गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 पुण्यात एवढे काय आहे की जो जातो तो पुण्य नगरीच्या प्रेमात पडतो.

मला वाटते सुंदर मिलाप आहे जुन्या आणि नवीन विचारांचा. मिश्रण आहे एकत्र झालेले दोन पिढ्यांचे. जागा मुबलक, माती ओढाळ, माणसे अजूनच लाघवी. अरे तुरे करतील तसे अगत्याने  गत संस्कृती चा पाढाही वाचतील. शिकवण्याची ह्यांना खूप खुमखुमी. तेथे गेल्याने अगाध ज्ञानाचा सागर समोर पसरतो. काय काय शिकावे ह्यांच्याकडून? 
स्पष्टवक्ते पणा जो मुंबईकरांना कधी जमला नाही 
स्वाभिमान, जो बाळगण्याची भीती नेहमीच राहिली मुंबई  च्या चाकरमनीला.
चिकाटी, जी मुंबईकराला चिकटलीच आहे आपोआप,  पण नको त्याची ! 
वारसा प्रेम , जे मुंबईकर सांगू शकत नाहीत कारण येथे त्यांना त्यांचीच  ओळख नसते.
संस्कृती दर्शन,  जे पूर्वापार पेशवे काळापासून जिवंत आहे आणि जे मुंबईकरांना दाखवता येणे महा कठीण काम, कुणाकुणा ची आणि कोणती संस्कृती दाखवायची ! 

पुण्यातील अजूनपर्यंत चे आकर्षण म्हणजे मोठाली घरे आणि प्राचीन राजवाडे. ते तर इतिहासापासून पाहिले होतेच पण एकेका कुटुंबाचे ही मस्त जुने वाडे पाहिले की मुंबईकराना स्वप्नात असल्यासारखे वाटते.  जागोजागी छोटी छोटी मंदिरे, देवांना न जुमानता त्यांना ठेवलेली  नावे आणि देवपूजा झाल्यावर पोटपूजेची व्यवस्था म्हणून कोपऱ्या  कोपऱ्यावर टपरी चहा आणि खाद्यगृहे. म्हणजे घरी दारी खाणार तुपाशीच पण उपाशी ही नाही राहणार ! 
धन्य ते पुणेकर आणि त्यांची अजब  जीवनशैली. 
तेथील संगीताचा वारसा, बुद्धिवादी आणि जीवनाशी कोणतीही तडजोड न स्वीकारणारे लोक, खळखळ वाहणारी  नदी, भव्य रस्ते आणि त्यातून आपल्याला हवे तसे बाजी मारून पुढे सरसावणारे पुणेकर ! संध्याकाळी बाजी मारून दिवसाशी दोन हात करून पुन्हा सातच्या आत घरी परतणारे पुणेकर. 
हे सर्व मनुष्य निर्मित आणि निसर्ग संपदा, विचारूच नका. डोंगर कड्यानी भरलेला, trekkers गड्यांचा हक्काचा प्रदेश. थंडीत गुलाबी थंडी आणि उन्हाळ्यात बिन घामाचा पण शरीर कडक करणारा उकाडा. अशी दोन टोके, पुणेकरांसारखीच !  

नाहीतर मुंबई ! 

घेतेय सर्वांना सामावून, मिरवत राहिलीय झेंडा आपल्या उदार अंत:करणाचा. आपल्या वितभर  खळगीची भ्रांत करता करता जमेल तेवढे समाज कार्य करीत. पूर येऊ देत, स्फोट होऊ देत, धमक्या काय आणि अपघात किती, तिला काही फरक पडत नाही ! 
समुद्राचा गाज ऐकत  अखंड वाहणारी जीवन सरिता ! 
येथे आलेल्या प्रत्येकाला आपलेसे करणारी पण तेवढेच प्रत्येकाच्या मनात त्याच्या गावा कडील ओढ कायम ठेवणारी. खरी तर दयनीय अवस्था आहे तिची,  पण वाली कोण ? जो तो आपली तुमडी भरण्यात गर्क आणि येथील राजकारण ! विचारूच नका. मोर्चे, बंद, सभा, घोषणा काय काय ऐकावे तिने. तरीही बिचारी सर्व सण साजरे करते, इमाने इतबारे, साग्र संगीत !  हिच्या जीवावर पूरा देश नाचतो तरीही हिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. का तर ही कुणा एकाची माती नाही ! 
मुंबईने लवकरच पुण्यनगरी पासून काही धडे घ्यावेत असे मात्र वाटते ! 
         अलका काटदरे/ ९.८.२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा