी मंत्र दिल्याने मी थोडीफार चौरस होत गेले.  मी विविध दृष्टीने निरुपद्रवी असल्याने माझी सर्वांशी पटकन मैत्री जमायची. गंमत म्हणजे मी कोकणातून आले असले तरी माझ्या एकंदरीत अवतरावरून मी काहीना गोवा, काहीना दक्षिणी तर काहींना कारवारी वाटायची, इंग्लिश प्रेमाने आणि  अस्खलित बोलल्याने ख्रिश्चन मुलींना जवळची वाटायची, त्यामुळे  विविध प्रांतीय मैत्री होत गेली. एक थोडीशी सीनिअर तर मला स्ट्रीट स्मार्ट म्हणे ! माझे भरभर चालणे असल्याने स्टेशन ते ऑफिस पळणाऱ्याचा एक ग्रुप झाला 
होता ! असो.  इच्छा आणि  बौद्धिक कुवत असल्याने मला परिस्थितीजन्य नोकरी करणे क्रमप्राप्त होते. अठरा पुरी होताच नोकरी चालू झाली ती अगदी साठी पर्यंत. इमाने इतबारे ! या सर्वात मला मानसिक बळ मिळाले ते  घर, शाळा आणि या मैत्रिणीकडून !  
माझ्याकडून असलेल्या सर्वांच्या अपेक्षा मला पुऱ्या नाही करता आल्या कारण मी संसारात मग्न होऊन इतर गोष्टी,  झेपतील एवढ्याच केल्या. त्याचा खेद नाही कारण आपल्याला एकाच वेळी सर्व साध्य होत नसते. आता अट्टाहासाने काही करावे असे ही वाटत नाही. 
जमेल तेवढे आनंदात राहून समोरच्याला आनंदी ठेवणे एवढीच मन धारणा आहे. जग सुखी तर आपण सुखी !  प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तर नक्कीच सर्वत्र सुख, शांती  पुन्हा  प्रस्थापित होईल ! 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा