शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१३

क्रिकेट...


(' दत्ताची पालखी '' या चालीने चाललेली बालकविता)
निघालो आई मी खेळाया क्रिकेट....
क्रिकेट, क्रिकेट, माझा आवडता क्रिकेट
मिळे मला स्वास्थ्य, नसे कसलिही कटकट
तेथे मला माझे सारे, मित्र भेटती थेट
एकमेका सांगू आम्ही, रोजरोजची सिक्रेट
निघालो, निघालो, आई मी सरावाला निघालो,
निघालो आई मी खेळाया क्रिकेट !!
क्रिकेट, क्रिकेट, जगभर खेळतात क्रिकेट
तुला मात्र वाटते आई, वेळ चालला फुकट
असं काही नाही आई, एकिने येऊ आम्ही निकट
मेहनत करू आम्ही, संकटे साराया बिकट
निघालो, निघालो, आई मी धावाया निघालो,
निघालो आई मी खेळाया क्रिकेट !!
आई मी निघतो आता, नाहीतर जाईल माझी विकेट
मित्र मला चिडवतील, सगळीकडून भरपेट
उभा करतील मला, धरूनिया नेट
आई नको ग बिघडवू, आमचा सारा सेट
निघालो, निघालो, आई मी खेळाया निघालो
निघालो आई मी खेळाया क्रिकेट !!

धरणी झाली तरणी ...



आला रे आला पाऊस आला
वर्षभराचे हितगुज करायला
आला रे आला मला तो भेटायला
घेऊन आला तो बरोबर वार्‍याला
उन्हाच्या झळी सार्‍या शमवायला
नजरेतले सारे भाव टिपायला
भाव माझे पाहून थोडा ओशाळला
पाया पडून माझ्या, क्षमाचार केला
ऊशीर नाही करणार, जास्त नाही थांबणार
शिस्तीत तुझ्या राहणार, विनवता झाला
झाडाना सार्‍या सलाम त्याने केला
बाळांवर प्रेमवर्षाव अमाप त्याने केला
दिवसांचे सार्‍या सोने त्याने केले
गतकालिन पाप धुऊन सारे नेले
वाट पाहून थकल्यावर मी तो आला..
तरणी करून मला, न सांगता तो गेला !

वर्षाराणी


वर्षाराणी

हासत नाचत आली वर्षाराणी
लुटूपुटू पावले टाकीत, दुडूदुडू धावत
विशाल गगनाचे पितृवत छत्र
विशाल धरतीचे नातीवर नेत्र
लठ्ठ काळे मेघ जसे अंगरक्षक
बिजली, दाई, तिला दावी मशाल
विदूषक मेघांचे काम रिझवण्याचे
स्वगडगडाटाने हसवून लाड करण्याचे
चालता चालता धावू लागली राणी
अंगरक्षकांच्या तोंडचे पळाले पाणी
पकडतांना तिला देऊ लागले ते भयानक टक्कर
घेऊनी हाती मशाल बिजली टाकू लागली चक्कर
पण राणीला लागलेली आजीला भेटण्याची आंस
भेटल्या दोघी आणि चढली गोष्टींची रास !
(संदर्भ -जुनी वही . दहावी-अकरावी दरम्यान लिहिलेली, म्हणूनही बालकविता! )

जगून घे जरा..


जगून घे जरा  म्हटले स्वत:ला
आणि निघाले माझे मन फ़िरायला

नदीच्या काठी, झाडाच्या पायथ्याशी
पाय सोडून पाण्यात, गाणे एक मनात

जगून घे  जरा म्हटले स्वत:ला
पण सावरले लगेच मी माझ्या  मनाला

पाहिले आहे का कुठे स्वच्छ हवा
आहे का मोकळी अन  सुरक्षि्त  जागा

प्रदुषणविरहीत, सुगंधित
मानवी नात्यानी नटलेली

कुणा एकाचा हक्क नसलेली
सगळ्य़ानी मिळून सजलेली

एकेक क्षणाने  मोहरलेली
जगण्याला साज देणारी 

बसले मी होते तेथेच अशा विचारात
ठरवले, नाही राहायचे अशा शोधात

आनंद पसरवायचा सर्व गप्पात
जिणं  दुसऱ्याचे  करायचे आरामात 

चालायचे मान वर करून
रस्त्यावरील खाचखळगे बाजून सारून

खायचे अगोदर सर्वाना  देऊन
शिकाऱ्याला त्याची जागा दाऊन

नटायचे अस्मितेचे दागिने घालून
शिकायचे एकीचे मंत्र पाळून

जीव दिला एकाला तर जीव माझा भला
माणुसकी नाही तर मी मानव कशाला

जगून  घे भरपूर, म्ह्टले माझ्या सखीला
घाबरू नकॊ जराही आहे  मी साथीला

-  अलका काटदरे
  ८-१-२०१३

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

मैत्र

मैत्री - एक लहानसा शब्द, पण खूप मोलाचा.
आयुष्यात सारे काही आहे आणि तुमची कुणाशी मैत्रीच नाही
मग तुम्ही अगदीच भणंग. वाचायला खूप जड जातय ना?
खरेच मैत्रीचे मोलच तेवढे आहे. 

माझ्यापासून पाहायचे झाल्यास मला खूप मैत्रिणी आहेत,
प्रकारही खूप त्यांचे. शाळेतील, कार्यालयीन, प्रवासातील,
कॊलेजमधील, नातेवाईक. हॊ, नातेवाईक मधुन पण
एक मैत्री होऊ शकते- नि:पक्ष, नि:स्वर्थी! 

या सर्वांमधून खोलवर पाहता, मला सर्वात जवळची
वाटते ती माझी पुस्तकांशी मैत्री. स्तंभित व्हाल आपण
हे वाचून. शाळेत कायम मैत्रिणींच्या गराड्यात राहूनही
कसे माहीत नाही, पण ह्या पुस्तकानी मात्र मन प्रचंड
आकर्षित करून घेतले. आमच्या घराजवळच एक सुंदर
वाचनालय होते. पुस्तके नाना तर्हेची भरगच्च. वेळ 
भरपूर. असे सर्व असता, सहवासाने प्रेम न वाढले तरच
नवल! घरूनही पूर्ण पाठींबा! मग काय! अगदी दिलखुलास
गप्पा मारुन घेतल्या, शाळेच्या दिवसात. कधी 
विसंशी, कधी सुमतीजींशी तर कधी राजाकाकांशी. लहान
वयात त्यांच्याकडून मी खूप काही शिकले. काही विचार
पक्के झाले, काही संकल्पना तयार झाल्या. स्वप्ने तर
विचारू नका, किती रंगवली- सर्व ह्या पुस्तकांच्या मदतीने!
आणि मग हा छंदच लागला, वाचायचा. पुस्तकांच्या शोधात
नंतर निघतच राहिले, वेगवेगळ्या ठीकाणी! वेगवेगळ्या
भाषेत!

हळूहळु मैत्री विस्तारत गेली. विषयही बदलत गेले. कधी
प्रेमाचे, कधी अध्यात्मिक तर कधी मौलिक- सर्वच बाबतीत!
वेगवेगळ्या पुस्तकातून शब्दांचे बारकावे लक्षात आले.
त्यातून परिक्षण ही करता आले- चांगल्या वाईटाचे.


वेळेचे बंधन नाही, अवाजवी खर्च नाही. आपल्या आवडी
जपून आपल्यावर कॊणतेही बंधन न घालणारा हा छंद.
नव्या पुस्तकाची चाहूल लागताच माझी होणारी तारांबळ,
आता केव्हा हे वाचायचे आणि ती हुरहूर!  हा सर्व आनंद
घेत असता हे ही लक्षात  आले की ह्या पुस्तकानी मला
खूप दूरवर फ़िरून आणलय, आदरणीय व्यक्तींच्या
जीवनात डोकावयला दिलय, त्यांचे विचार अनुसरायला दिलेत,
केव्हा तर माझ्या लहानसहान प्रश्णाना सुमुपदेश ही केलाय,
माझे जीवन सम्रुद्ध केलय.  ही मैत्री मी वेळोवेळी
वाटतही गेलेय. एक निरिक्षण  असे आहे की एकलकोंडी व्यक्ती
पुस्तकात जास्त रमते.  मी माणसांच्या रगाड्यात असूनही
पुस्तकात रमते- ते  माझे जग आहे. आणि मला हेही माहीत
आहे की आजूबाजूला कॊण नसेल तेव्हा ही पुस्तकेच आमची
मैत्री जपणार आहेत! पुस्तकांशी आणि त्यातील विविधरंगी शब्दांशी
असलेली ही मैत्री हा माझा छंद केवळ छंद न राहता, एक रम्य पसारा
बनून राहिला आहे आणि ह्या माझ्या जीवनातील अविभाज्य 
पसा॓याची  मी तितक्याच निगुतीने जपणूक  करणार आहे, ह्यात
शंकाच नाही!

माझी आणि आपलीही पुस्तकांशी, पर्यायाने शब्दांशी - -आजच्या 
ई युगात-- असलेली मैत्री अशीच दिवसेंदिवस व्रुद्धींगत होवो हीच सदिच्छा! 

नको वेदने तू





नको वेदने तू जवळ नको येऊ
आसमन्ती राहा, आठवण ठेऊ!

तुझे दु:ख मोठे करिशी हलके
आम्हा  पामरा नाही, येई सोसू

आली होतीस एकदा, घेऊन सगळे गेलीस
कुणाच्या दारी जाऊन असे नको छळू

करुणा माया सर्व,  जिवंत आम्ही ठेऊ
दुरुनच पहा सर्व मिळून चालू

वचन देतो तुला भावना जपू 
परदु:खी जीवे,  तुझे मोल जाणू

म्हणून  सांगते वेदने, दारीच राहा
डोकावून पहा आम्हा,  सुखी संसारा

नको ती निर्मिती, नको ते सोसणे
आहे ते पुरे आहे, नको ते बोलावणे

माफ़ी मागते तुझी, उजळून गेले जरी
व्र्ण अजून ताजे असती, नको पुन्हा येऊ

नको वेदने, तू....

-अलका काटदरे.


"पानावरच्या दवबिंदूपरी…"

पानावरच्या दवबिन्दूपरी
असते खरेच का आयुढ्यदरी
खोल खोल भावनांनी भरलेली
उंच उंच स्वप्नानी पांघरलेली

सुगंधी वार्य़ाबरोबर ताठ उभारलेली
उन्हा पावसात आसरा देणारी
लांब रुंद आठवणीने थिबकलेली
हवीहवीशी वाटणारी, गूढ नगरी
पानावरच्या दवबिंदुपरी भासते क्षणभर
श्रध्देच्या पायावर मात्र विसावते अंगभर
अलगद, तरल, निर्मळ, मोहक
.... पानावरच्या दवबिंदुपरी
पाय सटकला जरा मात्र, मोहापायी
हीच दरी वागे दवबिंदुपरी
............पानावरच्या दवबिंदुपरी..

- अलका काटदरे