aala divas aapala
सध्या रोज तुझाच विषय असतो
केव्हा येशील, कसा येशील
सांगून का अचानक
लोकांचे अनुभव, स्वतः च्या मर्यादा
इच्छा आकांक्षा, चितारलेली स्वप्ने
मग हळूहळू सगळ्याला मुरड
आणि फक्त आला दिवस आपला !
आवरा आवर, भेटी गाठी
अर्धवट राहिलेली कामे
सगळ्याला तसा वेगच आला
एकेका क्षणाचे महत्त्व
अचानक जास्तच मनी रुजले
अभिमान सारे गळून पडले
राहिली फक्त कृतज्ञता
तू तू मी मी कोठेच गेले
संस्कार सारे कामी आले
विचार पडला सर्वांचा
आपुल्या पश्चात काळजीचा
तू अटळ आहेस माहित असले तरी
आमचे स्वातंत्र्य अबाधित होते
उद्याचे मनोरे रचले जात होते रे !
तसा तू सांगोपांग विचार करशील च
ये केव्हाही, माझ्या तारखेला मी हजर आहे !
दिनदर्शिका तुझी पडताळून पहा मात्र !
थोडी विश्रांती घेतलीस तर तुलाही बरे !!
घेशील ना ??
अलका काटदरे /२४.१२.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा