बुधवार, २७ मार्च, २०१३

कविता !


कविता गरीब, गाणे श्रिमंत
कविता मनात, गाणे जनात
कविता उपकृत, गाणे सुश्रूत

कविता लाजवंती, गाणे स्मार्ट
कविता अबोल, गाणे  बोलके, 
कविता  भाऊक,गाणे बौद्धिक

कविता तरल, गाणे सुरेल
कविता संक्षिप्त,गाणे आलापी
कविता सरळ, गाणे लयबद्ध

कविता फ़ुलते, गाणे झुलविते
कविता गहिवरते, गाणे रडविते
कविता प्रसव, गाणे संगोपन

कविता निरागस, गाणे जोरकस
कविता माझी,तुझी, एकेकाची,
                    गाणे जनाचे, सर्वांचे !

अलका काटदरे/२१.३.२०१३

गुरुवार, ७ मार्च, २०१३

अशीच मी मरणार नाही !



थिल्लर मी कधीच नव्हते
चिल्लर तर नाहीच नाही
किलर  बाणा  आहे माझा
मौनव्रत घेईन पण
  शांत काही बसणार नाही

नमेन मी आदराने
नटेन मी  संस्काराने
लाजेन मी प्रेमाने

गाईन मी गौरव गीत
नाचेन मी डौलाची रीत
खेळेन मी नीतिने धीट

सोसेन मी काबाडकष्ट
झिजेन मी चंदनाक्षत 
धावेन मी बिबल्यागत

चिडेन मी अन्याये
रडेन मी परदु:खे
संपवेन मी कुकर्मे

घाबरट मी कधीच नव्हते
शेळपट तर नाहीच नाही
कात टाकेन पण
    अशीच मी  मरणार नाही!
****

शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१३

छोटासा


धो धो धबधबा नसला तरी चालेल
छोटासा झरा मात्र जरूर हवा
माणूसकीचा
स्वास्थ्याचा
समाधानाचा
लखलखता झगमगाट नसला तरी चालेल
छोटासा दिवा मात्र जरूर हवा
शांतपणे तेवणारा
दिशा दाखवणारा
अंधाराला झाकणारा
दैदिप्यमान नजराणा नसला तरी चालेल
छोटासा प्रसाद मात्र जरूर हवा
प्रामाणिकपणाचा
विवेकाचा
कष्टाचा.
प्रशस्त मोठा महाल नसला तरी चालेल
छोटासा कोपरा मात्र जरूर हवा
प्रेमसाफल्याचा
मनोमिलनाचा
ऋणानुबंधाचा..
(added last stanza- modified).

पाऊस माझ्या पाचवीला पुजलेला


अलका_काटदरे | 14 September, 2009 - 11:19
पाऊस माझ्या
पाचवीला पुजलेला
घरात काही नाही
ओली बाळंतीण, ओली मने
होते हाताशी पेरायला
एकच बीज- सुविचाराचे..
तेव्हापासून पाऊस
साथ माझी सोडत नाही
पिच्छा मी त्याला म्हणत नाही
इच्छा त्याला टाळायची होत नाही
घराबाहेर पडले की हा बरोबर
ओलीचिंब करायला
सुविचाराचे बीज वाढवून
सदाचार फुलवायला
पाचवीला माझ्या
पाऊस पुजलेला ..

जप


वाल्याचा झाले वाल्मिकी
तू पण जप कर की
जप कर सत्याचा
मंत्र जप अहिंसेचा
ध्यान लाव ध्यासावर
भक्ति कर सत्वावर
नारायणांचे झाले संत रामदास
तू पण लाव गुणांची रास
लागवड कर सुविचारांची
फळे मिळतील सुसंस्कृतीची
नरेंद्रचे झाले स्वामी विवेकानंद
तू पण चिंतन कर अखंड
रास लाव सदगुणांची
कदर होईल तुझ्या हिंमतीची
नाहीच काही जमलं तर
तू जा की-
जंगलात तू जा की--

सलाम


विटेवर विटा रचिल्या त्यांनी
केला भक्कम पाया
रात्रीचा दिवस केला त्यांनी
नसे जिवाला थारा
एकावरी एक आव्हाने झेलली त्यांनी
काढायला निपटून गाळ सारा
थंडी नाही, पाऊस नाही
सगळाच कडक उन्हाळा
मी नाही, तू नाही,
"आम्ही" म्हटले त्यांनी
झुंजार वृत्तीने आपुल्या,
दाविला शत्रुला दरारा
केला आपुला भारत
खरंच महान ज्यांनी
विनम्र होऊन ध्येयपूर्तीसाठी त्यांच्या
झटूया हा एकच, असू दे नारा !

इंच इंच लढवू....


(५ सप्टेंबर- शि़क्षक दिनानिमित्त)
इंच इंच लढवू, आम्ही इंच इंच लढवू....
पुरातन काळी पुण्य वाढले
स्वर्गामधील आसन पडे तोकडे
देवांनी ठरविले, याना पृथ्वीवर धाडू
देवपण म्हणती, आम्ही इंच इंच लढवू....
पिढीजात आम्ही सारे शि़क्षक
पिढ्यानपिढ्या आमची एकच जात
एकच ऊर्मी एकच इर्षा या अंतरात
आम्ही पसापसाभर देऊ
शिक्षक म्हणती, आम्ही क्षणनक्षण लढवू...
आम्ही सुसंस्कृत सु़जाण पालक
करू मुलांना सुसज्ज अन लायक
त्यांच्यासाठी हे सुंदर विश्व बनवू
पालक म्हणती, आम्ही कणन कण झिजवू.......
शाळांमधूनी स्वप्ने साकारती
मुले वाट धरती परंपरेची
पूर्वजांसाठी सर्वस्व पणाला लावू
मुले म्हणती, आम्ही यशशिखर लढवू......
आम्ही इंच इंच लढवू....