मंगळवार, १६ जुलै, २०२४

 झोप आणि नीज 


दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच पण नीज मध्ये जो गोडवा आहे तो झोपेत नाही. नीज म्हटले की लगेच नीज नीज रे बाळा, नीज माझ्या, सारखी  अंगाई गीते  आणि पाठोपाठ आई  आठवते.  झोप म्हटले की झोप आता, बास झाले, झोपा काढा, झोपून रहा, झोपा  केला, वगैरे दटावणीचे सूर आठवतात! 

तर अशी ही झोप (नीज म्हणणारे कोणी नाही आता) किती महत्वाची आहे. आज आणि उद्या यातील अती महत्वाचा दुवा ! त्या झोपेत काय काय होते ! स्वप्ने पडतात, कोणी घोरते, कोणी चालते, कोणी बडबडते ही. दिवास्वप्न पाहणारे ही भरपूर असतात. हे सर्व दिवसभर केलेल्या धावपळीचे व विविध गोष्टी  ऐकण्याचे, वाचल्याचे, पाहण्याचे परिणाम असतात. झोपेतून कोणाला उठवू नये म्हणतात, ते या साठी ! 
प्रवासात, नीरस भाषणाच्या कार्यक्रमात, नको असलेल्या गप्पा चालू असतानाही झोप येते काहीना. लिंगभेद करावयाचा झाल्यास असे एक निरीक्षण आहे की (माझे) महिला खूपच सावध, दक्ष तसेच  संकोच बाळगून असल्याने  त्या अशा कार्यक्रमात वगैरे झोपत नाहीत. त्यांना आपण पाहिलेले, ऐकलेले दुसऱ्यांना नक्कीच केव्हा ना केव्हा सांगायचे असते ! त्यामुळे लक्ष देऊन असतात ! संसाराच्या दोरीवर कसरत करताना, ऑफिस मध्ये मात्र त्यांना पेंग येऊ शकते जी चहाच्या माऱ्याने घालवतात बिचाऱ्या. वार्धक्यात, ही झोप त्या महिला भरून काढतात असेही दिसते. चालक केव्हा केव्हा पेंग आलेली असतानाही वाहन चालवतात, त्यांचे मात्र नवल वाटते आणि त्यांच्या मागे बसून माझ्यासारख्या महिला त्यांच्याशी वार्तालाप करून त्यांना जागे ठेवण्याचे प्रयत्न करतात, त्यांचेही कौतुक !
काहींची झोप हुकमी असते, काहीना अमुकच ठिकाणी लागते, काही कोठेही डोळे मिटतात !  सहज सोपी चिरनिद्रा पण काही भाग्यवंताना लाभते. 

अशी चुटकी किंवा पेंग ही आवश्यक असते,  नव्या दमाने उद्याला सामोरे जायला. अर्थात प्रत्येक व्यक्तीची झोपेची जरुरी कमी जास्त असू शकते. नवजात बालक दिवसभर झोपून रात्री ही झोपते हा काळ सर्वसाधारणपणे अठरा तास असतो. हळूहळू झोप कमी होऊन हालचाली वाढल्या की ते बारा तासांवर येऊन पोचते. तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तीना आठ तास झोप भरपूर होते. वार्धक्य आले की झोप हळूहळू कमी होऊन सात ते सहा तासांवर येऊन पोचते. पाच तास ही पुरते.  विद्वान लोक खूप कमी झोपतात कारण सतत ते कार्यरत असतात. त्यांच्या तन, मनाला मग कमी झोपेची सवय होते. म्हणजे आठ तास झोपणारे लोक कमी बुद्धीचे असतात असे मुळीच नाही. परंतु ते आपली कार्यक्षमता पूर्णपणे वापरत नाहीत, असे वाटते. 
सध्याची तरुण पिढी पाहिल्यास तरुण  मुले खूपच कमी झोपतात असे लक्षात येते. अर्थात हे सर्व सोशल मीडिया मुळे तसेच आंतरराष्ट्रीय काम किंवा व्यवहारामुळे. 
पुरेशी झोप घेणे हे आरोग्य दृष्ट्या अती महत्वाचे वाटते. मानसिक सल्लागार ही हेच सांगतात. अपुऱ्या झोपेचे दुष्परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर नक्कीच होतात आणि ते टाळणे नक्कीच जरुरी आहे. विद्यार्थी दशेत तर पुरेशी झोप आवश्यकच आहे अर्थात घरी, शाळेत वर्ग चालू असताना नव्हे !  झोप ह्या विषयावर खूप संशोधन झाले आहे. अती झोप जशी वाईट तसा निद्रानाश ही वाईट. 

मी ह्या विषयावर लिहिण्याचे कारण मला कुठेही केव्हाही झोप येत नाही,  तरीही झोप मला अतिशय प्रिय आहे. मला बोलता बोलता झोपणाऱ्या व्यक्तींचे कौतुक आहे आणि मी त्यांना निवांत झोपू देते! दिवसाकाठी शांत मनाने, समाधानाने झोपण्यात जी मजा आहे ती अजून कशात नाही. गृहस्थाश्रमी  असताना सुट्टीच्या दिवशी दुपारी  दहा मिनिटांची झोप ही पुन्हा ताजेतवाने करायची. आता निवृत्ती नंतर वेळ असला तरी माझी झोप हुकमी नाही. तिच्या वेळेलाच ती येते . तिला चुकून कधी जास्त वेळ पकडून ठेवले तर डोके जड होते ! 
मतितार्थ, प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी आणि ती ओळखून प्रत्येक व्यक्तीने आपापली झोपेची वेळ ठरवावी. वेळेत नियमितता ठेवणे नक्कीच प्रकृतीला हितकारक. एकदा वेळ ठरली की उठण्यासाठी गजर ही लावण्याची गरज नसते. हा झोपे वरील प्रबंध नाहीये, झोपेला आळवण्याचे प्रयत्न ! 
अलका काटदरे/२६.११.२०२३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा