परंपरा, कोणत्या पाळाव्यात/ कोणत्या टाळाव्या
परंपरा पाळाव्यात की नाही हा दिवसेंदिवस, प्रगतीच्या वाटेवर चालणाऱ्या समाजाला, प्रश्न पडतो आहे. ह्याचे प्रमुख कारण परंपरा, मग त्या रूढी असोत किंवा श्रद्धा, म्हणजे अशिक्षित पणा चे लक्षण समजून त्यावर मागासलेपणाचा शिक्का मारला जातो.
परंपरा म्हणजे त्यात रीतिरिवाज, रूढी, अंधश्रद्धा, सर्व आले. काही रूढी बाबत मला उमगलेला अर्थ असा होता -
रात्रीची नखे किंवा केस न कापणे - पूर्वी कंदीलावर रात्र असताना नखे/केस पायाखाली किंवा स्वयंपाक घरात सहजी सापडू शकत होती, ते टाळणे.
प्रवासाला जाताना हातावर दही ठेवणे - दही म्हणजे खाल्लेले अन्न पचण्यासाठी योग्य. प्रवासात पोटाला आराम मिळण्यासाठी गृहस्वामिनिने घेतलेली खबरदारी.
पाहुणे किंवा घरची मंडळी बाहेर पडल्या पडल्या कचरा न काढणे - माणूस निवर्तल्यावर लगेच जमीन सारवली जाते, तसे इतर वेळी होऊ नये म्हणून.
अंघोळी नंतर कचरा न काढणे - स्वच्छता दर्शक.
म्हणजेच काय, प्रत्येक रूढीचा शास्त्रीय अर्थ शोधून ती योग्य वाटली तर आचरणे, असे वाटते.
आपले विविध सण, व्रत वैकल्ये, हा सर्व सामाजिक एकतेसाठी चा खटाटोप होता व जाणीवपूर्वक त्याच्या साठी समाज सुधारकांनी प्रयत्न केले होते. आत्ताच्या वेगवान दिनचर्येतून सर्वांना एकत्र आणण्यासाठी सण व उत्सव हे अधिक महत्त्वाचे वाटतात परंतु त्याचे अवडंबर करणे किंवा स्तोम माजवून, गोंगाट करून ते साजरे करणे हे तेवढेच चुकीचे आहे. आपल्या परंपरा अशा हव्यात, जेणेकरून लहान मुलांमधील मधून उद्याचे नागरिक घडतील, आबालवृद्धांना एकत्र करून जीवन मुल्ये जपतील, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा देतील. या पार्श्वभूमीवर कितीतरी ठिकाणी उत्सवा मधून तंटे, पक्ष, वाद उद्भवलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. हे सर्व करण्या मागे ज्येष्ठ नागरिकांचा महत्वाचा सहभाग आवश्यक वाटतो. परंपरा ह्या आत्ताच्या युवा पिढीवर लादल्या न जाता त्या निखळ मूल्ये तोलणाऱ्या व करमणूक करणाऱ्या कशा राहतील हे पाहणे जास्त महत्वाचे.
अजून एक प्रामुख्याने जाणवणारा मुद्दा म्हणजे परंपरांचे जतन करणे ही स्त्री ची जबाबदारी समजली जाते. तसे न होता, स्त्री पुरुष दोघांनीही मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी, परंपरा व रूढी चे योग्य अर्थ सांगून त्यातील जेवढे प्रत्यक्ष शक्य आहेत, योग्य आहेत ते स्वीकारले गेले पाहिजेत. सध्या सर्वत्र व्यवस्थापन शिकवणाऱ्या संस्थांचे पेव फुटले आहे. नोकरीसाठी आवश्यक पूर्वतयारी म्हणून त्याकडे पाहिले जातेय. अशावेळी इतिहासाकडे नजर टाकल्यास असे लक्षात येईल की आत्ताचे event mgmt, business mgmt, टीम work, लेडेरशिपे हे सदोदित कानावर पडणारे शब्द पूर्वजांनी किती लीलया पेलले होते. त्या मागे ह्या परंपरा होत्याच. कोणत्याही देशाची परंपरा ही त्याची ओळख होऊ शकते जसे की नमस्कार हा भारतीय, दोन हात जोडून केलेला म्हणजे एकत्र येणे व वाकून केलेला म्हणजे आदर प्रदर्शित करणे. लहान लहान कृतीत केवढा अर्थ दडलेला आहे. सगळ्यांनी पंगत मांडून एकत्र जेवणे यासारखी सुंदर दुसरी रीत नाही. होते एवढेच, हे प्रत्यक्षात उतरायला दोन व्यक्ती एकत्र येणे ही कठीण होऊन बसलेय. अशावेळी जे प्रॅक्टिकल किंवा शक्य आहे तेच स्वीकारले पाहिजे. नाहीतर उपवासाची परंपरा म्हणून उपास करून पित्त वाढवणे, नवर्यासाठी थांबून भूक मारणे, जिवंतपणी भांडून मेल्यानंतर श्रद्धेचे अवडंबर करणे, मंगळागौरी ची जागरणे करून office ला दांड्या, भजने करून आवाज प्रदूषण, दहीहंडी किंवा होळीच्या वेळी घातकी प्रकार घडणे हे सर्व आपण पाहतोच आहोत.
परंपरा, कोणत्याही व्यक्तीला, समाजाला, देशाला, हवीच. तिचे पालन योग्य रीतीने, जमेल तेवढे, शिस्तीने, स्वखुशीने, समजून उमजून, मर्यादेमध्ये होणे जरुरी आहे. परंपरेमधून एकमेकांविषयी सद्भावना वाढीला लागून सुंदर समाधानी समाज दर्शन घडणे महत्वाचे. हे जर घडत नसेल तर अशा परंपरा झुगारून सुधारित मूल्ये देणे ही आत्ताची आवश्यक गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा