माझ्या शाळा
शालेय जीवनातच किती तरी वेळा हा निबंध लिहिला होता. तर मग आता पुन्हा काय आठवले ? कारण एक प्राथमिक, मग माध्यमिक, नंतर कॉलेज आणि. मग जीवन शाळा ! परंतु येथे दोनच शाळा बद्दल लिहीत आहे. शाळेची ओळख झाली ती आमच्या येथील कन्या शाळा. लहानपणी पाचवी पर्यंत आम्ही सर्व मुली तेथेच शिकलो. मस्त पटांगण, मध्यवर्ती ध्वजस्तंभ, दोन इमारती, आजूबाजूला लाल माती, चिरे, आडोशाला घाटी असे सुंदर दृश्य आमचे स्वागत करायला तयार असे. केव्हा केव्हा आम्ही आडवाटेने शाळेत यायचो तेव्हा रस्त्यात मस्त पडलेल असायचे, मध्येच देवयानी, एक सुंदर प्रेमळ थोडीशी ज्येष्ठ मैत्रिणीचे घर, वाचनालय असे सर्व मोह असायचे ! तिचा जोडीदार मुंबई हून यायचा तेव्हा चीतचोर मधील गाणी म्हणायचं तेव्हा आमचा गाव अधिकच सुंदर व्हायचा ! मातीच्या भिंती आणि त्यातील सर्व मुलींच्या आवाजातील कविता, गाणी, महिन्याला केलेली भेळ, फेर धरून केलेले नाच हे होतेच आणि त्यात अगदी वात्सल्य सिंधू शेट्ये बाई असायच्या. लांबून बाजार पेठेतून येऊन कित्ती प्रेमाने त्या सर्व बाल जीवांचे मनोरंजन करता करता सर्व बालपणच सुसंस्कारित करून टाकायच्या. वर्गातील दोन प्रधान बहिणी नेहमी आठवतात. डोक्यावर पान थापून यायच्या! होत्या मात्र खरेच शांत स्वभावाच्या पण त्यांचे पाहून आम्हाला केव्हा असे केसांवर पान थापून यावेसे नाही वाटलेले !
साखळकर बाई शाळेच्या मुख्याध्यापिका, पूर्ण शाळा त्यांच्या उत्कृष्ट कार्य शैली आणि व्यवस्थेवर चालायची. इंदिरा गांधींना जसे HE man म्हटले जाई तसे त्या होत्या, संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या. दिसायला ही तशाच. डोक्यात एकच विचार, शाळा ! आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटायचा आणि त्यांच्यामुळे एक आत्मविश्वास ही असायचा. स्वतः खूप हुषार, त्यांचा मुलगा बोर्ड मध्ये आलेला, तशी शाळेतील सर्वच मुले विविध परीक्षे मध्ये जिल्हा, राज्य स्तरावर यावीत असे त्यांना वाटे. खूप परिश्रम घ्यायच्या , माझ्यावर त्यांचे खूपच जीव. मी त्यांना थोडाफार न्याय देऊन चौथी ला स्कॉलरशिप मिळवली. ती पुढे सातवी पर्यंत चालू राहिली.
शेटये बाई आणि साखळकर बाई, दिसायला, वागायला दोन टोके, पण त्यांच्यातील दुआ एकच, मुले आणि त्यांचा विकास !
अतिशय भारावलेले दिवस होते ते.
माध्यमिक शाळा
शाळेची सुंदर इमारत, मध्यभागी प्रशस्त मैदान, आजूबाजूला चिंचा, करवंदे घेऊन बसलेल्या बायका, इकडून तिकडे धावणारे शिक्षक गण, मित्र मैत्रिणी बरोबर गप्पा मारताना अपुरी वाटणारी मधली सुट्टी हे सर्व चित्र डोळ्यासमोर असायचे आणि तसे निबंधात प्रतित व्हायचे.
शाळेची जागा आणि रचना ही सुंदर होती. शहरात शिरल्यावर दवाखाना, मंदिर आणि त्यानंतर लगेचच शाळेचा भव्य परिसर. मोठाले मैदान, लहान लहान विविध विषयाच्या इमारती, वाचनालय, कला केंद्र, मुख्य इमारत, असे सर्व एका पाठोपाठ उतारावर. बाजारपेठ किंवा गुजराळी कडून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तथा शिक्षक वर्गाला चढ लागे थोडा शाळेत शिरण्यापूर्वी तसेच भटाळी मधील विद्यार्थ्यांना घाटी असायची. यशाचे ध्येय गाठताना दम लागणारच , आपले ध्येय पायरी पायरी ने गाठायचे आणि पायउतार होताना पाय न घसरवता खाली यायचे ह्याची शिकवण च होती एक प्रकारे ! जी आत्ता लक्षात येते आहे !
आताच्या डोळ्यांना त्यावेळी गुरुजनानी घेतलेले परिश्रम, त्यांची तळमळ दिसते आहे. म्हणून हा लेखन प्रपंच. तो काळ आणि सभोवताल ही तसेच होते. समाजवादी विचाराने भारावलेले वातावरण. मुलांसाठी, पुढच्या पिढीला घडविण्याची धडपड. खरेच सोनेरी दिवस लाभले आम्हाला. नव्या दमाचे नवीन गडी शाळेत येऊन दाखल होत होते आणि ज्येष्ठ गुरुजन त्यांना तयार करत होते. आमच्या शाळेला जवळ जवळ शंभर वर्षांची थोर परंपरा होती. दादा सरदेशपांडे ह्यांच्या कृपेने ही शाळा बहरत चालली होती.
आमची शाळा composite होती म्हणजे सर्व विषय, सर्व कला शिकवणारी. श्रमदानाला महत्व देणारी. शाळेची नवीन इमारत बांधताना आम्ही थोडेफार जे श्रमदान केले काही दिवस, ते अजूनही ध्यानात आहे. त्यामुळे आलेला आत्मविश्वास नक्कीच पुढील जीवनाचा पाया ठरतो.
स्वातंत्र्याची विशी उलटून गेली होती, नवनवीन पंचवार्षिक योजना साकार होत होत्या. नंतर आणीबाणीचे वारे ही वाहायला लागले. नव्याने स्वातंत्र्याची चव चाखणारे लगेच पुढे सरसावले. ऐन घटकेला आमचे आधारस्तंभ वासुकाका तुरुंगात गेले. आणि दहावीची तोंडावर आलेली परीक्षा. मन एकदम हवालदील झाले. तरी बाकी सर्व गुरुजनानी स्वतः जातीने लक्ष घालून आमची तयारी करून घेतली. आम्हा चार पाच मुलांकडून शाळेला बोर्डात नंबर लागण्याची शक्यता वाटत असावी, त्यामुळे गणित, शास्त्र आणि भाषा या विषयांची आमच्याकडून अगदी जातीने तयारी करून घेतली गेली. कुणा कुणाची नावे घेऊ ? सर्वांचे लाडके आदरणीय वासू काका, papers सोडवून घेणारे गुर्जर सर, प्रयोग शाळेत मुलांना रमवणारे, भौतिक शास्त्राची मुलांना आवड निर्माण करणारे महाजन सर, देशपांडे सपत्नीक, कला शाखेशी मैत्री वाढवणारे नवरे सर, AD, GD, AG सर, व्यायामाचे महत्त्व पटवून देणारे मोडक आणि भावे सर, accounts शिकवताना आजूबाजूच्या जगाची ओळख करून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय शिकायला हवे सांगणारे कुलकर्णी सर..आणि एकंदरीत सर्व शाळाच मुलांच्या विकासासाठी झटत होती हे आमचे केवढे भाग्य. बरे, हे शिक्षक आपल्या विषयापुरते नसायचे. केव्हाही अडल्या गरजेला दुसरा कोणताही विषय घ्यायची तयारी असायची त्यांची. वासूकाका म्हणजे इंग्लिश व्याकरण आणि गणित चे आधारस्तंभ, आमच्या भावी जीवनाचा पाया त्यांनीच रचला.
त्यांच्या प्रयत्नांना आम्ही अपुरे पडलो हेच खरे !
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा