मंगळवार, १६ जुलै, २०२४

मनीचा चंद्र ते ISRO चा चांद 


 खरेच, खूप छान विषय. अगदी पाळण्यात असल्यापासून ज्या चांदोबाला भेटतोय, ऐकतोय, वाचतोय, त्या चंद्रमाला आता अनुभवायची वेळ येणे हे केवढे परम भाग्य या पिढीला आणि एवढी वर्षे जो कल्पना विलास वाटला तो वास्तवात कसा आहे हे कुतूहल जागे करून, होऊन, प्रत्यक्ष त्याची पाहणी करायची वेळ आलीय ही सुवर्णसंधी. 

 चांदोमामा च्या स्वरूपात भेटणारा चंद्र, आईच्या अंगाईतून जाणवणारा प्रेमळ मामा, मग लपाछपी खेळणारा, लिंबोणीच्या झाडामागे लपणारा चांदोबा, चांदण्या बरोबर चमकणारा, प्रेमी युगुलाना खुणावणारा चांद, लालिमा पसरवणारा चंद्र, मधू इथे आणि चंद्र तेथे म्हणायला लावणारा आणि मधुचंद्राची लज्जत वाढवणारा चंद्र, भाऊबीजेच्या दिवशी भगिनींना प्रेमाने ओवाळणी करण्यासाठी परातीत दर्शन देणारा चंद्र, कडव्या चौथला तमाम उत्तरवासिय सौभाग्यवतीना दर्शन देऊन नवऱ्यावरील प्रेम वाढवणारा चंद्र ! किती त्याची रूपे आणि किती त्याच्या भूमिका ! सर्व आपल्या मनीचे, कल्पनेतले ! कोणी हे सर्व कल्पिले ? कवी वृत्तीच्या मानवाने. प्रेमाने आसुसलेल्या, थकल्या भागल्या जीवाला रात्री प्रसन्न शांतता द्यायच्या एकाच ध्येयाने जसे प्रेरित होऊन हा चंद्र तेथे भव्य निळ्या, गडद आकाशात उभा ठाकलेला असतो, स्तब्ध, एकटाच ! संपूर्ण जगाला, सर्व धर्मियांना प्रेमळ वेड लावणारा चंद्र ! जेवढा तो भाऊराया तेवढाच देवासमान. कलेकलेने वाढणारा, जगाला प्रगतीची आशा दाखवणारा चंद्र. 
ह्या मनीच्या चंद्राने जसे आबालवृद्धांना वेड लावले तसेच किंबहुना जास्त वेड संशोधकांना लागले, ह्या ग्रहाचा अभ्यास करण्याचे. म्हणूनच कदाचित lunatic हा शब्द आला असावा ! वेड, संशोधनाचे वेड ! 
अंतरंगात ससा लपवून ठेवणारा चंद्र वास्तवात कसा आहे हे प्रथम नासाने शोधले. भारत ही प्रयत्नशील होताच. येथील पृथ्वी वरील समस्या अधुकर असल्याने चंद्र ग्रहाचा विचार करायला थोडा विलंब झाला, तरी चंद्रावर यशस्वी रित्या विक्रम यान सोडणारे आपण जगाच्या पाठीवर चौथे आहोत, हे ही नसे थोडके.
ISRO ने यशस्वी केलेल्या चंद्र यान  उड्डाण नंतर, चंद्र  जो कवी  कल्पनेत मधुर, शांत, प्रेमळ, अशिक होता तो प्रत्यक्ष किती रुक्ष आहे हे दाखवून दिले. आता जो आपल्याला दिसला आहे तो आहे खरा खडबडीत, पण काय सांगावे, जसजसे आपण त्याच्या अंतरंगात जाऊ तसतसे त्यांचे सौंदर्य ही आपल्याला जाणवेल. तसा तो छुपाच आहे ना ! आपली प्रतिमा तो नक्कीच राखेल. त्याच्यावर पाणी आहे म्हणे, तर अजूनही विश्व असू शकेल. हे मात्र नक्की की या ISRO च्या चांद बरोबर आपली मैत्री अधिक दृढ होईल, वेगळ्या स्वरूपात. चंद्र केवळ दिखावा नसून त्याच्याकडे जगाला भुलविण्याचे काय सामर्थ्य आहे हे तो दाखवलेच.
अर्थात हे वास्तव पाहायला आपल्याला कितीतरी वर्षे लागली, प्रचंड खर्च झाला, कितीतरी मनुष्य बळ लागले. म्हणजे मनातला चंद्र आणि वास्तवातील, हे गणित किती विषम. चंद्राचे प्रतिबिंब किती स्वस्त ! आपण त्यावर समाधान मानून का नाही राहिलो ? मनीच्या चंद्राने पळण्यातलता बाळापासून एकट्या पडलेल्या भगिनी पर्यंत सर्वांना आधार दिला आहे आणि मला खात्री आहे तो आधार तिचा अजूनही भक्कम होणार आहे. बाळा ना अजूनही नवल कथा ऐकायला मिळणार आहेत कारण आपण सर्व नित्य प्रगती पथावर आहोत. ह्या मनीच्या चंद्राने शेवटी आपल्याला आकर्षित करून स्वतः कडे खेचले आहेच. 
संशोधकांना आता अमवस्या, पौर्णिमा, त्यांचे परिणाम हे अधिक योग्य रीतीने आपल्या पर्यंत पोचवता येणार आहेत. भारतीय संशोधकांनी मारलेली ही सर्वात मोठी उडी आहे. अगोदर चंद्र यायचा खाली खेळायला, आकाशात दर्शन देऊन, पाण्यात प्रतिबिंबित होऊन ! आता आपण जाऊ आपली खेळणी घेऊन चंद्राकडे , त्याच्याशी विज्ञान खेळ खेळायला ! 
कल्पना थांबणार नाहीत तरी वास्तव समोर येईलच !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा