मंगळवार, १६ जुलै, २०२४

 पाहुणे आणि हॉटेल 


मध्यंतरी म्हणजे बहुधा गेल्या वर्षी एक पोस्ट वाचनात आली होती की पुणे मुंबई कडील लोक कोणी पाहुणे जेवायला किंवा राहायला आले की विचारतात पोळ्या किती करू किंवा त्यांना सरळ हॉटेल मध्ये घेऊन जातात. ह्यावर माझ्या मनात घर करून राहिलेले विचार - 

कोकणात असताना कोणी ना कोणी आले गेले असायचे घरी, गप्पा गोष्टी, तालुका किंवा जिल्हा ठिकाणी आल्यावर कामे होऊन परतायची बस मिळेपर्यंत कोणी नातेवाईक किंवा जवळचे स्नेही ह्यांच्याकडे जाणी येणी असायची. फोन वगैरे करायची जरुरी नसायची, किंबहुना नसायचेच तेव्हा मध्यमवर्गीय लोकांकडे. आमच्या घरी चुलीवर नेहमी चहाचे आणि भातासाठी आधण असायचेच. भात, भाकऱ्या, पिठले  ह्यांना तोटा नसायचा आणि सर्वांनी गप्पा  करत एकत्र जेवायचे असल्याने आपोआपच सर्व फस्त व्हायचे. उरलेच तर गडी माणसे, कामवाल्या, चारा वाल्या उन्हातान्हातून फिरणाऱ्या असायच्या, त्यांना दिले जायचे किंवा भाकरी दुसऱ्या दिवशी दशमी साठी उपयोगी यायची. त्या काळी फ्रीज नसायचे,  जरुरी ही नव्हती गावा गावा मध्ये.
बरे, घरातल्या गृहिणी ना स्वयंपाक करणे हेच प्रमुख काम असल्याने कोणी आले राहायला तर जेवण करण्याचे विशेष कष्ट नाही वाटायचे. आणि हे पाहुण्यांचे राहणे म्हणजे आपला आग्रह असायचा, आलात आहात तर थोडे जेऊन , राहून आरामात जा. किंवा त्यांचे तालुका, जिल्हा ठिकाणी काम एखादे दिवशी झाले नसेल तर आपोआप दुसऱ्या दिवशी पर्यंत राहणे व्हायचे. 
सांगायचा मुद्दा हा की मुंबई पुण्यासारख्या शहरात रोजचे जीवन , सुट्ट्या, छोटी कुटुंबे, लहान राहत्या जागा, वेळेची बंधने हे सर्व असते. महिला वर्ग ही नोकरीत अडकलेला, मुले पाळणा घरात ! त्यामुळे कोणी नातेवाईक  किंवा पाहुणे अचानक आले तर गृहिणीची थोडी तारांबळ उडते आणि मग पाहुण्यांना घेऊन रेस्टॉरंट मध्ये जाणे अपरिहार्य होते. एखादी व्यक्ती खपून जाते पण कुटुंब आले तर अशी पंचाईत ! फ्रीज असल्याने एक दोन दिवसाची कणिक  मळून ठेवली असेल तर उत्तम, नाही तर रात्री ऑफिस मधून घरी आल्यावर करणे नको वाटते. इथल्या पालकांना तर मुलांचा अभ्यास ही पाहायचा असतो, सकाळी लवकर उठून डबे तयार करून लोकल गाठायची असते. ह्या सर्वात पाहुणे येणे, त्यांचे गप्पा मारणे व राहणे हे तिला खूप हवे असते , रूटीन मधून change म्हणून, नाती जपायची ही असतात तिला. पण व्यवहार किंवा वास्तवाचे ही भान आले आहे आता. त्यामुळे ती गृहिणी पाहुण्यांसह हॉटेल मध्ये जेवायचा किंवा घरी पार्सल मागवायचा पर्याय निवडते. त्यामुळे उरल्या सुरल्याचा प्रश्न येत नाही. शहरी  खाणे आणि गावाकडील खाणे ह्यात फरक पडतोच थोडासा. घरात भाज्या , बाकी सामान, पिठे इत्यादी असेल तर पटकन स्वयंपाक  नक्कीच जमतो  तिला पण खाणाऱ्याचा अंदाज नसल्याने  जेवण कमी जास्त झाले तर दुसऱ्या दिवशी डब्यात घेऊन जाणे तिला रुचत नाही कारण तेथे ही सर्व ग्रुप मिळून जेवतात, मुलांच्या बाबतीत ही तेच. ताजा डबा देणे केव्हाही महत्वाचे.  बरे, हल्लीच्या जीवन शैली मध्ये नाना प्रकारची दुखणी टाळायची असतील तर ताजे गरम अन्न खाणे हा सर्वोत्तम उपाय. 
आगाऊ सूचना देऊन येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही करून    ठेवता येते, जे टिकाऊ असेल. मुंबई पुणे मधील ट्रॅफिक पाहता दिलेली वेळ नेहमी पाळली  जातेच असे नाही. रात्रीचे  पाहुणे असतील तर त्यांची राहण्याची व्यवस्था किंवा दुसऱ्या दिवशी चे नियोजन ही करायचे असते. घरी किंवा पाहुण्या मंडळी मध्ये बालके असतील तर त्यांच्याकडे ही लक्ष पुरवायला लागते. दिवसाच्या  पाहुण्यांचा चहा वगैरे घरात मस्त गप्पा झाडत पिण्यात पण मजा असते. प्रवासातून आल्यावर कडकडून भूकही लागलेली असते. आलेल्या  पाहुण्यात सखी , बाई माणूस, थोडी  ज्येष्ठ महिला असेल तर ती लगेच गृहिणी ला मदत करायला जाणार, आपसूक !  का बरे तिला स्वस्थ बसू देऊ नये आपण ? तिला ही थोडा आराम नको का ? हे सर्व टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे जेवण बनवून घेणे, पार्सल मागवणे किंवा सरळ छानशा hotel मध्ये जाऊन pending पार्टी देणे, मस्त गप्पा करून पाहुण्याना  हवा तसा हवापालट घडवणे !  
पूर्वीच्या काळी मुलींना जेवण येते का नाही, सुगरण कोण, अमूक घरी उत्तम स्वयंपाक, वगैरे पाहिले जायचे. आता मुलांना ही जेवण बनवता येते, सर्व काही मायाजाल वर उपलब्ध असते. आवड असली तरी वेळेचे बंधन येतेच. 
थोडक्यात, जशी वेळ तसे करावे, पाहुणे काय म्हणतील किंवा कायम मनात घर करून बसलेल्या अपराधी भावनाना थारा देण्याची जरुरी नाही.  सुट्टी असेल, एखादा  सण साजरा करायचा असेल, आमंत्रण देऊन पाहुणे येणार असतील तर काही गोष्टी घरी कराव्यात, वेळकाढू गोष्टी मागवून घ्याव्यात. स्तोम कशाला माजवयाचे ! 
क्वालिटी ला प्राधान्य देऊन आलिया वेळेसी असावे सादर !
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा