गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 तिचे काय चालू आहे !



ती काय करतेय
सर्वांना दिसतेय 
तिचे काय चालू आहे
हे मात्र कळणार नाही
कारण ती आहे घरात
सतराशे साठ व्यापात

चहा, नाश्ता पासून जेवण
दुपारचे, रात्रीचे
चटण्या, कोशिंबिरी, लोणची
तात्पुरते तसे बेगमीचे
आला गेला नाही सध्या
तरी फोनाफोनी आहेच
वाण्याचे सामान, भाज्या
आणून, नाहीतर मागवून
नीट ठेवणे आहेच
कपडे धुणे रोजचे
कामवाली नसतेच
मुलांचे ऑनलाईन अभ्यास
अजूनच भर webminar

घरकाम काही काम नसते
पण work फ्रॉम होम
मात्र कामच असते !!
त्यांना डिस्टर्ब नाही करायचे
हिचे काम आहे रोजचे च !

तिचे हे सारे दखलपात्र नसते
कारण तिला ह्याची सवय असते
आणि तीच तर म्हणते नेहमी
विशेष काय त्याचे !!

वेळ मिळेल तसा walk
येता जाता कामे, योगासने, 
वाचन ,जेवताना टीव्ही
हे दिसते हं सर्वांना 
अरे, ती तर मजेत आहे
आराम चालला आहे तिचा !
भर दुपारी फिरण्या एवढी आहे 
Energy आहे की तिच्यात !!

ती काय करतेय दिसतय सर्वांना
पण तिचे काय चाललय ?  

तिच्या मनाची घालमेल,
नानाविध काळज्या,
स्वप्ने  सगळ्यांची,
चहू बाजूंनी कुचंबणा 
मन: स्ताप झालेला,
करून घेतलेला,
कपातील वादळे, वादविवाद,
स्वतः हुन घेतलेली जबाबदारी
कुतरओढ,  तऱ्हे तऱ्हेचे  आवेग
सारे तिच्या एवढ्याशा मनात

कारण तिला वाढवायची आहे
संस्कृतीची कमान ! 
सून आहे ती घरंदाज
घर करायचे आहे तिला मना मनात !
हट्ट, लाड कुणी पुरवायचे
प्रश्नच नाही उद्भवत कधी  घरात ! 

वेगाने कामे निभावताना
तिला तरी माहित आहे का?
तिची थकलेली गात्रे
निवांत क्षण मागताहेत
कौतुकाचे कटाक्ष, 
आपुलकीचा शब्द,
केलेल्याची जाण,
मनाला विसावा..
आधाराचा हात

छोट्या छोट्या अशा गोष्टींनी
होईल भार हलका तिचा
नाचू लागेल मन तिचे !
प्रेमाने न्हाऊन निघेल तिचा  ऊर !

शांत होईल आतल्या आत
जे काही चालले आहे तिच्या मनात
हसण्यात तिच्या येईल निरागसता
चालण्यात तिच्या येईल डौल
बोलण्यात विश्वास, अभिमान

दिसु दे की तिचे असे काही ..
साधेसेच पण निर्मळ समाधानी 
निवांत आतले मन !!

अलका काटदरे / Dec.20


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा