गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 चार ऐकतील दहा बोलतील

नवनवीन ज्ञानात भर पडली तरी 
कुणावर ही केव्हा विसंबून चालणार नाही 

एकेक पाऊल दक्षतेचे
उचलेले होते आनंदाने जरी 
एका पावलावर नाचून आता चालणार नाही 

सगळेच दिवस सारखे नसतात
ऐकले होते, अनुभवले होते तरी
रंग दिवसांचे लक्षात ठेऊन चालणार नाही

रात्रीचा दिवस केला काय नाही काय
दिवा स्वप्ने ही रंगविली होती कितीतरी 
दोघातील फरक विसरून तरी चालणार नाही 

तारुण्य आहे जोपर्यंत आजारपण नाही
आल्या दिवसाचे स्वागत करायचे म्हटले तरी
ऊर्जेला मनीच्या गृहीत धरून चालणार नाही

पोटासाठी वणवण, पोटासाठी सारे काही
पोटात सारे सामावून घ्यायचे म्हटले तरी
त्यालाही परीघ आहे हे विसरून चालणार नाही 

मरणात खरोखर जग जगते
बोलून गेले एकदा भारी भा.रा. तरी
जगण्याला कमी लेखून कधी चालणार नाही 

March 13,23

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा