मंगळवार, १६ जुलै, २०२४

 मैदान 


 मैदान मला नेहमीच खुणावत राहिले. 

शाळेचे मैदान खूप भव्य होते आणि मला कवायत ही खूप आवडायची. PT च्या विषयातील उंच उडी जास्त आवडायची, उंच होण्याचे स्वप्न असे प्रदर्शित व्हायचे ! 
भारती मुळे उशीर झाला कि मैदानाला दोन फेऱ्या मारणे ठरलेले असायचे, पण त्यात ही गंमत वाटायची, पुन्हा उशीर नाही करायचा वगैरे दोघींना ही वाटत नसावे असे वाटते ! कबड्डी हा आवडता खेळ, volley ball ची शाळेची टीम होती. Team मध्ये नव्हते पण चार पाच वेळेला नेट वरून ball घालवल्याचे लक्षात आहे. अर्थात खेळात कोठेही चमकले नाही. मे  महिन्यात लगोरी, पत्ते व इतर सर्व सुट्टी तील खेळ मात्र भरपूर खेळले आहे, त्याला कुणाची ना नसायची ! 
घरून पुस्तकी अभ्यास करण्यावर जास्त भर असायचा. मला NCC ला जायची खूप इच्छा होती पण घरून विरोध. बरे मी काही अभ्यास सोडून देणार नव्हते पण माझ्या वडिलांना माझ्या क्षमतेची कल्पना असणार ! 
तर अशी माझी  मैदानाशी गट्टी आणि काही अतृप्त इच्छा ! 

पुढे मुंबईला आल्यावर लक्षात आले इथे भरपूर मैदाने आहेत, धावायला, खेळायला, कर्तुत्व दाखवायला ; मात्र ती लांब लांब  खुणावत रहायची येथे ही. कुणीही यावे खेळावे अशी मैदाने नव्हतीच ती ! प्रचंड लोकसंख्या, जीवघेणी स्पर्धा ह्या सर्वातून ताऊन सुलाखून निघालात तर मैदान तुम्हाला खुले.. मग मी माझ्या एकंदरीत परिस्थितीला साजेशी मैदाने निवडली. थोडीफार न्याहाळून घेतली लांबून. कधी काळी जमल्यास तेथे डोकावयाला..
तर मुंबई ला येऊन सर्वात महत्वाचे, गरजेचे नोकरीचे मैदान काबीज केले. College चालू होतेच. वेळ मिळेल तेव्हा भारती बरोबर ज्युडो शिकले, ज्ञाना पुरते. संवादिनी ही.
पुढे पुढे मैदानात स्पर्धा दिसू लागल्यावर अजून शिकण्याची उर्मी आली. शिक्षणाचे मैदान हे केव्हाही अमर्याद. शिकावे तेवढे कमी. नोकरी साठी लागणारे छोटे छोटे courses ही केले. पुढे जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले, तेव्हा ह्या courses ना महत्व उरले नाही. तरी  cv मध्ये लिहायला कामी आले.
शिक्षण, नोकरी करत निसर्गाची ओढ लागली. ती भागवली. ते ही मैदान अतिशय सुरेख. तेथे मात्र जराही स्पर्धा नसायची. सर्वजण छांदिष्ट, प्रसन्न मनाने निसर्गात रमायचे. दोन तीन वर्षे मनमुराद trekking केले. Recharge होत गेले. हळूहळू घरून विवाहासाठी दबाव येऊ लागला. तो ही आखाडा महत्वाचा ! जमेल तर खेळायचे नाहीतर सोडून द्यायचे असे  आत्ता सारखे दिवस नव्हते ते ! सर्व काही विश्र्वास आणि नशीब ह्या दोन गोष्टींवर विसंबून चालायचे. 
झाले, विवाह ठरला, झाला आणि प्रचंड मोठ्ठे मैदान समोर आले, केव्हाही न कल्पिलेले, न पाहिलेले ! तेथेही स्पर्धक नसले तरी प्रेक्षक मात्र भरपूर, अगणित!  सुरुवातीला भीड बाळगली. पुढे पुढे ती कमी झाली आणि सर्व खेळ मस्त वेगात चालू राहिले. मुले मोठी झाल्यावर carrom, बॅडमिंटनही खेळले त्यांच्या सरावासाठी. त्यातून ही खूप शिकता येते. 

आयुष्यभराचा खेळ, तुम्ही खेळाल तसा. नियम, बंधने तुम्ही पाळलीत तर, नाहीतर हवे झुगारून द्यायचे धारिष्ट्य. मला धारिष्ट्य ही नव्हते, तशी बंधने ही नव्हती. एकंदरीत माझ्यासाठी खेळ खेळत राहिले, मनमुराद. दमले ही खूप वेळेला तरी time please म्हणायची सोय नव्हती, शक्यच नव्हते. Show must go on ! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा