गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 चहाचे कप-

किती वेगवेगळ्या प्रकारचे
पण सर्व हातात धरता येतील असेच ! 

स्टील,चांदी, काच, प्लास्टिक
फुटणारे, न फुटणारे ,
कान मात्र हवा त्याला
सर्वांचे सगळे ऐकून घ्यायला !

चहा त्यातील किती प्रकारचा
साखरेचा, गुळाचा, मधाचा
आले घालून तर कधी तुळस
पुदिना ही चालतो केव्हा केव्हा

चहा करतो मदत नेहमी
आजारात, गप्पात
वेळ घालवायला आणि वेळेला ही !

चहा झाला आहे आधुनिक
लिंबू चहा, बिन साखरेचा, बिन दुधाचा
ढवळून काढतो सारे केव्हा केव्हा 

चहा असतो सर्वत्र
ताज मध्ये आणि टपरी वर ही
अमृततुल्य आणि उकळून अर्क झालेला ही
जशा गप्पा तसे  ठिकाण आणि तसा स्वाद

चहा पाहतो सगळी वादळे
शमवतो त्यांना दोन चार घोटात
बशी हल्ली नकोच असते 
वादळे पसरायला ! 

चहा म्हणे पित्तकारक
सकाळचा थोडासा घेतला तरी
अती गोष्ट केव्हाही वाईट
मोठी वादळे कोठे हवीत, त्याला तरी !!


27.2.22

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा