सख्खे शेजारी
खूप दिवस मनात होते, जे नात्याचे नव्हते पण रोजच्या सहवासामुळे कळत नकळत ज्यांच्यामुळे माझे आयुष्य सुसह्य, सुकर झाले, त्यांच्याही नकळत, त्यांचे शब्द चित्र रेखाटावे ! ह्यातील सर्वात अगोदर येतात माझे विविध ठिकाणचे शेजारी.आत्तापर्यंत भरपूर राहत्या जागा बदलल्या. त्यामुळे वेगवेगळे शेजारी मिळत गेले, अल्प काळ का होईना पण मोहोर उठवून गेले. सर्व आठवणी अजून ताज्या आहेत.
माझे जन्मस्थान एक सुंदर शेतीप्रधान गाव होते, जेथे घरे लांब लांब असत पण एकमेकांशी रोज संबंध असायचा. तेथे मी अगदीच बालिका असल्याने एवढा संबंध आला नाही त्यांच्याशी पण सर्व गाव आपलाच ही भावना आणि आपुलकी मात्र होती, प्रामुख्याने माझ्या वडिलांच्या जन संपर्कामुळे ! ते तर गावचे सल्लागार च होते.
तेथून शाळेसाठी शहरात आल्यावर घरे एकमेकाला लागून, मध्ये भिंत किंवा बोळ. त्यामुळे चार ही बाजूला शेजारी. समवयस्क मुले, सर्व मध्यम वर्गीय. शाळा मुलींची वेगळी, मुलांची वेगळी. नंतर पाचवी पासून माध्यमिक शाळा सर्वांसाठी एकत्र. बाजूला दोन्ही कडे माझ्याच वर्गातील हुषार मुले, सप्रे आणि नाखरे ह्यांची.
नाखरे पती पत्नी, आम्ही त्यांना आप्पा आणि बाई म्हणायचो, आमच्या समोरच रहायचे. एक बहुरंगी व्यक्तिमत्त्व. त्यांना कोणती कला अवगत नव्हती असे नाही. फोटोग्राफी, चित्रकला, संगीत, अभिनय, पेंटिंग, कित्ती सांगू तेवढे कमीच. मुलामध्ये पण हे सर्व गुण आले. मुले त्या मानाने थोडी भिडस्त आहेत. आप्पा स्पष्टवक्ते होते. शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे. तेवढेच प्रेमळ, सर्वांना मदत करणारे ! धोपेश्वर ची शाळा हे त्यांचे पहिले अपत्य, मग त्यांची दोन सुसंस्कृत मुले ! मानाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला नाकारला त्यांनी ! अवलिया मनुष्य आजूबाजूला जेव्हा सर्व गुरुजन शर्ट पँट मध्ये होते तेव्हा बाई नऊ वारी आणि आप्पा सफेद पांढरा सदरा आणि धोतर अशा वेषात दोघेही धोपेश्र्वर घाटी रोज चढ उतार करायचे ! किती साष्टांग घालायचे या दांपत्याला ! आमच्या सामायिक अंगणात आप्पा मुलांसाठी मस्त गाणी म्हणायचे मोठ्याने. शेपटी वाल्या प्राण्यांची भरली होती सभा हे त्यांचे आवडते गाणे ! आजूबाजूला असलेल्या छोट्या मुलांचे त्यांच्या कळत नकळत फोटो काढणे आलेच. दोन घरामधील अंगण हा त्यांचा स्टुडिओच होता फोटोग्राफी साठी. माझ्या फोटोग्राफी छंदाचा उगम तेथेच झालेला असणार ! बाईनी आप्पा ना पूर्णपणे उत्तम साथ दिली. त्या खूपच गरीब स्वभावाच्या होत्या. कडक आप्पा आणि मऊ स्वभावाच्या त्या, एकदम आदर्श जोडी ! रोज दोघे धोपेश्वर शाळेत रमायचे आणि घरी आल्यावर स्वतःच्या मुलांबरोबर बाकी मुलांचे स्पर्धा परीक्षांसाठी वर्ग घ्यायचे.
थोडीशी शिकलेली पण समंजस आमची आई आणि शिक्षिका नाखरे बाई ह्यांचे चांगले मेतकूट जमायचे. आईचा काही बाबतीत सल्ला घेतांना बाई ना केव्हाही कमी पाणा नाही वाटायचा ! आमची दोन्ही कुटुंबे १५-२० वर्षे अशी छान समोरासमोर प्रेमाने, आपुलकीने राहिली !
त्यांची पुढची पिढी अशीच हुषार, सालस स्वभावाची, प्रेमळ आहे. त्यांचा व्यवसाय आता त्यांचा धाकटा मुलगा यशस्वी रित्या चालवतो आहे.
बापू सप्रे खरे तर ST मध्ये काम करायचे पण त्यांना गणिताची आवड भारी. आपल्या मुला बरोबर मला ही शिकवायचे, त्यामुळे माझा नववी दहावीत गणिताचा चांगला सराव झाला. सुट्टीच्या दिवसात आम्ही दिवसभर पत्ते कुटायचो ! माझा वर्गमित्र आता गणिताचा नावाजलेला प्राध्यापक असून तो ही विद्या दानाचे काम करत असतो. बापू मुलांमध्ये रमायचे. सप्रे वहिनी छान गोऱ्या गोमट्या, लांब शेपटा घालून असायच्या. मोठी मुलगी ही तशीच. कुणाच्या अध्यात मध्यात नाही. लाजाळू चे पान ! ते ST मध्ये नोकरीला असल्याने माझ्या वडिलांच्या मुंबई वारी आकस्मिक तिकिटांची जबाबदारी ते बिन तक्रार पार पाडायचे ! सर्व घरपोच ! असे हे दोन शेजारी आदर्श पालक म्हणून ही लक्षात राहिले
आमच्याच भिंती ला लागून पाघ्ये कुटुंबीय, एकदम धार्मिक. आम्ही मुली कुवारीण म्हणून जायचो त्यांच्याकडे आणि गणपती उत्सवात आरतीला. मस्त मंत्र जागर असायचा त्यांच्याकडे. प्रशस्त घर होते, परस दारी नदी पर्यंत विहीर, झाडे वगैरे. आई नेहमी जायची त्यांच्याकडे काही कार्य किंवा सण असताना मदतीला. मी त्यांच्या प्राजक्ता खाली निरव शांततेत परीक्षा काळात अभ्यास करायची, कारण घरच्या ओटीवर कायम कुणा ना कुणाचा राबता, आईचे चहाचे आधण आणि भाताचे पातेले कायम चुलीवर. फुंक मारून मारून तिची फुफ्फुसे मजबूत झाली असणार ! आम्हाला त्यांचे घर केव्हा परके नाही वाटले. त्यांच्याकडे उडी टाकून जाणे ही कसरत आम्हालाच जमायची. दिब्यांग असलेले काका अतिशय दक्ष असून त्यांना आजूबाजूचे सर्व ज्ञात असायचे, पाऊल कधी चुकले नाही त्यांचे. आणि त्यांचा सखा पोपट, आमचेही प्रेमानें स्वागत करायचा.
बाकी बोळाच्या तोंडाला दिक्षित भटजी आणि शेवटाला माईणकर. हे शेजारी दूध रतीबा पुरते. अजून एक कुळकर्णी होते, त्यांची मुले मोठी असल्याने जास्त काही संबंध नव्हता पण त्यांची धाकटी मुलगी रत्नप्रभा हिचा उल्लेख हवाच. वयाने ज्येष्ठ अशी प्रेमळ प्रभू मला शाळेत जाण्यास उद्युक्त करण्यास कारणीभत ठरली. ठिय्या देऊन बसणाऱ्या मला ती ओढत शाळेत घेऊन जायची पहिले काही दिवस ! आणि तीच मी शाळेत पाहिला क्रमांक घेऊन उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणासाठी मुंबई ला आले. भेटले होते तिला एकदा चर्चगेट ला. खूप प्रेमळ, हसरी आणि हुषार मुलगी.
पाध्ये आणि कुलकर्णी ह्यांच्या मध्ये पाटणकर, पेढी वाले. अत्यंत सुधारणा वादी, सुशिक्षित, सामाजिक भान असलेले कुटुंब. त्यांनाही मुलांची आवड, शिशु विहार चालवायच्या मंगला वहिनी. अर्थात त्यांच्याशी रोजचा काही संबंध यायचा नाही, पण सणासुदीला आवर्जून आम्हा मुलींना बोलवायच्या.
माझी जिवलग मैत्रिण भारती उजव्या हाताला दोन घरे सोडून राहायची, तिच्या बरोबर शाळेत जाणे, home work करणे व संध्याकाळी खेळणे हा दिनक्रम ती मुंबई ला जाई पर्यंत चालू राहिला. मोठ्या आजी आजारी अवस्थेत पलंगावर असल्या तरी आम्हा मुलांशी पाटी वर लिहून संवाद साधायच्या. भारतीचे वडील Dr कुलकर्णी, भाई, शहरातील नावाजलेले आणि निष्णात doctor. पाहताक्षणी रोगाचे निदान त्यांनीच करावे. एकदा मी रस्त्यातून खोकत जात असता मला डांग्या खोकला झालाय सांगून लगेच औषधोपचार सुरू. त्यांच्यामुळे मला माझ्या तब्येतीची काही फिकीर नसे, अगदी त्यांचे अल्पकालिन निधन होईपर्यंत !
त्यांनाही मुलांची खूप आवड आणि लोक सेवेची. त्यांच्या घरात मला मोठमोठ्या दिगज्जांचे दर्शन झाले, नाथ पै, पु ल, नाना गोरे, मधू दंडवते, इत्यादी. आम्ही शाळेत असताना निवडणूक वेळी समाजवादी पक्षाचा छान प्रचार करायचो !
भाई आम्हा मुलांना फोटो काढताना, रविवारचे गाडीतून फिरायला जाताना हमखास बोलवायचे. त्यांच्या घरात त्यांची, भावाची मुले असताना ही ! भिकू काका driver च्या कुटुंबाला ते कायमच मदत करत आले. पंचक्रोशीतले गोरगरीब त्यांना देवा ठिकाणी मानायचे. आपल्या कडे असलेले नसलेल्या ना देणे हा जसा धर्म त्यांचा . काकी नी मला भारती प्रमाणेच प्रेम दिले. मुंबई हून येताना माझ्यासाठी काहीतरी असायचेच स्वतः च्या लेकी सारखे. त्यांच्या साऱ्या परिवाराला माझी ओळख अजूनही आहे. ह्या घराने मला कायम आपुलकी आणि प्रेम दिले आजतागायत. मी त्यांची सदैव ऋणी आहे.
डाव्या हाताला घरातून लांब दिसणारे छायाचे घर. अध्यापनमध्ये दोन्ही पालक. तिची आई आमची इंग्लिश शिक्षिका. सर्व मुली देखण्या आणि एकजात हुषार. त्यांच्याशी अजून ही अधून मधून संपर्क आहे.
अशा शेजाऱ्यामध्ये राहून मी वाढले, कुठेही भेदभाव, नकारार्थी भावना नसायच्या. सर्व गप्पा टप्पा घरासमोरील अंगणात मोठ्याने व्हायच्या, कोणतीही कान फुसी नाही !
मुंबईत एका भिंतीचे दुसरीला समजत नाही, येथे भिंती, दरवाजे नावालाच असायचे. सताड उघडे दिवसभर. रात्री आडकाठी लावली जायची, कोणी जनावर वगैरे येऊ नये म्हणून असावे ते ही. कारण माणूस आला तर आमच्याकडे त्याला कायम आसराच असायचा. आम्ही गाव सोडून आलो तरी आमच्या ओटी वर कायम तिकडील शेतकरी, शहरातील दवाखान्यात उपचाराला आलेल्या आजारी व्यक्ती, पंचक्रोशी मधून तालुक्याच्या ठिकाणी कामाला आलेले लोक ह्या सर्वांचे येणे जाणे असायचे. त्यांना लोक का म्हणायचे प्रश्नच पडायचा ! आजारी मनुष्य बरा होऊनच जायचा. आई चहा, भाताचे आधण कायम चुलीवर ठेउन असायची. तिचा गोठा, म्हशी, भाचे, पुतणे, पुतण्या, कधी मधी शिक्षणाला राहिलेली गावाकडील मुले हे सर्व सांभाळणे वेगळेच. आजूबाजूच्या शहरी घरांपेक्षा आमचे घर खूप वेगळे होते. घर आपलेच आहे, केव्हाही या, जा हा रिवाज सर्वांना नवीन होता, त्यांना त्यात कुतूहल, गंमत ही वाटत असावी. पण कोणाचीही केव्हाही तक्रार नाही, घरातले लोकांकरिता झालेले वाद विवाद ऐकून त्यावर फालतू चर्चा नाही. आई घराला जुंपलेली वात्सल्य मूर्ती , वडील टोपी, shirt, धोतर नेसणारे, शिस्तीचे, दोघांना यथोचित प्रेम आणि सन्मान च मिळाला येथेही. शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेले आमचे कुटुंब ओळखी तील मुंबईत स्थायिक झालेल्या दीक्षितांच्या घरात भाडे देऊन वीस वर्षाहून अधिक राहिले आणि सर्वातून निवृत्त. होऊन मुंबई ला स्थायिक झाले ! माझे आजोबा पणजोबा गिरगावात रहायचे म्हणे आणि माझे आई वडील डोंबिवली ला राहायला आले.
माझे शालेय जीवन हिंडणे, मैत्रिणी त रमणे, खेळणे, वडिलांबरोबर बाजारहाट करणे, त्यांच्या कामा निमित्त नदी पल्याड जाणे ह्यात गेले. माझा अभ्यास म्हणजे शाळेत पूर्ण लक्ष देणे, दिलेला गृहपाठ शाळा सुटल्यावर लगेच करून मोकळे होणे, परीक्षेच्या वेळी पाठ्यपुस्तकातील सर्व धडे दोनदा वाचून महत्वाचे लक्षात ठेवणे, बास! एवढाच असायचा ! बाकी वेळ, टायपिंग, विविध स्पर्धा, वाचनालयात अधाशी प्रमाणे तासन् तास वाचणे यात जायचा ! असे आमचे लहानपणीचे शेजारी कायम लक्षात राहणारे !
मुंबई
राजापूर हून मुंबई हे मोठे स्थित्यंतर होते. अफाट लोकसंख्या, लागून इमारती, सर्व धर्मीय, प्रांतीय शेजारी. तरीही माझा प्रवास महाराष्ट्रीय वसाहती मध्येच प्रभादेवी, माहीम, पार्ले, बोरिवली, डोंबिवली, ठाकुर्ली, मुलुंड, ठाणे, सायन, दादर इत्यादी ठिकाणी भटक्या जमाती प्रमाणे झाला ! नवनवीन शेजारी. Mhb वसाहतीत तर एकाची मुले घरा समोरच विधी करायची. केव्हा समोरच्या घरात कोणी दरवाजा बंद होऊन अडकले असेल तर लांबूनच खाणाखुणा करून त्याला सोडवायचे ! रात्रीचे गरबे असायचे. एवढ्याशा खोलीत एकत्र कुटुंबे राहायची दाटीवाटीने, आम्हीही ! तेथे रात्र मोजून चार तास असायची, परत कष्टाचा दिवस सुरू अख्या वसाहती चा . सर्वच शेजारी, एकमेकाला मदत करणारे, ओळख असण्याची ही जरुरी नसायची. कॉलनी सर्वांची ! एकंदरीत ते ही जीवन अनुभवले.
बोरिवली ला सर्व शेजारी एकमेकाला धरून, कुटुंबे साथ देणारी. मी उपरी असले तरी कोणीही तसे जाणवू दिले नाही, अशी आपुलकी. डोंबिवली ला सहकारी वर्ग वेळेला धाऊन येणारा ! शेजारी दोन्ही जोशी, अल्प कालावधीत त्यांच्याशी ही आई वडिलांची छान गट्टी जमली. त्यांच्यावर जशी जबाबदारी टाकून मी मुलुंड ला राहायला आले.
वडील गेले तेव्हा हेच शेजारी घरच्या सारखे वाटले. सर्वांनी रजा घेऊन आम्हाला मदत केली, त्यांना साश्रू निरोप दिला, ह्याहून अजून कोणते माझे भाग्य ? मी त्यांची कायमची ऋणी . ठाकुर्ली मुलुंड ला जास्त घरोबा कुणाशी झाला नाही कारण वास्तव्य वर्षभर ही नव्हते. ठाण्याला मात्र आमचे एकदम घरगुती संबंध प्रस्थापित झाले. एका बाजुला साळकर लहान कुटुंब आणि दुसरीकडे भांडारे एकत्र कुटुंब. दोन्ही कडे ज्येष्ठ पिढी व मुले. एका च्या घरात खुट झाले तर दुसरा विचारणार काय झाले ? असे असल्याने घरी आजी, पणजी असतानाही मी निश्चिंत दिवसभर ऑफिस ला जात होते. लक्ष ठेवा वगैरे काही न सांगताच खिडकीतून सर्व आलबेल आहे ना हे आमचे दोन्ही शेजारी पाहायचे. केवढे हे न मागता लाभलेले भाग्य ! माझ्याकडून ह्या दोन्ही कुटुंबांना तसे म्हटले तर काहीच मदत होत नव्हती, तरीही आपली जबाबदारी मानून हे शेजारी घरचे काका काकी झाले होते.
तेथून सायन ला आल्यावर अल्पकाळ का असेना पाने बाजूचे दोन शेजारी , एक ख्रिश्चन शिक्षिका आणि समोर राहणारे दोन तरुण डॉक्टर ह्यांनी आमच्या लहान मुलांना जरुरी तेव्हा मदतच केली. २००५ च्या मुंबई च्या महापूर प्रसंगी आमचे वास्तव्य तेथेच होते. तेव्हा परधर्मीय पर प्रांतीय असा कोणताही भेदभाव न दिसता माणुसकीचेच दर्शन झाले.
आणि आता सध्याचे वास्तव्य गेले १७-१८ वर्षे. अगदी गिरगावातील चाळी ची आठवण करून देणारे. नव्या जुन्या रहिवाशांचे मिश्रण पण चपखल एकमेकात सामावलेले. शेजारी परांजपे. आम्हाला शेजारी चांगले मिळाले म्हणून आम्हालाच नावाजणारे ! यशस्वी नोकरी निवृत्ती नंतर लाफ्टर क्लब ला जाऊन , तेथे वेगवेगळ्या कला सादर करून, मुला नातवंडांना सांभाळून भजन छंदात रमणाऱ्या संध्या ताई आणि त्यांना समर्पक साथ देणारे काका. मुले हुषार, प्रेमळ. आम्हाला त्यांची सदैव जाग आणि सोबत. त्यांची मुले, नातवंडे लांब राहत असली तरीही ओळख ठेऊन सदाचारी आहेत. तरुणी, ज्येष्ठ अशा आम्ही सर्व गच्चीत किंवा घरी वेगवेगळे उपक्रम राबवतो. तेथे पिढी. मधील अंतर जाणवत च नाही एवढे सर्व एकमेकींना सांभाळून घेतात. इथे मला माझे लहानपण चेच दिवस आठवतात, मैत्रिणींबरोबर मजा करण्याचे !
असे हे आमचे विविध शेजारी, सोबती. नात्या पेक्षाही गरजेला सर्वात अगोदर धाऊन येणारे. गंमत म्हणजे आम्ही नोकरी निमित्त दिवसभर घराबाहेर असूनही ह्या सर्व ठिकाणी शेजाऱ्यांच्या चाव्या आमच्याकडे आणि
आमच्या सुखी संसाराच्या चाव्यांचे एक टोक त्यांच्याकडे !
निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात आणि हे मी आवर्जून माझ्या कार्यालयात पण सांगायची की बाबांनो, माझ्या चुका मला दाखवून द्या, त्याशिवाय माझी प्रगती नाही.. परंतु ह्या माझ्या शेजाऱ्यांनी केव्हा आमची निंदा केल्याचे ऐकिवात नाही अजून तरी !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा