गच्ची
पूर्वीच्या काळी उंच मजल्यावर राहणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जायचे, आत्ताही तसेच आहे, पण आता मोठमोठे टॉवर्स आहेत. जिने चढावे लागत नाहीत. तर कोकणात दुमजली, तीन मजली घरे असायची. आमच्या घरासमोर बंगला आणि त्यात गच्ची होती, तिचे अप्रूप राहिले नेहमी. मुंबईत ला आल्यावर तिसरे, चौथे मजले राहून झाले. गॅलरी मिळत गेल्या पण गच्ची ची मजा काही न्यारी असायची. इमारती मधील सर्व रहिवासी एकत्र येणे, काही कार्यक्रम करणे हे शक्य होते. ठाण्याला असताना आम्ही फक्त एकदा वार्षिक कार्यक्रम करायचो, गच्चीत.
दादर मधील आमच्या इमारतीला छान लांब लचक गच्ची लाभली आहे. वर्षातून एकदा संमेलन किंवा personal पार्टी साठी तिचा वापर होऊ लागला. हळूहळू सर्व जण, स्त्री वर्ग प्रामुख्याने, नोकरी धंद्यातून थोडे मोकळे होऊन भिशी, हळदी कुंकू, राष्ट्रीय सण, कोजागिरी असे कार्यक्रम आम्ही करू लागलो. इमारतीतील महिला वर्गाला एकत्र येऊन रिचार्ज होण्याचे आमची गच्ची हे प्रमुख स्थान ठरले.
गच्ची चा उपयोग वैयक्तिकरित्या मी बराच केला असे मला वाटते. मला चालायला खूप आवडते. Covid काळात अगदी पंचाईत झाली, कुठे जाता येईना, भीती पोटी. मग गच्चीच आली कामाला ! आमच्या समोरच एक बंगला आहे, ती सुद्धा गच्ची छान सजवून बाग, व्यायाम, भोजन, गप्पा अशासाठी वापरली जाते ते पाहून प्रेरणा मिळते.
आमच्या इमारती च्या गच्चीत काय काय गुजगोष्टी केल्या मी सकाळ संध्याकाळ.. किती पक्ष्यांचे दिनक्रम पाहिले, त्यांचा नियमित वावर मनाला उभारी द्यायचा. त्यांचे उडणे एकदम प्रेरणा दायी. पंखात हवा भरून घ्यायची मग थोडा विहार करायचा, पुन्हा थोडे पंख मारून हवा भरून घ्यायची पुन्हा तयार एका लयीत प्रवास करायला ! एकेक समूह जेव्हां एखाद्या इमारती भोवती फेर धरून मुक्त मौज करतो तोही खूप आल्हाद दायक. असे recharge होणे आपल्याला ही जमले पाहिजे ह्याची जाणीव झाली. ते अचानक इकडून तिकडे समूहाने जायला लागल्यावर समजावे त्यांना कोणत्या तरी संकटाची चाहूल लागली आहे किंवा कोठेतरी खाद्याचा साठा उपलब्ध झाला आहे ! पक्ष्यांना वातावरणातील बदल सर्वात अधिक समजतात असे आढलून आले आहे. . एवढेसे पक्षी आकाशात विहार करताहेत आणि आपण मानव, शिकले सवरलेले, छोट्या छोट्या गोष्टींनी खाली बसतो ह्याचे वैषम्य ही वाटायचे.
पोपट, कबुतरे, चिमण्या, कावळे, कोकिळा, सर्व संध्याकाळचे गच्चीतून स्वच्छंद फिरताना दिसले. कावळ्यांच्या तर नेहमी सभाच भरायच्या, त्यातून माझ्यासारखी ला शब्द धुमारे नाही फुटले तर नवलच !
कबुतरांचे प्रणयाराधन गच्चीच्या कठड्यावर नेहमीच चालू असते, पण एकदम शिस्तशीर ! मादी लगेच राजी नाही झाली तर नर अगदी सहनशीलता ठेवून असतो ! मादी पण स्वतःचे लाड पुरवून घेते ! मध्येच सफेद बगळे ठराविक मोसमात हजेरी लावून जातात, जास्त करून संध्याकाळचे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जाताना दिसतात. छान वाटते, नेहमी जोडीने असतात.
आकाश.. किती रंग दाखवावे त्याने. किती छटा, सुख दुःखाच्या.. उगवती, मावळती पाहणे अतिशय नयन रम्य.
पांढरे, काळे, राखाडी, निळे, जांभळे अशा विविध छटा पाहून मन पण वेगवेगळ्या भावनेने, आठवणींनी व्यापून जायचे. कधी काळी आकाशाचे भव्य स्वरूप पाहून मन ठेंगणे व्हावे, सूर्याची प्रखर ताकद, चंद्राची नाजूक शांत,
दर दिवशी वाढणारी मूर्ती, ढगांचे विविध आकार, त्यातून
भासणाऱ्या आकृती आणि सुचलेल्या कवी कल्पना, किती मनमुराद आस्वाद घेतला आहे ह्या सर्वांचा मी. माझा फोटो काढण्याचा छंद ही पुरवला गेला. रोज एक तरी फोटो काढतच होते, एवढी वैविधता ! थोडासा शिडकावा पडून गेल्यावर दिसलेली इंद्रधनुष्य थेट बालपणात घेऊन जायची श्रावण मासी कविता म्हणायला !
रात्रीच्या लुकलुक करणाऱ्या चांदण्या आकाशाचे स्टेज कसे सजवून टाकायच्या ! शुक्र आणि बुध स्वतः चे आगळे स्वरूप दाखवणारे ! ग्रहणे मात्र जास्त पाहिली नाही गच्ची तून कारण घरातूनच क्वचित दिसत असत.
आणि ह्या सर्वांना साजेशी तिन्ही सांजेला चमचम करत आपापल्या मुक्कामाला निघालेली विमाने, अहाहा ! काय देखावा असतो आकाशात. आपल्याला ही आपल्या मनीच्या रम्य ठिकाणी घेऊन जातो.
आम्ही आमची गच्ची covid काळात वापरली ते पाहून कदाचित आजूबाजूच्या रहिवाशांनी आपापल्या गच्च्या साफ करून घेतल्या. कोणी झाडे लावली, मुले खेळायला लागली, कपडे वाळत घातले गेले आणि ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळचा एक विरंगुळा झाला. तरुण रहिवासी पण थोडे हवा खायला येऊ लागले. आजूबाजूच्या इमारतीतील बगीचे पाहूनही मन खुलून जाते. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे !! खरेच अशी प्रेरणा घेऊन सारे सुखी शांत जीवन जगायला मदत करतील तर ते जीवन किती समृद्ध होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा